'HIVची मला लागण झाली पण या गोळीने मी अनेकांचा जीव वाचवू शकलो'

  • टॉम डे कॅस्टेला
  • बीबीसी स्टोरीज
ग्रेग ओेवेन

ग्रेग ओवेन त्या नवीन औषधाच्या शोधात होता, HIVची लागण होण्यापासून वाचवणारं ते औषध नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसकडूनही मिळत नव्हतं. पण खूप उशीर झाला होता. त्याला तोपर्यंत HIV ची लागण झाली होती. असं असूनही तो आणि त्याचा मित्र, अन्य हजारो गरजूंना या नवीन औषधोपचारांचा लाभ व्हावा, यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखत होते.

"तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का... की तुम्ही एखादी अशी छोटीशी कृती केली त्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. फेसबुकवर मी एकाला मेसेज पाठवला आणि माझे संपूर्ण आयुष्यच बदललं."

ग्रेग ओवेन लहानाचा मोठा झाला बेल्फास्टमध्ये. सहा भावंडामधला सर्वात मोठा ग्रेग. 1980च्या सुमारास उत्तर आयर्लंडमध्ये वंश आणि राष्ट्रवादावरून संघर्ष सुरू होता आणि त्या काळात ग्रेग, त्याच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर, 'खूप गे होता'.

2015 साली हाच ग्रेग लंडनमध्ये वेगवेगळ्या बार आणि क्लब्समध्ये काम करत होता, त्याला मित्रांच्या घरी राहत होता. हे असं सामान्य आयुष्य जगताना ग्रेगला पुढे घडणाऱ्या बदलांचा काही मागमूस ही नव्हता. त्याला असं कधी अजिबात वाटलं नव्हतं की तो एके दिवशी समलैंगिक पुरुषांमधल्या सेक्सविषयीची NHSची मानसिकता बदलेल, आणि त्याच्या मदतीने हजारो माणसांची आयुष्य वाचणार होती.

मग एके दिवशी ग्रेगची भेट अॅलेक्स क्रॅडेकबरोबर झाली.

"तो क्यूट होता, थोडा उत्साही, तसा मला जरा आवडलाही तो," ग्रेग सांगतो.

अॅलेक्स नुकताच न्यूयॉर्क हून परत आला होता. त्याच्याजवळ असं काही तरी होतं, ज्याची ग्रेगला नितांत गरज होती. त्याच्याकडे होतं 'प्रेप', एक असं नवीन औषध जे HIV विरोधातल्या त्याच्या लढ्यात त्याला मोठं बळ देणार होतं.

जर तुम्ही एका ठराविक प्रमाणात 'प्रेप' घेत असाल आणि समजा एखाद्या HIVबाधित व्यक्तीबरोबर कन्डोम न वापरता सेक्स केला, तर तुम्हाला HIV होण्यापासून रोखण्यात हे औषध 100 टक्के प्रभावी ठरतं.

ब्रिटिश HIV असोसिएशनच्या (BHIV) मते 'प्रेप'ची गुणकारकता, वापरकर्त्याच्या नियमितपणावर अवलंबून असते.

ग्रेगची उत्सुकता वाढली होती. तो सांगतो, "मी प्रेप मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि अॅलेक्स ते आधीपासूनच घेत होता, ते त्याला अमेरिकेत मिळालं होतं."

अॅलेक्सने त्याला सांगितलं की न्यूयॉर्कमध्ये हे औषध सहज मिळू शकतं, पण त्यावेळी अॅलेक्सजवळील प्रेप औषधाचा साठाही संपत आला होता. आणि UK मध्ये प्रेप उपलब्ध नव्हतं.

"बघा, हे असंय जसं की मला एखादी नवीन छान वस्तू दाखवण्यात आली, पण ती कधी मिळालीच नाही," अलेक्स सांगतो. "हीच ती वेळ होती जेव्हा मी ग्रेगला पहिल्यांदा भेटलो."

