'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं'

  • सारा मॅकडरमॉथ
  • बीबीसी स्टोरीज
प्रातिनिधिक छायाचित्र

रुमानियावरून ॲना शिक्षण घेण्यासाठी लंडनला आली, पण त्यासाठी आधी चार पैसे साठवणं तिला गरजेचं वाटलं. वेटर, सफाई कर्मचारी, गणिताची शिक्षिका, अशा अनेक लहानसहान हंगामी नोकऱ्या करायला तिने सुरुवात केली.

पण मार्च 2011च्या त्या दिवशी आक्रित घडलं.

भरदिवसा तिचे एका रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं, नंतर विमानाने तिला थेट आयर्लंडला नेण्यात आलं आणि पुढचे 9 महिने तिला अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागल्या.

काय झालं त्या दिवशी?

ॲना त्या दिवशी उत्तर लंडनमधील वुड ग्रीन रोडवरून चालली होती. घराजवळच पोहोचलीच होती. पुढचं साफसफाईचं काम सुरू करण्यापूर्वी, घरी जाऊन दुपारचं जेवण करायला पुरेसा वेळ तिच्याकडे होता.

तिच्या डोळ्यावर गॉगल आणि कानात हेडफोन्स होते आणि बियॉन्सेचे 'I was here' हे गाणे कानात वाजत होते. काही घरं ओलांडली की ती तिच्या घरी पोहोचलीच असती.

तेवढ्यात तिने घराच्या चाव्या शोधण्यासाठी बॅगेकडे हात वळवला, आणि कुणीतरी तिला मानेजवळ धरलं. कापडाने तिचं तोंड दाबून बंद करण्यात आलं आणि मागे उभ्या एका लाल कारपर्यंत तिला फरफटत नेण्यात आलं.

ते तिघे होते - दोन पुरुष आणि एक महिला. ते तिला मुक्के देत होते, तिला थोबाडीत मारत होते. रोमानियन भाषेत वारंवार शिव्या देणं सुरू होते. तिच्या जीवाला धोका असल्याचा इशारा ते देत होते. तिच्या कानात अजूनही म्युझिक सुरू होतंच.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

कारच्या मागील सीटवर बसलेल्या बाईने तिची बॅग हिसकावली आणि तिच्या चेहऱ्यावरचा गॉगलही काढला. ते सांगतील तसं केलं नाही तर तिच्या रोमानियातील कुटुंबाला इजा पोहोचवली जाईल, असं तिला वारंवार धमकावण्यात आलं.

"काय घडत होतं, मला काहीच कळत नव्हतं," ॲनाने संपूर्ण घटनाक्रम बीबीसीला सांगितला. "मला कुठे घेऊन चालले आहेत, ते कळायला मार्ग नव्हता. माझ्या मनात नको नको ते सगळे विचार येत होते - माझे अवयव चोरतील, देहविक्रय करायला लावतील, थेट माझा खूनच करतील... देव जाणे काय होईल?"

त्या बाईने अॅनाची पर्स तपासायला सुरुवात केली. तिचं पाकिट तिने उघडलं, फोन हिसकावला, त्यातील रिसेंट कॉल्स चेक केले आणि फेसबुक फ्रेंड्सची यादी पाहिली. तिची कागदपत्रं तपासली. तिचा पासपोर्टही बॅगेत होता - आधीचा पासपोर्ट रूमवरून चोरीला गेल्याने आता नव्याने केलेला पासपोर्ट ती नेहमी सोबतच बाळगायची.

कारमधून पळून जाण्यात काहीच अर्थ नव्हता, हे ॲनाच्या लक्षात आलं. पण जेव्हा ते विमानतळावर आले आणि त्यांच्यातल्या एकाच माणसाच्या भरवशावर तिला एकटं सोडण्यात आलं, तेव्हा तिला वाटलं - पळून जाण्याची हीच संधी आहे! विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडे मदत मागण्याचा विचारही तिच्या मनात आला.

फोटो कॅप्शन,

तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले

"पण जेव्हा तुम्ही फार घाबरलेले असता, तेव्हा किंचाळणं जवळपास अशक्य असतं," ती सांगते.

"माझी कागदपत्रे त्यांच्याकडे होती, माझी आई कुठे राहते, हेसुद्धा त्यांना माहीत होतं, खरं म्हणजे माझ्याविषयीची सर्व माहिती त्यांच्याकडे होती," ती सांगते.

