पंतप्रधानांना आव्हान; ऑस्ट्रेलियात राजकीय संकट

माल्कम टर्नबुल
फोटो कॅप्शन,

माल्कम टर्नबुल

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यासमोर पद कायम राखण्याचं आव्हानं निर्माण झालं आहे.

टर्नबुल हे पदावर कायम राहण्यासाठी संघर्ष करत आहेत.

कल चाचण्यांमध्ये झालेलं नकारात्मक मदत, पोटनिवडणुकांमधला पराभव आणि पक्षातल्या कॉन्झर्व्हेटिव गटानं केलेलं बंड यामुळे राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावरील दबाव वाढतो आहे.

"सध्या देशात कोणतंही सरकार कार्यरत नाही," असा आरोप विरोधी लेबर पक्षाचे नेते बिल शॉर्टन यांनी केला आहे.

"सरकारनं संसदेचं कामकाज स्थगित केलं असलं तरी यामुळे त्यांच्या अपयश झाकलं जाणार नाही," असंही ते म्हणाले आहेत.

संसदेचं कामकाज 10 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं. यासाठी प्रतिनिधींनी 70-68 अशा प्रमाणात मतदान केलं. पण विरोधी पक्षानं मात्र स्थगितीच्या विरोधात सूर आवळला होता.

ही स्थगिती हा कॅनबेरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या उलथापालथीचा परिणाम आहे.

नेतृत्वासाठी चढाओढ

टर्नबुल यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी पीटर डट्टन यांच्याकडे गृहमंत्री पद होतं. त्यांनी गुरुवारी टर्नबुल यांना आव्हान दिलं होतं. पण त्यानंतर झालेल्या मतदानात त्यांचा 13 मतांनी पराभव झाला होता. निकालानंतर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.

फोटो स्रोत, REUTERS/EPA

फोटो कॅप्शन,

पीटर डट्टन, माल्कम टर्नबुल आणि स्कॉट मॉरिसन

जर टर्नबुल यांनी बाजूला राहण्याचा निर्णय घेतला तर डट्टन यांना खजिनदार स्कॉट मॉरिसन यांचा सामना करावा लागेल, असं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.

टर्नबुल आतापर्यंत याप्रकरणावर काहीही बोललेले नाहीत. पण लवकरच ते माध्यमांसमोर आपली बाजू मांडतील, असा अंदाज आहे.

तीन महत्त्वाच्या मंत्र्यांनी टर्नबुल यांचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे त्यांचं पद जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)