ही अशी वेळ होती की जेव्हा UKमध्ये HIV संसर्गाचा धोका असणाऱ्या व्यक्तींमध्ये HIV बाधितांची संख्या वाढत होती. लंडनमधल्या दर आठ समलिंगी व्यक्तींमागे एक व्यक्ती HIV बाधित होती.

प्री-एक्स्पोझर प्रोफिलॅक्सिस किंवा प्रेप ही गोळी सेक्स करण्यापूर्वी घ्यावी लागते. काही जण ही गोळी रोज घेतात तर काही फक्त सेक्सच्या आदल्या किंवा नंतरच्या दिवशी घेतात.

जर कंडोम न वापरता सेक्स केला आणि HIV बाधित व्यक्तीशी शारीरिक संबंध झाला तर प्रेप HIV विषाणूंना शरीरातील रक्तात मिसळण्यापासून कायमस्वरूपी अटकाव करते. म्हणजे प्रेप HIVचा प्रतिबंध करते, HIV बरा करू शकत नाही.

म्हणजेच प्रेप औषध घ्यायला सुरुवात करण्याआधी, तुम्ही आधीच HIV बाधित तर नाही ना, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

ग्रेगने कसाबसा प्रेप औषधाचा थोडा साठा मिळवला, आणि म्हणून तो HIVची तपासणी करण्यासाठी गेला. अशा प्रकारच्या शरीरसंबंधांतून उद्भवणाऱ्या संसर्गाच्या तपासण्या तो नियमितपणे करत राहायचा, म्हणून तो बऱ्यापैकी निर्धास्त होता की या टेस्टमध्ये काही धक्कादायक निघणार नाही.

टेस्ट करून घेताना तो डॉक्टरांकडे लक्षपूर्वक पाहत होता, ही तपासणी कशी होते ते त्याला माहीत होतं. तर HIV निगेटिव्ह असेल तर टेस्ट किट एक टिंब दाखवेल, आणि जर पॉझिटिव्ह असेल तर दोन टिंबं म्हणजे HIV झाला आहे.

अचानक त्याची छाती धडधडू लागली. "खरंच दोन टिंबं दिसली. डॉक्टरांना काही बोलण्याची गरजच नव्हती, मी ते स्वतः पाहिलं कारण ती टेस्ट किट आमच्या दोघांमध्येच ठेवली होती."

ग्रेगला बधीर, बंदिस्त आणि एकाकी झाल्यासारखं वाटलं. "माझ्या आजूबाजूला जाणारी माणसं मला दिसत होती, पण मला स्वतःभोवती एक बुडबुडा असल्यासारखं वाटत होतं, जणून काहीतरी मला सगळ्या जगापासून वेगळं करू पाहतंय."

त्याच क्षणी त्याने एक निर्णय घेतला आणि अन्य हजारो समलिंगी पुरुषांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

त्याने हे गुपित जगासमोर मांडायचं ठरवलं. म्हणून आपण HIV बाधित असल्याचं त्याने फेसबुकवर जाहीर केलं. इतकेच नाही तर त्याने 'प्रेप' औषधाविषयीही सर्वांना माहिती दिली, याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक होतं. त्या औषधाने तो HIVच्या संसर्गापासून वाचू शकला असता.

ग्रेगच्या या कृतीला भरघोस प्रतिसाद मिळाला.

"पहिल्यांदा, लोकांना खरंच वाटेना की मी हे करतोय. नंतर 'प्रेप काय आहे? प्रेपने तुम्हाला HIV संसर्गापासून कसं रोखलं असतं?' अशा प्रश्नांचा भडीमार सुरू झाला."

"मी सांगितलं की प्रेप काय आहे, आणि ते कसं काम करतं. मग अर्थातच पुढचा प्रश्न यायचा 'मला 'प्रेप' कसे मिळेल?'"

आणि ग्रेग आणि अलेक्सने पुढचे पाऊल उचललं.

"आपल्याला आता सरकारची गरजही नाहीये, आपणच आपलं सर्व करू शकतो. आपण प्रत्येकाला हे औषध ऑनलाईन मागवायला सांगू आणि घ्यायला सुरुवात करू," अलेक्स त्यावेळच्या आठवणी सांगत होता.