हा धोका तिला स्वतःसाठी पत्करायचा नव्हता.

चेक-इन डेस्कवर ती रडत होती. रडून रडून तिचा चेहरा लाल झाला होता, पण काउंटरच्या पलीकडे बसलेल्या बाईला याची दखल घ्यावीशी वाटलं नाही. जेव्हा तिच्यासोबतच्या माणसाने त्या दोघांचेही पासपोर्ट तिला दाखवले, तिने हलकं स्मितहास्य करत बोर्डिंग पास त्यांच्याकडे सुपूर्द केला.

ते एकमेकांचे जोडीदार असल्याचं जणू तो भासवत होता. असाच देखावा करत त्याने ॲनाला घेऊन सुरक्षा तपासणी घाईघाईने पूर्ण करत मोठ्या चपळाईने बोर्डिंग गेट्स पार केले आणि विमानात मागच्या बाजूला उजवीकडच्या दोन जागा घेतल्या.

आत चढताच त्याने तिला धमकावलं की जर तिने कुठलीही हालचाल केली किंवा किंचाळण्याचा, रडण्याचा जर प्रयत्न केला तर तिला थेट संपवलं जाईल.

तितक्यात विमानात होणारी उद्घोषणा ॲनाच्या कानावर आली - विमान आयर्लंडच्या दिशेने झेपावत असल्याचे तिने ऐकलं. ॲनाने आयर्लंड हे नाव याआधी कधीही ऐकलं नव्हतं. ही फ्लाईट आणखी घाबरवणारी होती.

फोटो कॅप्शन,

मला वेगवेगळी नावं देण्यात आली.

विमानातून बाहेर पडताना तिचा चेहरा अश्रूंनी पार भिजून गेला होता. पण दुर्दैव पाहा - चेक-इन डेस्कवरच्या बाईप्रमाणे विमानातळावरील मदतनीस व्यकतीलाही तिच्या या असहाय अवताराची विचारपूस करावीशी वाटली नाही, वर एक स्मितहास्य करून तिने त्यांना पुढे जाऊ दिले.

आता मात्र ॲनाने ठरवलं होतं, एकदा का विमानतळावर पोहोचलो की हिंमत करायची आणि पळ काढायचा.

पण हे विमानतळ म्हणजे एखाद्या बसस्टँड इतकं लहान होतं. इथं दोन रोमानियन लोक त्यांची वाट पाहात थांबले होते. त्या दोघांमधल्या एका जाड माणसाने ॲनाचा हात धरला आणि हसून तिच्याकडे पाहात म्हणाला, "किमान ही तरी दिसायला बरी आहे."

त्याक्षणी तिला याचा उलगडा झाला की आपलं अपहरण का करण्यात आलं असावं. तिला कळलं की आता तिला विकलं जाणार आहे.

गाडीत बसवून त्या माणसाने तिला एका गलिच्छ फ्लॅटच्या वरच्या मजल्यावर आणलं. एखाद्या जुगारअड्ड्यासारखी ती जागा होती. त्या बंदिस्त फ्लॅटमध्ये खिडक्या घट्ट लावलेल्या होत्या. दारू, सिगारेटसह घामाचा वास हवेत भरून होता.

दिवाणखोलीतच काही पुरुष लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेले दिसले. तिथेच एका टेबलावर डझनवारी मोबाइल फोन्स मध्येच खणखणत होते. काही फोन्समध्ये लाईट लागून बंद पडत होते तर काही फोन्स फक्त व्हायब्रेट होत होते.

हे सगळं अविरत सुरू होतं. त्याच वेळी तिला काही तोकडे कपड्यांमधल्या मुली एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दिसल्या. काही जणी तर विवस्त्रावस्थेत होत्या.

फोटो कॅप्शन,

तिचे अंर्तवस्त्रातले फोटो इंटरनेटवर टाकण्यात आले.

तेवढ्यात कुठून एक लाल झगा घातलेली बाई तिथे आली नि बळजबरीने ॲनाचे कपडे काढू लागली. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण काही पुरुषही त्या बाईच्या मदतीला धावून आले.

त्या क्षणापासून पाशवी आणि क्रूर अत्याचारांच्या विळख्यात ॲना अडकली.

