सिअॅटल क्रॅश : 'मला वाटलं की थोडं विमान उडवून घेऊ आणि बस्स!'

व्हीडिओ कॅप्शन,

व्हीडिओ : त्या विमानाचा पाठलाग करताना फायटर जेट्स

सिअॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान पळवून झेपावणाऱ्या तरुणाला विमानापर्यंत प्रवेश करण्याची रीतसर परवानगी होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

प्रशासनानुसार हॉरिझाँटल एअर या एअरलाईन्ससाठी तो गेल्या तीन वर्षांपासून विमानाची देखरेख आणि बॅगांची ने-आण करण्याचं काम करत होता. त्यामुळे त्याला विमानापर्यंत जाण्यापासून कुणीही रोखू शकत नव्हतं.

या कर्मचाऱ्यानेच मग मौज म्हणून एक रिकामं प्रवासी विमान परवानगीशिवाय टेकऑफ केलं. आणि काही काळ 'हवाई कवायती' केल्यानंतर ते पजेट सामुद्रधुनीत क्रॅश झालं. त्यात या 29 वर्षांच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

या घटनेदरम्यान दोन F15 लढाऊ विमानं त्याचा पाठलाग करू लागले होते. तर काही काळासाठी विमानतळही बंद करावं लागलं होतं.

Horizon Air Q400 नावाचं हे विमान हॉरिझॉन एअरलाइन्सचे पार्टनर अलास्का एअरलाईन्सचं होतं. या विमानात साधारणपणे 78 लोक बसू शकतात. आतापर्यंत तरी त्या विमानात तीच एक व्यक्ती होती, असं कळतंय. पण हे ठामपणे सांगता येणार नाही.

पोलिसांनी आधीच कट्टरवादी हल्ल्याची शक्यता फेटाळली होती. पण अजूनही या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

पण घटनेनंतर अधिकाऱ्यांनी हवाई वाहतूक नियंत्रक (ATC) आणि या व्यक्तीदरम्यानचं संभाषण उघड केलं आहे. या संभाषणात तो आपला कुणालाही इजा पोहोचवण्याचा उद्देश नसल्याचं सांगतो, तसंच आपली चूक कळल्यावर जवळच्या लोकांची माफी मागताना ऐकू दिसतो आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देताना अलास्का एअरलाइन्सचे ब्रॅड टिल्डन यांनी सांगितलं की त्या माणसाची संपूर्ण पार्श्वभूमी तपासण्यात आली होती. "त्याने काल आपली शिफ्ट संपवली आणि आम्हाला वाटतं तो आपल्या गणवेशातच होता."

"विमानाच्या दरवाज्यांना लॉक किंवा इंजिन सुरू करण्यासाठी कुठलीही चावी लागत नाही, फक्त विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेच्या भरवशावरच ही विमानं ठेवण्यात येतात," असंही ते म्हणाले.

दरम्यान, FBI ने चौकशी सुरू केली आहे.

फोटो स्रोत, CBS

फोटो कॅप्शन,

विमान कोसळलं ती जागा

सॅटलाईट टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, ATCने त्याला विमान लँड करण्याचं आवाहन केलं. पण तो "मस्तीत आणि बेफिकीर वाटत होता".

या विचित्र उड्डाणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच झळकले.

दक्षिण केट्रॉन बेटावर एक सैनिकी केंद्राजवळ ते कोसळलं. उपलब्ध झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये विमानात किती इंधन आहे, याची त्या व्यक्तीला काळजी वाटत असल्याचं लक्षात येतं.

काय झालं संभाषण?

त्या पायलट आणि ATC मध्ये विविधांगी संभाषण झालं - लँडिंग करण्याचे पर्याय, त्याच्या या विचित्र प्रकारासाठी माफीनामे आणि बरंच काही.

जेव्हा नियंत्रकांनी त्याला विमान उडवण्यात काही मदत हवी आहे का, हे विचारलं तेव्हा तो म्हणाला, "नाही, मला नाही वाटत मला काही मदत लागेल. मी याआधी अनेकदा व्हीडिओ गेम्स खेळलो आहे."

पण त्याला उड्डाणाविषयी मर्यादित माहिती आहे, हे लवकरच स्पष्ट झालं जेव्हा त्याने सांगितलं की टेकऑफसाठी एवढं इंधन लागतं, याची आपल्याला कल्पना नव्हती. आणि काही सूचना त्याला 'मंबो जंबो' म्हणजे गोंधळात टाकणाऱ्या वाटत होत्या.

त्याला भीतीही होती, की आता आपल्याला अटक होणार आणि तुरुंगात डांबलं जाईल. "अरे देवा! आता मी लँड करायचा प्रयत्न केला तरी ही लोक मला चांगलंच बदडून काढतील आणि त्यांच्याकडे काही विमाननाशक यंत्र वगैरे तर नाही ना?"

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

विमानाचं प्रातिनिधिक छायाचित्र

मग ATC मधला नियंत्रक त्याला डावीकडे वळायची सूचना देतो, पण त्याकडे दुर्लक्ष करत तो म्हणतो, "अशा गुन्ह्यांमध्ये जन्मठेप होते का हो? मला वाटतं ते मला तरी अशीच शिक्षा करतील."

विमान लँड करण्याबद्दल काय माहिती आहे, असं विचारल्यावर तो सांगतो, "मला नाही माहिती ना भावा. मला नाही माहिती. मला वाटलं होतं की थोडं विमान उडवून घेऊ आणि बस्स! तेवढंच. त्याच्या पुढे काही विचार केला नव्हता."

पण तो म्हणतो, "मी खूप लोकांची चिंता करतो. त्यांना हे ऐकल्यावर खूप वाईट वाटेल. मी माफी मागतो प्रत्येकाची. माझं डोकं फिरलं होतं, माझा स्क्रू ढिला झालेला. आत्तापर्यंत माहिती नव्हतं. आत्ता सगळं कळतंय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)