पुरुषांनो, घट्ट अंडरवेअर घालणं टाळा, स्पर्म काउंट वाढवा

सैल कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सैल कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे.

शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर आजपासून एक गोष्ट नक्की करा, तुमची टाईट जीन्स काढून फेकून द्या नि शक्य असेल तितकं, मस्त ढिल्याढाल्या चड्ड्यांमध्ये वावरा.

एका अभ्यासानुसार सैल चड्ड्या घालून वावरणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे.

अमेरिकेच्या Harvard TH Chan School of Public Health मध्ये झालेल्या एका अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. एकूण 656 पुरुषांनी सहभाग नोंदवलेला हा आजवरचा या विषयासंदर्भातला सर्वांत मोठा अभ्यास आहे.

सैल कपडे घातले की टेस्टिकल्स किंवा अंडकोशाभोवती हवा खेळती आणि थंड राहते. त्यामुळे फक्त आपण काय घालतो, यावरून बरंच काही बदलू शकतो, असं जाणकार सांगतात.

शुक्राणूंच्या निर्मितीसाठी 34 डिग्री सेल्सियसच्या आसपासचं तापमान संवेदनशील मानलं जातं. पुरुष जीन्स किंवा ट्राउझर पँटच्या आत टाईट अंडरवेअर घालतात.

यामुळे टेस्टिकल्स शरीराच्या अगदी जवळ धरले जातात आणि त्यांचं तापमान वाढतं. पण जर बर्मुडा किंवा बॉक्सर घातली की सगळं मोकळंचाकळं राहतं आणि तापमान थोडंफार कमी राहातं. जे शुक्राणू निर्मितीसाठी अनुकूल असतं.

कसा झाला अभ्यास?

Human Reproduction नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात काही पुरुषांची एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये नियमितपणे तपासणी करण्यात आली.

त्यादरम्यान त्यांच्या शुक्राणूंच्या संख्याबळावर परिणाम करणाऱ्या गोष्टी ध्यानात ठेवण्यात आल्या; उदाहरणार्थ, शरीरयष्टी, बॉडी मास इंडेक्स (BMI), धुम्रपा आणि आंघोळीच्या सवयीसुद्धा.

या अभ्यासाअंती असं लक्षात आलं की बर्मुडा किंवा बॉक्सर घालून येणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 17 टक्के जास्त आहे. तसंच त्यांचे शुक्राणू 33 टक्के अधिक सक्रिय आहेत. पण त्यांच्या शुक्राणूंचा आकार किंवा DNAच्या गुणवत्तेत यामुळे काही परिणाम झालेला नव्हता.

Image copyright SCIENCE PHOTO LIBRARY

या अभ्यासातून निष्कर्ष हाच निघाला की शुक्राणूंच्या निर्मितीत पँटमधली उष्णता महत्त्वाची भूमिका बजावते. जीन्स घालणाऱ्या पुरुषांच्या जांघेत उष्णता जास्त असते तर बॉक्सरमध्ये वावरणाऱ्यांच्या जांघेत कमी.

पण हा अभ्यास फक्त शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेबाबत होता. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल नाही. म्हणून या अभ्यासात भाग घेतलेल्या सर्व पुरुषांची एकूण शुक्राणू संख्या सर्वंसामान्य होती.

पण मेंदू त्याचं काम करतोच

पुरुषांच्या टेस्टिकलमध्ये शुक्राणूंचं उत्पादन व्हावं, ही जबाबदारी आपला मेंदू Follicle Stimulating Hormone (FSH) कडे सोपवतो. जेव्हा टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांच्या जांघेत अंडकोशाभोवतीचं तापमान वाढतं, तेव्हा हेच हॉर्मोन कामाला लागतात आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी टेस्टिकल्सना उत्तेजित करतात. म्हणून सैल अंडरवेअर घालणाऱ्यांमध्ये या हॉर्मोन्सची संख्या 14 टक्क्यांनी कमी आढळली, कारण मुळातच त्यांना याची कमी गरज असते.

Image copyright Science Photo Library

शेफ्फील्ड विद्यापीठातले पुरुषरोगतज्ज्ञ प्रा. अॅलन पेसी (जे या अभ्यासात सहभागी नव्हते) म्हणाले की, "वेगवेगळ्या लोकांचा अभ्यास केल्यावर असं नक्कीच सांगू शकतो की जास्त घट्ट चड्ड्या घालणाऱ्या पुरुषांच्या टेस्टिकल्सना दुखापत झाली आहे."

पण प्रा. पेसी यांनी बीबीसीला सांगितलं, "जर काही पुरुषांचा स्पर्मकाउंट खूप अटीतटीचा असेल तर नक्कीच अशा पद्धतीने त्यांची संख्या सुधारू शकते. हा एक सहज शक्य असलेलं स्वस्त उपाय आहे."

पण वेळ किती लागतो?

"किमान तीन महिने लागतात तुमचे सगळे शुक्राणू पूर्णतः नव्याने तयार व्हायला," या अभ्यासाचे लेखक डॉ. जॉर्ज शवेरो सांगतात. "त्यामुळे तुम्ही थोडं आधीच या बदलासाठी तसं प्लॅनिंग करायला हवं."

सोबतच त्यांच्याकडे एक महत्त्वाचा संदेश आहे - "वंध्यत्व ही समस्या काही महिलांपुरती सिमित नाही, पुरुषांमध्येही ती तितक्याच प्रमाणात आढळते. मूल जन्माला घालण्यात पुरुषांच्या योगदानाबद्दल आपल्याला आणखी बरंच काही माहिती नाहीये. पण हे लक्षात घ्यायला हवं की या प्रक्रियेत दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असते."

हेही नक्की पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - हा आहे 'विकी डोनर' रेडा !

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)