तिच्यामागे भिंतीवर लाल सॅटीन पडद्याच्या पार्श्वभूमीवर ॲनाचे फक्त अंतर्वस्त्रे घातलेल्या स्थितीत फोटो काढण्यात आले. त्या फोटोंद्वारे इंटरनेटवर तिची जाहिरात करण्यात येणार होती. तिला लक्षातही राहणार नाहीत अशी अनेक नावं तिला देण्यात आली - लारा, नतालिया, रेचल, रुबी.

इतकंच नाही तर तिचं वयही 18, 19 आणि 20 असं नक्की करण्यात आलं आणि ती घटक्यात लातविया, पोलंड तर घटक्यात हंगेरीची होत गेली.

तेव्हापासून तिचा नरकवास सुरू झाला. तिच्यासोबत बळजबरीने हजारो पुरुषांनी सेक्स केला. एकापाठोपाठ एक.

दिवसाचा सूर्यप्रकाश तिने कित्येक महिने पाहिलाच नव्हता. जेव्हा क्लायंट नसतील तेव्हाच तिला झोपण्याची परवानगी होती. पण क्लायंटची रीघ थांबायचीच कुठे? दररोज जवळपास 20 जण क्लायंट होते. कधीकधी तर अन्नपाणीही मिळायचं नाही. आणि जे मिळायचं ते एखादी ब्रेडची स्लाईस किंवा कुणाचं तरी उष्टं-खरकटं किंवा नको असलेलं अन्न.

एकीकडे झोपेची, अन्नाची उपासमार तर दुसरीकडे अनन्वित शोषण, यामुळे तिचं वजन झपाट्याने कमी झालं. तिचा मेंदू नीट काम करेनासा झाला.

ग्राहक अर्ध्या तासासाठी 80 ते 100 युरो मोजायचे तर एक तासासाठी 160 ते 200 युरोमध्ये तिच्या शरीराकडून हवी ती भूक भागवून घ्यायचे. रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत कुणी तिला सोडून जाई तर काहीवेळा तिच्यात साधं उभं राहण्याचीही शक्ती उरायची नाही.

काही वेळा इतक्या मरणप्राय वेदनांना ती सामोरं गेली की आता आपण संपलोच, असं तिला वाटायचं.

फोटो कॅप्शन,

पासपोर्टसाठी मला शोधाशोध करावी लागली

ती कुठे आहे याची तिला कल्पना आहे का, पबमधील संगीत ऐकायचं आहे का किंवा फिरायला जायचं का, असंही काही जण तिला विचारायचे. पण ती म्हणते त्यांना पूर्ण कल्पना होती की मी आणि माझ्यासारख्या इतर मुली, आमच्या इच्छेविरुद्ध इथे आहोत.

"त्यांना माहिती होतं की आम्हाला त्या ठिकाणी डांबून ठेवलं आहे. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती," ती आठवून सांगते.

ॲनाच्या शरीराच्या इंचाइंचावर जखमा होत्या, त्यातून हे स्पष्टच दिसत होते. दरदिवशी नव्या जखमा होत होत्या आणि जुन्या जखमांचे व्रण फिकट होत होते. त्यांना सगळं दिसत होतं. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. तिला एकजात सगळ्यांचा तिरस्कार वाटत होता. घृणा वाटत होती.

ॲनाला डांबून ठेवल्याच्या चार महिन्यांनंतर, साधारण जुलैमध्ये नेहमीसारखा खेळ चालू असताना कधी नव्हे इतक्यांदा फोन खणखणत होते. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी फ्लॅटवर धाड टाकली आणि सर्व मुलींना ताब्यात घेतलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी बाई आणि ज्या पुरुषांनी हा सगळा खेळ मांडला होता, त्यांना आधीच याची कुणकुण लागल्याने ते पसार झाले होते.

सोबत लॅपटॉप आणि रोख रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला होता. पोलीस येणार असल्याची खबर त्यांना कळलीच कशी, याचे ॲनाला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.

धाड घातल्यावर पोलिसांनी फ्लॅटचे फोटो काढले, वापरलेल्या कंडोमचे, खाली पडलेल्या अंतर्वस्त्रांचेही त्यांनी फोटो काढून घेतले आणि ॲना आणि आणखी तीन मुलींना कपडे घालून येण्यास सांगितलं.

"आमच्याकडे कपडे नाहीत आणि आमच्या इच्छेविरुद्ध आम्हाला इथे डांबून ठेवण्यात आलं होतं," असं तिने पोलिसांना सांगितलं.