अशा प्रकारे अलेक्सच्या बेडरूममधून या कामासाठी एक वेबसाईट बनवायला सुरुवात झाली.

पहिले प्रेपविषयी लोकांना हवी असलेली सर्व वैद्यकीय माहिती पुरवण्यात आली आणि नंतर प्रत्येकाला हवी असलेली सुविधा, म्हणजे "औषध खरेदी करण्याचा" पर्याय देण्यात आला.

"आम्हाला आमच्यासाठी पैसे कमवायचे नव्हते, फक्त प्रेपच्या ग्राहकांना विक्रेत्यांशी जोडून द्यायचं होतं. नवीन पण साधी सोपी कल्पना होती ती."

"मी वाट नाही पाहणार की NHS येऊन माझा जीव वाचवेल. मला प्रेप हवंय आणि याप्रकारे मी ते मिळवणार आहे," असं अलेक्स सांगतात.

यातूनच त्यांनी "I Want Prep Now" हे संकेतस्थळ ऑक्टोबर 2015 मध्ये सुरू केली.

पहिल्या 24 तासांत या संकेतस्थळाला 400 हिट्स मिळाल्या, आणि त्याचा प्रवास तिथपासून सुरू झाला.

नंतर वैद्यकीय व्यवसायक्षेत्राने याची दखल घेतली.

NHSची एड्स आणि लैंगिक आरोग्याबद्दलच्या सल्लागार मॅग्स पोर्टमन यांनी ग्रेगला भेटायची इच्छा मेल करून दर्शवली.

विल नटलंड, प्रेपची माहिती देणाऱ्या 'प्रेपस्टर' या संकेतस्थळाचा कार्यकर्ताही यात सहभागी झाली. विल या मोहिमेसाठी गिनीपिगसुद्धा झाला.

विलने नवीन विक्रेत्यांकडून प्रेपचे नमुने मागवून घेतले आणि पोर्टमनच्या लैंगिक आरोग्यकेंद्रात रक्ताची तपासणी करून घेतली. 300 हून अधिक नमुन्यांची तपासणी केल्यावर त्याला एकही खोटा सँपल आढळला नाही.

त्याच सुमारास UK मेडिकल रिसर्च कौन्सिल एक 'प्राउड' सर्वेक्षण करत होती. प्रेप वापरणाऱ्या आणि न वापरणाऱ्या समलिंगी पुरुषांची तुलना करणारं हे सर्वेक्षण होतं.

सर्वेक्षणातून असं समोर आलं की प्रेप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये HIVची नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या 86 टक्क्यांनी घटली आहे. हा निकाल इतका सुस्पष्ट होता की सर्वेक्षण लवकरच संपलं आणि प्रेप न घेणाऱ्यांना तत्काळ प्रेप औषध पुरवलं गेलं.

मग या सगळ्यात NHS इंग्लंडची भूमिका काय होती?

2014च्या अखेरीस, प्रेप उपलब्ध करून द्यावी का, हे ठरवण्याची प्रक्रिया NHSने सुरू केली, पण बराच वेळ जाऊनही घडलं मात्र काहीच नाही.

मॅग्स म्हणतात, "HIVला प्रतिबंध करणारं असं एक साधन उपलब्ध आहे, ही बाब UKतील डॉक्टरांसाठी उद्विग्न करणारी आणि निराशाजनक होती."

"आम्हाला ते औषध उपलब्धही होत नव्हतं आणि आम्ही संभाव्य रुग्णाला ते लिहूनही देऊ शकत नव्हतो. HIV संसर्ग होण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका असलेली आणि पुन्हा त्यातीलच काही जणांना HIVचा संसर्ग झालेला दिसत असूनही आम्हाला फक्त पाहात राहावे लागत होते."

2016 उजाडले तरी NHSचे या विषयातील चर्चांचे गुऱ्हाळ सुरूच होतं आणि शेवटी त्यांनी नकारच दिला.

