अवयवदान करण्यात पुरुषांपेक्षा महिला पुढे का?

Image copyright Roberthyrons
प्रतिमा मथळा आपण अवयवदान करणार का?

गोष्ट एक-दोन वर्षांपूर्वीची आहे. माझ्या आईच्या दोन्ही किडन्यांनी काम करणं बंद करण्यास सुरुवात केली होती. त्याच्याआधी देखील तिच्या किडन्यांनी काम करणं बंद केलं होतं. तेव्हा एका मृत व्यक्तीची किडनी तिला देण्यात आली होती. त्यासाठी तिला बरीच वाट पाहावी लागली होती.

पण यावेळी तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. मग माझी लहान मावशी पुढं आली आणि तिनं तिची किडनी देण्याची तयारी दर्शविली.

असं का होतं की जेव्हा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला अवयवाची गरज पडते तेव्हा बहुतेकवेळा त्याच कुटुंबातली एखादी महिला पुढं येते आणि त्या व्यक्तीची अडचणीतून सुटका करते. किडनी ट्रान्सप्लॅंटच्या केसमध्ये तर हे चित्र बऱ्याचवेळा दिसतं.

अमेरिकेतली आकडेवारी बघितली तर आपल्या लक्षात येईल की किडनी दान करणाऱ्यांमध्ये 60 टक्के महिला असतात. इतर देशांतही पुरुषांच्या तुलनेत महिलांचं अवयवदान करण्याचा प्रमाणात थोड्या-फार फरकानं असंच असतं.

Image copyright Getty Images

पण जगभरात अवयवदान करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी होत चालल्याचं दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की पुरुषांच्या तुलनेत अवयवदान करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे.

विरोधाभास असा की या अवयवाची गरज पुरुषांनाच जास्त पडते.

Image copyright Getty Images

म्हणजे आज जास्त पुरुषांना किडनीची गरज पडते, पण त्यांना हे अवयव बहुतेकवेळा महिलांकडून मिळतात. यामुळे महिलांवर अवयवदानाचा भार अधिक पडत आहे.

त्याच वेळी एक नवी अडचण समोर येत आहे. बहुतेकवेळा पुरुषांचं शरीर महिलांचे अवयव स्वीकारत नाहीत.

1998 ते 2012 या काळात अमेरिकेत 2.3 लाख अवयदानाच्या केसेसमध्ये असं आढळलं की जर पुरुषांना महिलांची किडनी लावली असेल तर ती फेल होण्याची शक्यता आधिक आहे.

हीच गोष्ट हृदय प्रत्यारोपणाची. जर पुरुषांना महिलांचं हृदय देण्यात आलं तर पुढच्या पाच वर्षांत त्या व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता 15 टक्क्यांनी वाढलेली आढळली.

अवयवदानात असलेल्या या लिंगभेदाचं कारण म्हणजे महिला आणि पुरुषांच्या अवयवातला फरकही आहे. महिलांचे अवयव हे पुरुषांच्या तुलनेत लहान असतात.

अमेरिकेतल्या मेरीलॅंड विद्यापीठातल्या ट्रान्सप्लांटतज्ज्ञ रॉल्फ बार्थ यांचं म्हणणं आहे, की भारदस्त शरीराच्या व्यक्तीला जर सडपातळ महिलेची किडनी देण्यात आली तर ती किडनी भारदस्त शरीराचा भार सहन करू शकणार नाही. अवयवदानाच्या 1,15,000 केसेसचं निरीक्षण केल्यावर असं आढळलं की जर अवयवदात्याच्या आणि स्वीकारणाऱ्याच्या वजनात तीस किलोचा फरक असेल तर ट्रान्सप्लॅंट नाकाम होण्याची भीती वाढते.

पण जर महिला आणि पुरुषाचं वजन सारखंच असलं तरी महिलांचे अवयव पुरुषांच्या तुलनेत लहानच असतात.

Image copyright Getty Images

तज्ज्ञ सांगतात, की ट्रान्सप्लांटवेळी फक्त शारीरिक वजन किती आहे, याचा विचार केला जातो. पण गोष्ट फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही.

जर अवयवदान करणारी महिला आणि स्वीकारणारा पुरुष असेल तर त्यांच्या वजनात 10 ते 30 किलोंचा फरक असेल तर ट्रान्सप्लांट फेल होण्याचा धोका अधिक असतो.

हृदयाच्या प्रत्यारोपणात दुसऱ्या मानदंडांचा वापर करून डॉक्टर हा धोका कमी करतात.

अवयवांच्या आकाराव्यतिरिक्त पुरुष आणि महिलांच्या शरीरात असणारे अॅंटिजेन हे पुरुषांच्या शरीरांपेक्षा वेगळे असतात. पण विज्ञानानं अलीकडच्या काळात बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे हे आव्हान वैद्यकीय क्षेत्रानं बऱ्याच अंशी पेललं आहे.

