येमेनमध्ये शाळकरी बसवर सौदी अरेबियाकडून हल्ला, २९ मुलं ठार

सादा प्रांतात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेला मुलगा Image copyright Reuters
प्रतिमा मथळा सादा प्रांतात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेला मुलगा

सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्रांनी येमेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 29 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस यांनी दिली आहे.

येमेनमधल्या उत्तर सादा प्रांतातल्या दाह्यान इथल्या बाजारपेठेतून जाणाऱ्या मुलांच्या बसवर हा हल्ला झाला. इथल्या बंडखोर हौदी चळवळीमार्फत येमेन देशाचा पश्चिम भाग व्यापला आहे. या भागात त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

त्यांच्यामार्फत या भागात चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयानं हा आकडा मोठा असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी या हल्ल्यांत 43 जणांचा मृत्यू, तर 61 जण जखमी झाल्याचं म्हटलं आहे.

येमेनच्या पश्चिम भागात हौदी बंडखोरांकडे असून उरलेल्या भागात पूर्वीपासून असलेलं हदी सरकार आहे. सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्रांनी हदी सरकारला पाठिंबा दिला आहे. यासाठी ते हौदी बंडखोरांवर हल्ले करत आहेत. आम्ही केलेली कारवाई कायदेशीर असल्याचं या राष्ट्रांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी अरब राष्ट्रांनी सांगितलं की, आम्ही नागरिकांवर हल्ले करत नाही. परंतु, बाजारपेठा, शाळा, हॉस्पिटल आणि निवासी भागावर सौदीप्रणित फौजा हल्ले करत असल्याचं मानवाधिकार संघटनांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येमेनसाठी असलेले संयुक्त राष्ट्रांचे विशेष अधिकारी आणि माजी ब्रिटीश मुत्सद्दी मार्टीन ग्रिफीथ हे चर्चेसाठी पुढाकार घेण्यास सरसावले आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये जिनिव्हामध्ये ते येमेनमधल्या दोन्ही गटांमध्ये चर्चेसाठी बैठक आयोजित करणार आहेत.

ग्रिफीथ यांनी याबाबत बीबीसीशी चर्चा केली. ते सांगतात, "हा प्रश्न जर लवकर सोडवला गेला नाही तर, येमेनचा पाडाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यांत या देशाची परिस्थिती सीरियाहून वाईट होण्याची शक्यता आहे. हे युद्ध हळूहळू जटिल होत चाललं आहे. यातला इतरांचा आंतरराष्ट्रीय रस वाढत असून दोन पक्षांचा विचार करता, एकीकडेच ध्रुवीकरण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवणं कठीण होईल."

येमेनमध्ये का युद्ध सुरू आहे?

येमेनमधला हा वाद 2015च्या सुमारास सुरू झाला. हौदी बंडखोरांनी देशाचा पश्चिम भाग या वादात व्यापला. त्यांच्या या कृतीमुळे येमेनचे अध्यक्ष अब्दराब्बूह मनसौर हदी यांना परदेशात पलायन करावं लागलं.

Image copyright Reuters

इराणकडून या वादाला खतपाणी घातलं जात असल्याचं लक्षात आल्यावर सौदी अरेबियासह सात अरब राष्ट्रांनी या वादात हदी सरकारच्या बाजूनं उडी घेतली.

आतापर्यंत या संघर्षात 10,000 हून अधिक मृत्यू झाले असून यात नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. तर, 55 हजारांहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे.

या युद्धाचे भीषण परिणाम सध्या जनतेवर दिसू लागले आहेत. जवळपास 2 कोटी 20 लाख नागरिकांना मूलभूत मानवी गरजा पुरवणंही जड जाऊ लागलं आहे. तर, जगातली सगळ्यांत मोठी अन्नाच्या चणचणीची आणीबाणी येमेनमध्ये उद्धवली आहे. तसंच, रोगराईही पसरत असून सगळ्यांत मोठा कॉलराचा उद्रेक या देशात झाल्याने काही लाख लोक बाधित झाले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)