"मी हतबुद्ध झाले होते," असं 'प्राऊड' तपासणी मोहीम चालवणाऱ्या, आणि क्लिनिकल एपिडेमिओलॉजी विषयाच्या प्राध्यापक शीना मकॉरमॅक म्हणतात.

तर मॅग्स म्हणतात "ते खरोखरच धक्कादायक होते."

शेवटी प्रेप उपलब्ध करून देण्यासाठी एका वेबसाईटच्या रूपातून जी मोहीम एका बेडरूममध्ये सुरू झाली ती थेट उच्च न्यायालयात पोहोचली.

नॅशनल एड्स ट्रस्ट, या चॅरिटी संस्थेने NHS इंग्लंडला कोर्टात खेचलं. अन्य नवीन औषधांना जे नियम लागू होतात तेच नियम प्रेप ला लावावेत, अशी त्यांची मागणी होती.

जोखीम खूप मोठी होती. प्रेप मिळण्यासाठी उशीर होत असल्याने कमीतकमी 17 लोक HIVच्या विळख्यात सापडल्याची माहिती एका पत्राद्वारे टेरेंस हिग्गिन्स ट्रस्ट, या एड्सविषयक कार्य करणाऱ्या अग्रगण्य चॅरिटी संस्थेने द टाइम्स वृत्तपत्राकडे पत्रातून दिली.

हा खटला फार किचकट होता. NHSच्या मते, कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक औषधांसाठी निधी पुरवणं बंधनकारक नव्हते, ते स्थानिक प्रशासनाचं काम होतं.

त्याच सुमारास NHSला गेल्या सत्तर वर्षातली सर्वांत मोठी म्हणावी अशी आर्थिक समस्या भेडसावत होती. नवीन आर्थिक आव्हान NHSला झेपलं नसतं. आजच्या घडीलासुद्धा गुंतवणुकीचे आकडे खूप मोठे असले तरीही NHSला निधीची कमतरता भेडसावते आहेच.

या खटल्याच्या निमित्ताने, समाजाच्या दृष्टीने समलिंगी लोक कोणत्या गोष्टीसाठी पात्र आहेत किंवा त्यांना कोणत्या गोष्टी मिळायला हव्यात, ही बाबही प्रकाशात आली.

गे पत्रकार आणि निवेदक अँड्र्यू पिअर्स हे प्रेपसाठी सरकारने निधी पुरवण्याच्या विरोधात होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर "NHSला दरमहा 450 पाउंड्स एका समलिंगी व्यक्तीवर खर्च करेल, असं वाटत नाही. कारण हे ते लोक आहेत जे कंडोम वापरू इच्छित नाहीत. म्हणजे अशा लोकांसाठी सरकारी तिजोरीतून अशी उधळपट्टी का? हे संतापजनक आहे, त्यांच्या अनिर्बंध लैंगिक संबंधांचा भुर्दंड सामान्य करदात्यांनी का भोगावा?"

प्रेप औषधाची अधिकृत किंमत घसरून 355 पाउंड्स इतकी कमी झाली आहे, पण NHS देशाच्या वेगवेगळ्या भागांत घासाघीस करून प्रेप औषधाची किंमत आणखी खाली आणेल. अर्थात या औषधाबद्दल बाळगण्यात आलेल्या व्यावसायिक गुप्ततेमुळे, प्रेपची किंमत सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे.

ग्रेगच्या मते "समलिंगी पुरुषांना, बिनधास्त, अपराधी भावना न बाळगता, निरोगी राहून लैंगिक समाधान मिळवण्याचा हक्क आहे. बराच काळ ते या कारणासाठी स्वतःच स्वतःला धिक्कारत आले आहेत. दोन समलिंगी व्यक्तींना प्रेम, खास करून लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अशी किंमत मोजावी लागते, ह्यावर विश्वास ठेवायला शेवटी आम्ही शिकलो आहोत, पण ते तसं नाही."

तृवादा नावाच्या ब्रांडेड प्रेप ओषधीपेक्षा एक सामान्य प्रेप जनौषधी खरेदी केली तर रुग्णाला महिन्याला शेकडो पाउंड्स खर्चावे लागत नाहीत. सध्या 30 दिवसांच्या गोळ्या खासगीत 20 ते 55 पाउंड्समध्ये रुग्ण खरेदी करू शकतो.

