कोरियन युद्ध : 65 वर्षांचा विरह आणि भेटीचे हळवे क्षण

ली केयुम सेऑम आणि त्यांचा मुलगा ली सुंग चूल यांची भेट Image copyright EPA
प्रतिमा मथळा ली केयुम सेऑम आणि त्यांचा मुलगा ली सुंग चूल यांची भेट

युद्धामुळे जवळचे मित्र, नातेवाईक वेगळे होण्याची आणि त्यांच्यात ताटातूट होण्याचे प्रसंग जगभरात घडलेल्या आहेत. बऱ्याचदा अशांची पुन्हा कधीच भेट होत नाही. पण दक्षिण आणि उत्तर कोरियातील अशा काही नागरिकांना आपल्या विलग झालेल्या नातेवाईकांना भेटण्याची संधी नुकतीच मिळाली. 1950 ते 1953 या कालावधीत झालेल्या कोरियन युद्धाने विभक्त झालेल्या नातेवाईकांची नुकतीच भेट झाली. यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

दक्षिण कोरियातले काही आजीआजोबा उत्तर कोरियात दाखल झाले. नातेवाईक, आप्तेष्टांना भेटण्यासाठी ते देशाची सीमा ओलांडून आले. 1950 ते 1953 या कालावधीत झालेल्या कोरियन युद्धानंतर ते आपल्या नातेवाईकांना कधीच भेटलेले नव्हते.

त्या युद्धाने दोन्ही कोरिया विलग झाले. उत्तर भागात राहणारे नागरिक उत्तर कोरियाचा भाग झाले आणि दक्षिणेकडे राहणारे दक्षिण कोरियाचा हिस्सा झाले. एकमेकांकडे जाणं बंद झालं.

युद्ध आटोपलं मात्र ते संपल्याची औपचारिक घोषणा अजूनही झालेली नाही. उत्तर आणि दक्षिण कोरियातर्फे रियुनियन अर्थात स्नेहभेटीचा कार्यक्रम याआधीही आयोजित करण्यात आला आहे. मात्र यावेळी होणारा कार्यक्रम तीन वर्षांनंतर झाला.

दक्षिण कोरियाकडून या कार्यक्रमात कोण सहभागी होणार, हे लॉटरी काढून ठरवण्यात आलं. यापैकी सगळ्यात वयस्क गृहस्थाचं वय 101 आहे.

कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार?

दोन्ही देशांकडून प्रत्येकी शंभर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अपेक्षित होतं.

काहीजणांनी कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. कारण ते ज्यांना भेटणार होते, त्यापैकी काहीजण हे जग सोडून गेल्याचं लक्षात आल्याने त्यांनी कार्यक्रमासाठी न येण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच उत्तर कोरियाकडून 83 तर दक्षिण कोरियातर्फे 89 माणसं या कार्यक्रमात सहभागी झाली.

युद्धानंतर पहिल्यांदाच मुलाची भेट झाल्याचं 92 वर्षांच्या एका महिलेनं सांगितलं.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा ली चुन जा आपल्या नातेवाईकांच्या फोटोसह

"पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुलगा आणि नवऱ्याची ताटातूट झाली. त्यावेळी मुलगा फक्त 4 वर्षांचा होता. हा क्षण अनुभवू शकेन असं कधीच वाटलं नव्हतं. तो जिवंत आहे की नाही हेही मला ठाऊक नव्हतं," असं ली केयुम सेऑम यांनी सांगितलं. त्यांच्या मुलाचं नाव ली सुंग चूल असं आहे.

"मी नव्वदी ओलांडली आहे. मी जगाचा कधी निरोप घेईन सांगता येत नाही. यावेळी स्नेहभेटीसाठी माझी निवड झाली याचा मला आनंद झाला," असं मून ह्यून सुक यांनी सांगितलं.

स्नेहभेट महत्त्वाची का?

कोरियन युद्धाने लक्षावधी माणसं आपल्या आप्तेष्टांना दुरावली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळच्या नातलगांना भेटण्याची दुर्मीळ संधी अनेक माणसांना मिळते.

गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांदरम्यानचे संबंध निवळलेले असताना अशा स्नेहभेटींचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 18 वर्षांमध्ये साधारण 20 कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

युद्ध संपून जेवढी वर्ष होत आहेत, तसतसा दोन्ही देशातल्या माणसांची आपल्या नातेवाईकांना भेटण्याची संधी निसटते आहे.

याआधी भाऊबहीण, पालक आणि मुलं, नवरा आणि बायको यांची स्नेहभेटीदरम्यान झालेली भेट हळवा क्षण ठरल्याचं अनेकांनी सांगितलं.

भेट कुठे?

दक्षिण कोरियातली माणसं कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बसमधून माऊंट कुमांग रिसॉर्ट इथं आले आहेत. हे सगळे उत्तर कोरियात तीन दिवस थांबणार आहेत. त्यांना आपल्या नातेवाईंकाना दररोज काही तास भेटता येणार आहे. त्यांना एकूण 11 तास भेटण्याची संधी मिळणार आहे. या भेटीदरम्यान प्रशासनाची माणसं उपस्थित होती.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा या ज्येष्ठांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक होते.

दक्षिण कोरियातील मंडळींनी उत्तर कोरियातल्या आप्तस्वकीयांसाठी कपडे, औषधं, खाऊ अशा गोष्टी आणल्या होत्या. याचं कारण म्हणजे उत्तर कोरिया दक्षिण कोरियाच्या तुलनेत गरीब आहे.

एकमेकांना भेटणाऱ्यांचं वय आणि आरोग्या लक्षात घेता या स्नेहभेटीवेळी डॉक्टर आणि नर्सेसचं एक पथकही होते.

स्नेहभेटीचं ठरलं कसं?

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाइ हे दोन नेते यंदा एप्रिलमध्ये एकमेकांना भेटले. या ऐतिहासिक भेटीनंतर स्नेहभेटीचा मार्ग सुकर झाला. रेड क्रॉस संघटनेने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

हे दोन्ही नेते मे महिन्यात पुन्हा एकदा भेटले. दोन्ही देशातल्या माणसांसाठी स्नेहभेटीचे कार्यक्रम आयोजन करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. हे दोघांची पुन्हा भेट होणार आहे.

Image copyright EPA

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचे दुरावलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी दक्षिण कोरियाने पुढाकार घेतला.

जून महिन्यात किम जाँग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची सिंगापूर येथे भेट झाली. आण्विक नि:शस्त्रीकरणासंदर्भात काम करणार असल्याचं उत्तर कोरियाने मान्य केलं. मात्र उत्तर कोरिया दिलेल्या आश्वासनानुसार वागणार का याबाबत साशंकता आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या