"तुम्ही पाहू शकता, हे सगळे त्याचेच पुरावे आहेत, आम्हाला काहीच स्वातंत्र्य नव्हतं, कशावरच आमचं नियंत्रण नव्हतं - कपड्यांवर नाही, आमच्या कागदपत्रांवरही नाही," असे तिने ओरडून ओरडून पोलिसांना सांगितलं. पण कुणीही तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही.

फोटो कॅप्शन,

शेकडो माणसांशी शरीरसंबंध ठेवावा लागला

तरीही आपल्याला अटक झाली, याचा तिला आनंद झाला! आता ते लक्ष देत नसले तरी आम्हाला बळजबरीने यात अडकवण्यात आल्याचं पोलिसांना यथावकाश लक्षात येईल, याची तिला खात्री वाटत होती. पण त्यांनी तिचे काही ऐकले नव्हतेच.

ती रात्र त्या चार मुलींनी पोलीस ठाण्यातच काढली आणि पुढच्याच दिवशी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. वकिलांनी त्यांना पुढील न्यायालयीन प्रक्रिया कशी पार पडणार हे सांगितलं. आधी थोडक्यात सुनावणी, मग कुंटणखाना चालवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा लावला जाईल, दंड सुनावला जाईल आणि काही तासांनंतर त्यांची सुटका केली जाईल.

हा अगदी नित्याचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा धाडी घातल्या जातात तेव्हा हे सगळं असंच घडतं, त्यात काही नवं नाही - वेश्यांना, त्यांचे सौदे करणाऱ्या दलालांना अटक होते आणि मग त्यांची सुटकाही होते.

याही प्रकरणात तेच झाले. या चारही जणींची सुटका झाली, तेव्हा पळून जाण्याची अनिवार इच्छा अॅनाच्या मनात दाटली. पण पळून जायचं कुठे, हेच तिला कळेना. तिच्याकडे पैसेही नव्हते.

तसंही तिला पळून जाण्याची संधी कधी मिळाली नाही. आणि कुणास ठाऊक त्यांना डांबून ठेवणाऱ्यांची टोळी पुन्हा त्यांची वाट पाहातच असेल तर... कारचे दरवाजे उघडे ठेऊन.

आयर्लंडमध्ये काही तरुण मुली कुंटणखाना चालवत असल्याच्या बातम्या रोमानियामध्ये तिच्या आईने वाचल्या होत्या. त्या मुलींमध्ये आपल्या मुलीचे नाव आल्याचं त्यांना लक्षात आलं.

तोपर्यंत तिच्या फेसबुक अकाउंटवरून त्या माणसांनी तिचे टाकलेले नग्न फोटो किंवा कशातरी दिसणाऱ्या लाँजरीमध्ये जखमांनी भरलेल्या तिच्या देहाचे फोटो... सगळे आईने पाहिले होते. बाजूलाच कमेंटही होत्या - ज्यात असं नवं आयुष्य सुरू केल्याबद्दल गर्व बाळगत असल्याचा दावा ॲना करत होती.

सेक्स वर्कर म्हणून आयर्लंडमध्ये बक्कळ पैसा कमवत असल्याचं ती जगजाहीर करत होती. हे आणि असे अनेक खोटेनाटे काहीबाही लॅपटॉपवरून त्या माणसांनी पसरवले होते.

फोटो कॅप्शन,

मला नव्याने आयुष्य जगायचं आहे

हे फोटो फक्त तिच्या आईनेच नाही तर तिच्या शेजारच्यांनीही पाहिले होते, ॲनाच्या मित्रमंडळींनीही ते पाहिले होते. कुणालाही ॲनाला जबरदस्तीने पळवल्याचे तसेच एका मानवी तस्करीची ती बळी पडल्याचे माहिती नव्हते.

पहिल्यांदा तिच्या आईने काहीतरी करून अॅनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा जेव्हा त्यांनी मुलीला फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या मुलीच्या बाजूने काही कळूच शकले नाही.

"माझी आई तातडीने रोमानियातील पोलिसांकडे गेली," ॲना सांगते. "पण त्यांनी सांगितले की तुमची मुलगी सज्ञान आहे. तसेच ती देशाबाहेर असल्याने तिला काय हवे ते ती करू शकते."