कोर्टात NHSने केलेल्या युक्तिवादांतून एक गोष्ट समोर आली की, याआधी NHSने स्टॅटिन्ससारख्या प्रतिबंधात्मक औषधीसाठी निधी पुरवला होता. धोकादायक कोलेस्ट्रॉलची रक्तातील पातळी कमी करणारं औषध म्हणजे स्टॅटिन्स.

अखेर कोर्टाने निर्विवादपणे निकाल नॅशनल एड्स ट्रस्टच्या बाजूने दिला.

पण NHS इंग्लंडने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचं ठरवलं. इतकंच नाही तर त्यांनी याबाबत वृत्तपत्रातही मजकूर प्रसिद्ध केला होता. टेरेंस हिग्गिन्स ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी इअन ग्रीन्स यांच्या ते चांगलंच लक्षात आहे. या बद्दल सांगताना ते म्हणतात "कंडोमशिवाय अनेक जोडिदारांबरोबर लैंगिक संबंध ठेवणाऱ्या, एड्सचा सर्वाधिक धोका असणाऱ्या पुरुष व्यक्ती विचारात घेऊन NHSने हा निर्णय घेतला होता. अर्थातच तो निर्णय टीकेस पात्र होता."

ग्रेगसाठी हे खूपच दुःखद होते. "ही तर क्रूर लबाडी आहे. अगदी आंबट द्राक्षांसारखी."

अचानक NHSच्या निर्णयांवर, तात्त्विकदृष्ट्या बारीक नजर ठेवली गेली. शॉन सिंक्लेअर, लीड्स विद्यापीठातील वैद्यकीय नीतीशास्त्रज्ञ [Medical Ethicist] या बद्दल बोलताना म्हणतात, "हे खरोखरंच रोचक आहे. वैयक्तिक जवाबदारी आणि त्याचा NHSच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. अधिकृतरीत्या याचा कोणताच सबंध नाही."

अखेर 2016 मध्ये सर्व वाद संपले. NHS विरोधात सर्व कायदेशीर निर्णय झाल्याने, त्याला प्रेपची जवाबदारी स्वीकारावी लागली.

ग्रेग आता नॉर्दन आयर्लंडमध्ये परत आला होता. एका पबमध्ये काम करत होता. तो म्हणतो "मी शब्दशः रडत होतो, बेलफास्टच्या या गरीब मुलाला बीअरचे ग्लास देणाऱ्याला कदाचित वाटलं असेल की मला वेड लागलं होतं."

मग त्यानंतर काय काय घडले?

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत, लंडन मधील आठ आरोग्यकेंद्रं आणि राजधानी बाहेरील इतर अनेक आरोग्यकेंद्रांनी प्रेप पुरवठा मोहिमेत भाग घेतला. तसंच अनेक पुरुषांनी, ही माहिती समजल्याने, आपणहून औषध खरेदी केले.

ऑगस्ट 2017 मध्ये, NHS इंग्लंड ने 10,000 लोकांना प्रेप औषध पुरवण्याची मोहीम हाती घेतली. तिचा खर्च एक कोटी पाउंड्स इतका होता. ही मोहीम तीन वर्षांसाठी असेल.

या मोहिमेचा भाग म्हणून वेल्स मध्ये NHS च्या काही निवडक लैंगिक आरोग्य केंद्रांतून, प्रेप औषध उपलब्ध होते. नॉर्दन आयर्लंड मध्ये मात्र NHS कडून प्रेपचा पुरवठा सध्या तरी बंदच आहे. UKतील स्कॉटलंड मध्ये मात्र, NHS कडून प्रेपचा पूर्ण पुरवठा जारी आहे.

गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच, HIVचे निदान झालेल्या समलिंगी पुरुषांची संख्या घटली आहे. 2015 ते 2016 मध्ये हे प्रमाण देशपातळीवर विचार करता जवळपास २० टक्क्यांनी घटले तर लंडन मधील काही आरोग्यकेंद्रांतून ४० टक्क्यांनी घटले.