Image copyright Getty Images

ट्रान्सप्लांटवेळी शरीराला भूल देणारी नवी औषधं आली आहेत. त्यामुळे अवयवदान झाल्यानंतर शरीर नव्या अवयवांना सहज स्वीकारू शकेल.

पण अवयवदानात असलेल्या लिंगभेदाला दुसरी बाजू देखील आहे.

अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलांवरील एका अभ्यासात असं आढळलं की पुरुषांच्या तुलनेत त्यांना अवयवदान करण्याची गरज कमी वाटते. त्यांना अवयव देणाऱ्यांची संख्या तुलनेत अधिक असते. पण अधिक वजन असलेल्या महिलांना अवयव मिळणं कठीण असतं.

महिला जास्त भावनिक असतात

पुरुषांच्या तुलनेत महिला अवयवदानात पुढं का असतात? त्याची अनेक कारणं असू शकतात.

एक कारण असू शकतं की महिला जास्त भावनिक असतात. आपल्या कुटुंबीयांबद्दल त्यांना जास्त जिव्हाळा असतो. पुरुषांची किडनी फेल झाल्यावर ट्रान्सप्लांटची शक्यता अधिक असते.

स्वित्झर्लंडमध्ये 631 किडनी ट्रान्सप्लांट केसेसमध्ये 22 टक्के महिलांनी आपल्या साथीदाराला किडनी दिली आहे. पुरुषांचं हेच प्रमाण फक्त 8 टक्के इतकं होतं.

फक्त आपल्या साथीदारालाच नाही तर महिला आपल्या मुलांना, भाऊ-बहीण आणि इतर नातेवाईकांना अवयव देण्यात मागे नाहीत.

एक कारण आर्थिक असू शकतं. अमेरिकेत अथवा इतर देशात महिला समोर येण्याचं कारण तेच असू शकतं. जर घरातील कर्त्या पुरुषाला अवयवाची गरज असेल आणि दुसरा पुरुष अवयवदानासाठी पुढे आला तर दोघांनाही कामावरून सक्तीची सुट्टी घ्यावी लागू शकते.

पण बऱ्याचदा घरातील महिला या गृहिणी असतात. हे आर्थिक नुकसान टळावं म्हणून त्या पुढं येतात. स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये अशावेळी आर्थिक नुकसान सरकारकडून भरून दिलं जातं, पण अमेरिकेत असं होत नाही.

पण महिला आर्थिक कारणामुळं अवयवदान करतात, असं सरसकट म्हणणं बरोबर नाही. बहुतांशवेळा महिला दुसऱ्यांची काळजी घेताना दिसतात. लहान मुलांचं संगोपन असो वा घर सांभाळणं असो, हे काम महिला पिढ्यान् पिढ्या करत आल्या आहेत. जेव्हा घरातल्या व्यक्तीला अवयवांची गरज पडते तेव्हा महिला या पुढे येतील अशी अपेक्षा केली जाते, असं मेरीलॅंड विद्यापीठाच्या क्लीन ग्रोव्हर सांगतात.

त्यागाची भावना

साधारणतः महिला दुसऱ्यांची काळजी घेतात. कुटुंबाची काळजी घेणं ही महिलांची जबाबदारी आहे, अशी सामाजिक धारणा असल्यामुळे त्यांच्यावर दबाव पडतो. हेच कारण आहे इजिप्तपासून मेक्सिकोपर्यंत अवयवदान करावं, अशी अपेक्षा महिलांकडून ठेवली जाते.

मुलांना जर अवयवांची गरज पडली तर असं म्हटलं जातं की आईनेच त्यांना जन्म दिला आहे, तेव्हा दुसऱ्यांदा त्यांना जीवदान देण्याची जबाबदारी ही आईचीच असते.

प्रसुतीवेळी महिलांनी समर्थपणे प्रसुतीवेदनांचा सामना केलेला असतो. त्यामुळे अवयवदानानंतर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी त्या मानसिकदृष्ट्या सक्षम असतात.

Image copyright Getty Images

क्लीन ग्रोवर सांगतात, अवयवदान केलेल्या महिलांसोबत जेव्हा त्या बोलल्या तेव्हा त्यापैकी बहुतेक महिलांनी हेच कारण सांगितलं.

ट्रान्सप्लाटमधलं सर्वांत मोठं आव्हान कोणतं असेल तर नव्या अवयवाचा त्या व्यक्तीच्या शरीरानं स्वीकार करणं. मुलाला जन्म देताना बाळाच्या शरीराचा आईच्या अॅंटिजनसोबत संबंध आलेला असतो, त्यामुळे आईच्या अवयवाला अस्वीकार करण्याची शक्यता अधिक होते. भविष्यात हे आव्हान पेलता येईल असा विश्वास तज्ज्ञांना वाटतो.

तोपर्यंत महिलांबद्दल पुरुषांचा दृष्टिकोन बदलेल आणि पुरुष स्वतःहून अवयवदान करण्यासाठी पुढे येतील, अशी आशाही ते व्यक्त करतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)