यथावकाश आक्षेपार्ह फोटो आणि मजकुरामुळे फेसबुकने तिचे अकाऊंट बंद करून टाकले. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठीचा सोशल मीडियावरील तिचं अस्तित्वाच ठिकाणही पुसले गेले होते.

पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर त्या चौघीजणी खूप भटकल्या, वेगवेगळ्या फ्लॅट्समध्ये- हॉटेल्समध्ये राहिल्या, अनेक शहरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी मुक्काम केला- पण त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकटच होत राहिली. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी-रात्री त्यांचे शोषण सातत्याने सुरूच राहिले. तिच्या आयुष्यात आणखी काही बिकट प्रसंग उभे राहतील असा विचार ॲनाने तोपर्यंत केला नव्हता. पण जेव्हा तिने ऐकले की तिला मध्य पूर्वेकडे नेण्याचा अपहरणकर्त्यांचा मानस आहे, तेव्हा काहीही करून यापासून वाचले पाहिजे, असे तिला वाटले.

"मी नेमकी कुठे होते, हेही मला नक्की माहीत नव्हते," ती म्हणते. " पण मला हे नक्की कळत होते की बेलफास्ट, डबलिन किंवा आणखी जिथे कुठे मला त्यांनी नेले होते, मध्य पूर्वेपेक्षा या ठिकाणून सुटका करून घेणे नक्कीच अधिक सोपे आणि शक्य होते," ती सांगते.

तिने नजर चुकवुन दरवाजा उघडला. अगदी शांतपणे आणि शक्य तितक्या तातडीने तिला तेथून सटकणे आवश्यक होते. गेल्या कित्येक महिन्यात ती धावली नव्हती, पायाचे स्नायूही तिने ताणले नव्हते. पण तिला आता गतीने पळणे भाग होते.

ॲनाला एका सवयीचा यावेळी खूप फायदा झाला, मदत झाली. अनेकदा क्लायंट फ्लॅटवर येण्यापेक्षा त्या मुलींपैकीच कुणाला तरी बाहेर कुठेतरी घेऊन जाण्याची परवानगी घ्यायचे.

खरे तर हे असे बाहेर भेटणे ॲनाला शिक्षाप्रद वाटे.

"कोणता वेडा माणूस तुमची बाहेर वाट पाहतोय याची तुम्हाला कल्पनाही नसते आणि त्याहून भयंकर म्हणजे तो तुमच्या शरीराशी काय करेल याचा नेम नसायचा," ती सांगते

"पण जेव्हाही मी त्या फ्लॅटच्या बाहेर पडायचे, जेथे कुठे जायचे त्या ठिकाणचा नकाशा मी मनात उतरवून घेत असे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आम्हाला सुपुर्द करतानाच्या वाटेचा नकाशा मी मनातल्या मनात तयार करायचे. रस्त्यात लागणाऱ्या इमारती, रस्त्यांवरची चिन्हे, ज्यांच्या बाजूने आम्ही जायचो त्या सर्व गोष्टी मी डोक्यात नक्की करून टाकल्या होत्या," ती सांगते.

अर्थात आणखी एका माणसाचीही मदत झाली - अँडी त्याचे नाव. अँडी हा अंमली पदार्थांचा डीलर होता- त्याला दोषीही ठरवले गेले होते. मात्र सेक्सची मागणी तो कधीच करत नसे, त्याला फक्त गप्पा मारायच्या असत. त्याचा एक मित्र या कुंटणखान्याच्या व्यवसायात प्रवेश करू पाहात होता आणि त्याला याविषयीची माहिती हवी होती.

"यावेळी मला एक जुगार खेळावा लागला," ॲना सांगते. "मला त्याच्याविषयी विश्वास वाटत होता असे नाही. पण किमान त्याने मला लपण्यासाठी जागा तर उपलब्ध करून दिली,"ती सांगते.

फोटो स्रोत, Getty Images

तिच्या मनातल्या अपूर्ण नकाशांवर भिस्त ठेवत ॲनाने अँडीचा पत्ता शोधला. पण त्याच्याकडून तिला हवे असलेले उत्तर मिळू शकले नाही. आता तिच्याकडे एकच मार्ग होता वाट बघणे आणि दलाल तिचा माग काढत येथे येणार नाहीत, ही आशा बाळगणे.

पण ॲनाने खेळलेला हा जुगार कामी आला. परिस्थिती तिच्या बाजूने झुकली. अँडीच्या व्यापारामुळे त्याला मध्यरात्रीपर्यंत परतायचे होते. म्हणून त्याने तिला त्याच्या घरी थांबण्याची परवानगी दिली.

