कोफी अन्नान 'आंतरराष्ट्रीय शांततेबाबत सजग' होते : पंतप्रधान मोदी

कोफी अन्नान

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

कोफी अन्नान

दोन वेळा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस राहिलेले कोफी अन्नान यांचं निधन झाल्याचं आंततराष्ट्रीय मुत्सद्यांनी सांगितलं. ते 80 वर्षांचे होते. आपल्या मानवतावादी कार्यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपद भूषवणारे अन्नान पहिले कृष्णवर्णीय होते. 1997 ते 2006 या काळात ते या पदावर होते. या दरम्यान इराक युद्ध आणि HIV एड्सचा जगभर प्रसार अशा दोन मोठ्या घटना घडल्या.

पुढे ते संयुक्त राष्ट्रातर्फे सीरियासाठी विशेष राजदूत झाले आणि या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले.

कोफी अन्नान फाउंडेशनने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, "अल्पशा आजारामुळे शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली".

या पत्रकात पुढे म्हटलं होतं, "जेव्हाही या जगात काही वाईट झालं किंवा गरज होती तेव्हा ते कायम तिथे असायचे. सहानुभूती आणि समानुभूती या गुणांमुळे त्यांनी अनेकांची मनं जिंकली. त्यांनी इतरांना कायम प्राधान्य दिलं. आपल्या कार्यात प्रेम, दया यांचा अंतर्भाव होता."

त्यांच्या मृत्यूची घोषणा करणाऱ्या निवेदनात कोफी अन्नान फाउंडशनने त्यांचं वर्णन आंतरराष्ट्रीय ख्यातीचा राजकारणी असं केलं. ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते होते आणि जगाच्या शांततेसाठी आणि समानतेसाठी त्यांनी प्रयत्न केले असंही या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

"जेव्हाही या जगात काही वाईट झालं किंवा गरज होती तेव्हा ते कायम तिथे असायचे. सहानुभूती आणि समानुभूती या गुणांमुळे त्यांनी अनेकांची मनं जिंकली. त्यांनी इतरांना कायम प्राधान्य दिलं. आपल्या कार्यात प्रेम, दया यांचा अंतर्भाव होता."

त्यांच्या निधनाची बातमी कळताच जगभरातून नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. "कोफी अन्नान यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. मी त्यांच्या आणि समस्त संयुक्त राष्ट्रांशी निगडित समुदायाचं सांत्वन करतो."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अन्नान यांना एक महान आफ्रिकन मुत्सद्दी आणि मानवतावादी म्हटलं आहे. "आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ती एक सजग व्यक्ती होती. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सच्या दिशेने त्यांचं योगदान सदैव लक्षात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)