अॅलेक्सच्या शब्दांत सांगायचे तर "तो असा पहिला क्षण होता, जेव्हा आम्ही थोडं थांबून मागे वळून पाहिलं, आणि त्या सगळ्याची परिणामकारकता पाहून आम्हाला धक्काच बसला."

विरोधकांच्या मते प्रेपमुळे सुरक्षित लैंगिक संबंध राखण्याच्या संदेशाचे महत्त्व कमी होतं. ऑस्ट्रेलियातील लांसेटमध्ये झालेल्या ४ वर्षांच्या अभ्यासातून प्रसिद्ध झालेल्या निरीक्षणाचा त्यांनी दाखला दिला. आणि सुचवले की प्रेपचा वापर वाढला की कंडोमचा वापर कमी होतो. अभ्यासकांच्या मते प्रेप न घेणारे, परिणामी त्याचा फायदा न होणारे पुरुषही विनाकंडोम लैंगिक संबंध राखतात.

"प्राउड" तपासणी मोहीम चालवणाऱ्या शीना मकोरमॅक यांच्या मते प्रेपचा वापर फायद्याचाच आहे.

"आम्ही बहुतेक, जे काही या बाबतीत शक्य होते ते केले, वारंवार तपासण्या, लवकर निदान आणि लवकर औषध योजना."

"या मध्ये एक शक्यता दुर्लक्षित राहात होती. ती म्हणजे HIVचा संसर्ग न झालेल्या व्यक्तींना, दोन तपासण्यांदरम्यानच्या काळात HIVचा संसर्ग झाल्याचं आढळून येत होते. तिथे प्रेपचा वापर उपयुक्त ठरत होता."

प्रेपमुळे NHSची बरीच आर्थिक बचतही होऊ शकते.

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज मधील शास्त्रज्ञानी प्रेप पुरवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची आर्थिक परिणामकारकता तपासल्यानंतर असे निष्कर्ष काढले की सुरवातीच्या काही दशकात या औषधामुळे खर्च होईल, पण 40 वर्षांनंतर मात्र बचत होणं सुरू होईल. आणि ८० वर्षानंतर, प्रेपमुळे युकेला 100 कोटी पाउंड्सची बचत करणे शक्य होईल.

प्रेप मोहिमेचा इथपर्यंतचा प्रवास आठवून, ग्रेगचे डोळे बऱ्याचदा पाणावतात. खासकरून त्याला आलेला एक फोन आठवला की त्याला भरून येते. तो फोन होता शिना मकोरमॅकचा.

कोर्टाने अनुकूल निकाल दिल्यानंतरच्या 2016 सालच्या ख्रिसमस मधला हा फोन. तिने त्याला फोनवर सांगितले होते की ग्रेग आणि अॅलेक्सने वेबसाईट उघडली नसती तर फारच कमी लोकांनी प्रेप घेतलं असतं.

शीना म्हणाल्या होत्या, "माझ्या मते तुम्ही पुन्हा ते सुरू करावं. तुम्ही जे काही केलं त्यामुळेच आज आजूबाजूला वावरणारे हजारो लोक HIV बाधित होण्यापासून वाचले आहेत."

मागे वळून पाहताना, ग्रेग म्हणतो, "अशी काही फार मोठी योजना नव्हती. माझं प्रामाणिक ध्येय होतं. मी HIV बाधित असल्याचं निदान झाल्यानंतर मला कमीतकमी एका व्यक्तीला तरी HIV बाधित होण्यापासून वाचवायचं होतं. अशाने मी समजतो की HIV शी माझा सामना बरोबरीत सुटला."

"आम्ही आणखी एका व्यक्तीला HIV होण्यापासून वाचवू शकल्याने मी HIV शी सामना जिंकलो. यामध्ये माझ्यावर HIV बाधित हा शिक्का बसला, त्याची मला तमा नाही."

असं असेल तर मग ग्रेगने HIVला पार धूळ चारली, असं म्हणायला हरकत नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)