सगळ्यात पहिली गोष्ट ॲनाने जर कुठली केली असेल तर तिने सर्वांत आधी तिच्या आईला फोन लावला.

फोन वाजला आणि तिच्या आईच्या जोडीदाराने तो उचलला. जसे त्याला कळाले की फोनवर दुसऱ्या बाजूला कोण आहे, तसे त्याने गयावया करायला सुरुवात केली, पुन्हा कधीही फोन करू नको, येऊ तर आजिबात नका अशी विनंती तो करू लागला. दलालांकडून आणि अपहरणकर्त्यांकडून त्यांना धमक्यांचे अनेक फोन आले होते. त्यामुळे तिची आई घाबरून गेल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

"अखेर मी त्याला सांगितले. ओके, मी तुमच्यासाठी ही समस्या सोपी करून टाकते. जर कुणी यानंतर तुम्हाला फोन केला किंवा धमकवण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी आणि माझ्या आईसाठी मी कधीच मेले आहे असे त्यांना खुशाल सांगून टाका," ॲना सांगते

पलीकडून फोन आपटण्याचा आवाज आला.

कोणतीच कागदपत्रे किंवा पासपोर्ट नसताना आणि याआधी कुंटणखान्यावर पडलेल्या धाडीचा अनुभव असूनही- जेव्हा तिची सुटका होण्याऐवजी वेश्या म्हणून तिच्यावरच कारवाई झाली, असं असतानाही तिनं पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. यावेळी सुदैवाने त्यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतलं गेलं.

त्यावेळी आपण उत्तर आयर्लंडमध्ये असल्याचं तिला कळालं. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह एका कॉफीशॉपमध्ये संकेतस्थळी भेटण्याची सूचना तिला देण्यात आली.

"तिथेच टेबलवर पडलेले पांढरे कागदी रुमाल त्यांनी घेतले आणि ज्या ज्या लोकांनी मला यात अडकवले त्यांची नावे लिहिण्यास सांगितले."

जेव्हा मी नावे लिहून तो कागदी रुमाल त्यांच्याकडे सरकवला तेव्हा त्यांना धक्का बसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. या माणसांच्या खूप वर्षांपासून मागावर असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो कॅप्शन,

महिला तस्करी

तब्बल दोन वर्षे पुढील शोधकार्य सुरू राहिले. ॲनाच्या आधीच्या अपहरणकर्त्यांना अटक झाली. पण या सगळ्या प्रक्रियेत ॲनाला तिच्या आणि तिच्या आईच्या सुरक्षेचीही फारच काळजी वाटू लागली, ती खूप घाबरली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देण्याचे तिने टाळले.

तिच्यासोबत फ्लॅटवर राहणाऱ्या एका मुलीने अपहरणकर्त्यांविरुद्ध पुरावे मिळवून दिले. आणि अखेर या टोळीला उत्तर आयर्लँडमध्ये मानवी तस्करी करणे, कुंटणखाना चालवणे आणि पैशांची अफरातफरी या गुन्ह्यांखाली दोषी ठरवण्यात आलं.

त्यांच्यातील प्रत्येकाला दोन वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. त्यांना शिक्षा जाहीर होण्यापूर्वी त्यांना सहा महिने आधीच पोलीस कोठडीत व्यतीत केले होते. त्यानंतर दोषी ठरवल्यानंतर आठ महिने तुरुंगात काढले.

त्यांनी याआधी स्वीडीश तुरुंगात याच गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले गेल्याने दोन वर्षांची शिक्षा भोगली होती. त्यावेळची एक पीडित मुलगी या खटल्यातही दाद मागत होती.

" त्यांना अटक झाली म्हणून मला आनंद झाला पण त्यांना ठोठावलेल्या शिक्षेवर मात्र मी समाधानी नव्हते," ती सांगते.

"मला वाटते, आयुष्यात काहीच वस्तुनिष्ठपणे घडत नाही."

