'ISच्या ताब्यातून सुटले पण तो अत्याचारी मला पुन्हा भेटला'

  • व्हिक्टोरिया बिसेट आणि लाईस ड्यूसेट
  • बीबीसी न्यूज
अश्वाक

एका यझिदी तरुणीला Islamic Stateनं (IS) सेक्स गुलाम म्हणून विकलं होतं. तिनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेत जर्मनी गाठलं. पण ज्या व्यक्तीला तिला विकलं होतं तोच व्यक्ती जर्मनीत तिच्या समोर आला.

अश्वाक असं नाव असलेल्या या तरुणीनं तिचा हा भयंकर अनुभव बीबीसीला सांगतिला.

अश्वाक 14 वर्षांची असताना ISनं उत्तर इराकवर आक्रमण केलं.

त्यानंतर त्यांनी अश्वाकसह हजारो यझिदी महिलांना सेक्स गुलाम म्हणून विकण्यात आलं. अश्वाकला ISनं 7000 रुपयांना विकलं होतं. शिवाय इतरही अनेक महिलांची विक्री केली होती.

3 महिने बलात्कार आणि मारहाण सोसल्यानंतर तिला स्वतःची सुटका करून घेण्यात यश आलं. अश्वाक तिची आई आणि एका भावासोबत जर्मनीला पळून आली.

पण काही महिन्यांपूर्वी घडलेल्या प्रकारामुळे ती हादरून गेली.

सुपरमार्केटच्या रस्त्यावर कुणीतरी हाक मारत आहे, असं तिच्या लक्षात आलं.

"शाळेतून घरी येत असताना अचानक एक कार आली आणि माझ्यासमोर येऊन थांबली. तो समोरच्या सीटवर बसला होता. तू अश्वाक आहेस का, असं त्यानं मला जर्मन भाषेत विचारलं. या प्रकाराने मी खूप घाबरले," असं ती म्हणाली.

"नाही. पण तू कोण आहे," अश्वाकने त्याला विचारले.

"मला माहिती आहे तू अश्वाक आहेस आणि माझं नाव अबू हमाम आहे, असं तो म्हणाला. त्यानंतर तो माझ्याशी अरबी भाषेत बोलायला लागला. खोटं बोलू नकोस असंही मला दरडावलं," अश्वाक सांगते.

"मी तुला ओळखतो. तू कुठे आणि कुणासोबत राहते हेही मला माहिती आहे," असं तो म्हणाला.

"जर्मनीतल्या माझ्या आयुष्याबद्दल त्याला सर्व काही माहिती होतं," अश्वाक पुढे सांगते.

जर्मनीत असा काही अनुभव येईल, याचा विचारही मी कधी केला नव्हता, असं अश्वाक सांगते.

"माझ्यावर झालेले अत्याचार आणि वेदना विसरण्यासाठी मी माझं घर, देशही सोडला आणि जर्मनीला आले. पण ज्यानं मला कैदेत ठेवलं तो असा भेटेल आणि त्याला माझ्याबद्दल सर्व माहिती असावं हे मात्र अविश्वसनिय होतं," असं ती सांगते.

'तुमच्या हृदयावरच हल्ला होतो'

घटना घडल्यानंतर 5 दिवसांनी अश्वाकनं पोलिसांत तक्रार केली.

पोलिसांना सर्व माहिती दिल्याचं तसेच इराकमध्ये जे भोगाले तेही तिनं पोलिसांना सांगितले.

फोटो कॅप्शन,

आमचे अनेक नातेवाईक गायब आहेत, असं अश्वाकचे वडील सांगतात.

पोलीस अधिकाऱ्यांनी अबू हमामचं रेखाचित्र तयार केलं असून तो पुन्हा दिसल्यास लगेच संपर्क करा, असं अश्वाकला सांगितलं आहे.

सुपरमार्केटचं CCTV फुटेट तपासण्याची मी विनंती केली पण तसं काही झालं नाही, असं अश्वाक सांगते.

"मी एक महिना वाट पाहिली पण या संदर्भात काहीच घडलं नाही," असं ती म्हणाली.

'तो' परत समोर येईल या भीतीनं तसंच 4 बहिणींना पुन्हा भेटण्यासाठी ती पुन्हा उत्तर इराकला परतली. जर्मनीत ज्या शहरात तिनं नवं आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते धुळीस मिळालं आहे.

"यातून गेल्याशिवाय तुम्हाला यातला भयंकरपणा कळत नाही. हा प्रकार तुमच्या हृदयावर झालेला हल्ला असतो. एखाद्या मुलीवर ISनं बलात्कार केला असेल आणि तिला कैदेत ठेवणारी व्यक्ती जर परत भेटली तर त्या मुलीला काय वाटेल, याचा तुम्ही विचार करू शकत नाही," असं ती म्हणाली.

ही एकच घटना नाही...

अबू हमामला शोधण्यासाठी पोलीस शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. पण अजून यश आलेलं नाही, अशी माहिती जर्मनीच्या उच्च न्यायालयाचे प्रवक्ते फ्रॉक कोहलर यांनी दिली.

अधिक चौकशीसाठी पोलिसांनी जूनमध्ये अश्वाकला पुन्हा संपर्क केला, पण तोपर्यंत ती इराकला निघून गेली होती.

पण ही काही एकमेव घटना नाही, असं जर्मनीतले कार्यकर्ते सांगतात.

यापूर्वी यझिदी महिला निवार्सितांनी जर्मनीत ISच्या कट्टरपंथीयांना ओळखलं आहे अशी माहिती Hawar.Helpचे संस्थापक डुजेन टेक्काल यांनी दिली.

जिहादींच्या तावडीतून सुटलेल्या अनेक मुलींकडून आपणंही अनेकदा असं ऐकलं आहे, असं अश्वाक सांगते.

असं असलं तरी या सर्वच घटना पोलिसांची पोलिसांत नोंद होते असं नाही.

'मी परत कधीच जर्मनीला जाणार नाही'

सध्या कुर्दिस्तानातल्या यझिदींच्या कँपमध्ये राहत असलेल्या अश्वाकला तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि देश सोडायचा आहे.

"आम्हाला ISची भीती वाटते," असं तिच्या वडिलांनी बीबीसीला सांगितलं.

जर्मनीतल्या अनुभवानं अश्वाकच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे, असं ते सांगतात.

"जगाचा नाश जरी झाला, तरी पुन्हा जर्मनीला जाणार नाही," असं अश्वाक सांगते.

ISनं अपहरण केलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी ऑस्ट्रेलियाने बनलेल्या कार्यक्रमासाठी त्यांनी अर्ज केला असून त्यांना ऑस्ट्रेलियात जायचं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)