स्वच्छ अभियानासाठी बागेने केली कावळ्यांची भरती

फ्रान्स कावळा

फोटो स्रोत, Getty Images

कावळ्याची एक विशिष्ट इमेज आपल्या नजरेत ठरलेली आहे. पण हा कावळा किती हुशार आणि कामाचा असू शकतो, याची प्रचिती फ्रान्समध्ये येऊ शकते. इथे एका बागेत कचरा गोळा करण्याची जबाबदारी कावळ्यांकडे देण्यात आली आहे.

कचरा गोळा करणं ही जवळपास सर्वच शहरांतील मोठी समस्या होऊन बसलेली आहे. या समस्येवर फ्रान्समध्ये कल्पक उपाय करण्यात आला. इथल्या एका बागेत पडणारा कचरा गोळा करण्यासाठी कावळ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या कावळ्यांना खास प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.

'फुई दू फू' या बागेत कावळ्यांना हे काम देण्यात आलं आहे. सिगारेटचे थोटकं, तसंच काही लहानसहान कचरा गोळा करण्याचं काम हे कावळे करू लागतील.

गोळा केलेला कचरा हे कावळे एका लहान खोक्यात टाकतील आणि तिथं त्यांना बक्षीस म्हणून खाऊ मिळेल.

या बागेचे प्रमुख निकोलस द व्हिलियर्स यांनी ही AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं की या बागेत एक कावळा यापूर्वीच या कामासाठी नेमण्यात आला असून सोमवारपासून आणखी 6 कावळे या कामावर रुजू होणार आहेत.

"स्वच्छता हा एकमेव उद्देश यामागे नाही. बागेत येणारे लोक स्वच्छतेची काळजी घेतच असतात. पण निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी निसर्गच आपल्याला कशी प्रेरणा देत असतो, हे दाखवण्याचा आमचा हेतू आहे," असं निकोलस यांनी सांगितलं.

कावळ्यांच्याच कुटुंबातील असलेले रूक्स प्रजातीचे हे कावळे जास्त हुशार असतात आणि त्यांना माणसांशी विविध प्रकारे संवाद साधणं आवडतं असं ते म्हणाले.

हेही पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)