यानंतर आणखी एका स्त्रीसह ॲनाने राजकीय नेते असलेल्या लॉर्ड मॉरो यांच्यासमोर या संपूर्ण प्रकरणाची साक्ष दिली. उत्तर आयर्लंडमध्ये घडणाऱ्या लहान मुले तसेच बायकांच्या वाढत्या तस्करींच्या घटना, त्यांना गुलामगिरीने कुंटणखान्यात,शेतात किंवा कंपनीत बळजबरीने काम करण्यास भाग पाडण्याच्या घटनांनी त्यांना कमालीचे व्यथीत केले होते. अखेर त्यांनी एक नवे विधेयक त्या देशाच्या विधान परिषदेत सादर केले.

मानवी तस्करी आणि शोषण प्रतिबंधक कायदा 2015मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये लैंगिक संबंधांची खरेदी करणे हा गुन्हा ठरवणारा उत्तर आयर्लंड हा ब्रिटनमधील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. तर उलटपक्षी लैंगिक संबंधांची विक्री करणारी व्यक्ती निर्दोष गृहीत धरली जाणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत तिने जी भूमिका बजावली त्याबद्दल ॲनाला समाधान वाटते. "हा कायदा पीडित व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याचवेळी तस्करी करणारे आणि सेक्स विकत घेणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणारा आहे, यामुळे हे चक्र नष्ट होण्यास मदत होईल," असे ती सांगते.

सेक्ससाठी पैसै फेकणाऱ्यांपैकी काही थोड्याफार जणांना असे करण्यापासून रोखू शकलो, तरी ते या कायद्याचे यश असल्याचे आपल्याला म्हणता येईल असंही ती म्हणते.

आणि ज्यांना तस्करीचा सामना करावा लागला असे तिच्यासारखे लोक कोणत्याही भीतीशिवाय जगू शकतील, कारण वेश्याव्यवसायात सामील असण्यावरून दोषी ठरवण्यापेक्षी त्यांना कायद्याच्या पाठबळाचा बराच फायदा होणार आहे, असं ती सांगते.

2017मध्ये, आयर्लंडमध्ये जेथे ॲनासोबतची दुर्घटना घडली होती, तेथेही लैंगिक संबंधांची खरेदी करणे अवैध ठरवले गेले.

फोटो स्रोत, Getty Images

लैंगिक गुलामगिरीतल्या तिच्या आयुष्यातल्या त्या नऊ महिन्यांनी तिला कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. तिचे लैंगिक अवयव कायमचे दुखापतग्रस्त झाले आहेत. तिची खालच्या बाजूची पाठ आणि गुडघे सतत वेदनेच्या विळख्यात असतात. तिला नेहमी केसांना धरून ओढल्याने डोक्याच्या एका भागावरील केसांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे.

भूतकाळातील कटू आठवणींनी तिचे जगणे असह्य झाले आहे. अनेकदा तिला शांत झोप येत नाही आणि आलीच तर एखादे भयावह दुःस्वप्न पाहून ती खडबडून जागी होते. तिला अजूनही अनेकदा दारू, सिगारेट, घाम, मानवी वीर्य आणि शोषणकर्त्यांचा श्वास यांचा एकमेकांत मिसळलेला तो दर्प येतो.

पण ती आता भविष्याकडे आशेने पाहते आहे. ज्यांनी तिच्या शरीराचा व्यापार मांडला त्यांचा हिशोब तिने पूर्ण केला आहे, कायद्यात बदल व्हावा म्हणून तिने मदत केली आणि मुख्य म्हणजे मधल्या वर्षांच्या अबोल्यानंतरही तिच्या आईबरोबरचे तिचे नाते आता स्थिरावते आहे, सुधारते आहे.

"मला आणि माझ्या आईला एका खूप मोठ्या दिव्यातून पार व्हावे लागले," ती सांगते. "तिला माझ्याकडून शिकावे लागले, मला तिच्याकडून शिकावे लागले, पण आता आम्ही छान आहोत," असं ती म्हणते.

ॲनाने पदवी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, पण फी भरण्याची ऐपत नसल्याने आणि काही निधी वगैरेची तजवीज न करता आल्याने तिला मध्येच हा अभ्यासक्रम सोडावा लागला. आता ती हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात नोकरी करते आहे, ती नोकरी सुरळीत चालू आहे.

"पुन्हा एकदा अभ्यासाकडे वळायला मला मनापासून आवडेल. पण सध्यातरी मला काम, काम आणि काम करायचे आहे आणि त्यावरच लक्ष केंद्रित करायचे आहे," असं आशादायी स्वप्न ती पाहाते.

(या वृत्तातील सर्व नावे बदलण्यात आली आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)