मला हटवलं तर अमेरिकन बाजार कोसळतील - डोनाल्ड ट्रंप

ट्रंप Image copyright Getty Images

माझ्याविरुद्ध महाभियोग मंजूर झाला तर अमेरिकी बाजार कोसळतील आणि त्याचा फटका अमेरिकेला बसेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रंप यांनी "बाजार कोसळतील आणि सगळे खूप गरीब होतील," असं म्हटलं आहे.

मंगळवारी डोनाल्ड ट्रंप यांचे माजी वैयक्तिक वकील मयाकल कोहन यांनी न्यूयॉर्कमधील न्यायालयात साक्ष दिली होती. निवडणुकीत अफरातफरी करायला त्यांना ट्रंप यांनी सांगितल्याची कबुली कोहेन यांनी न्यायालयात दिली.

त्यानंतर अमेरिकेत ट्रंप यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याविषयी चर्चा सुरू झाली. ट्रंप हे महाभियोगाच्या विषयावर आतापर्यंत बोलले नव्हते.

बीबीसी प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरच्या अमेरिकन काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणुकांपर्यंत विरोधकांतर्फे महाभियोग आणला जाण्याची शक्यता कमी आहे.

"मला कळत नाही एखाद्यानं उत्तम काम केलेलं असताना कोणी कसं काय त्याच्याविरोधात महाभियोग आणू शकतं," असं ट्रंप यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं.

"मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर महाभियोगाचा खटला चालवल्यास माझ्या मते बाजार कोसळतील. मला वाटतं, प्रत्येकजण खूप गरीब होईल."

2016च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी दोन महिलांना तोंड बंद ठेवण्यासाठी रक्कम दिली होती असं कोहेन यांनी म्हटलं आहे.

या दोन महिला पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिएल आणि माजी प्लेबॉय मॉडेल कॅरेन मॅकडुगल असाव्यात असं समजलं जातं. या दोघींनी ट्रंप यांच्याबरोबर अफेअर होतं असा दावा केला आहे.

असं असलं तरी ट्रंप यांनी संबधितांना दिलेले पैसे हे निवडणुकांच्या नियमांच उल्लंघन नसल्याचं म्हटलं आहे.

निवडणूक मोहिमेतून नव्हे तर खाजगी व्यवहारातून हे पैसे दिले गेले असल्याचं ट्रंप म्हणालेत. पण त्यांना या प्रकाराविषयी फार नंतर कळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

कोहेन हे कुभांड रचत असल्याचा आरोपही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी केला आहे.

महाभियोगाचा 'म'ही विरोधक काढत नाहीत कारण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याभोवतीचा कायदेशीर खटल्यांचा फास आवळत चालला आहे. अशा परिस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षा अर्थात ट्रंप यांच्या विरोधी पक्षाला महाभियोग शब्दापासून दूर राहणं अवघड होणार आहे.

Image copyright CBS/BBC

मंगळवारी डोनाल्ड ट्रंप यांचे माजी वैयक्तिक वकील मयाकल कोहन न्यूयॉर्कमधील न्यायालयात साक्ष देण्यासाठी उभे राहिले. त्यांनी म्हटलं की तेव्हा उमेदवार असलेल्या ट्रंप यांनी प्रचारादरम्यान अफरातफर करण्याची सूचना केली होती.

कोहन यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर ट्रंप यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचं सिद्ध होत आहे. कोहन यांच्या वकिलानं न्यायालयासमोर ऑडिओ रेकॉर्डिंग सादर केलं आहे. कोहन यांचं बोलणं आणि हे रेकॉर्डिंग लक्षात घेतलं तर ट्रंप यांच्यावर महाभियोगाची टांगती तलवार येऊ शकते.

अमेरिकेचा कायदा काय सांगतो?

विद्यमान राष्ट्राध्यक्षवर गुन्ह्यासाठी ठपका ठेवता येतो का - यासंदर्भात अमेरिकेत खुलेपणाने चर्चा होते आहे. अमेरिकेची घटना आणि केंद्रीय (फेडरल) कायदे याविषयी मौन बाळगतात. मात्र न्याय मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.

राष्ट्राध्यक्षपदी असलेली व्यक्ती गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास महाभियोगाची कारवाई होऊ शकते. मात्र तो प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये (अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृह) बहुमतानं तसंच सिनेटमध्ये (संसदेचं वरिष्ठ सभागृह) दोन तृतीयांश मतांनी पारित व्हावा लागतो.

आकड्यांची जुळणी अवघड आहेच मात्र या सगळ्यात खूप सारं राजकारण असल्यानं प्रक्रिया कठीण होते.

ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून महाभियोगासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना या मुद्यावर जाहीरपणे बोलताना अवघडलेपण जाणवतं आहे.

डेमोक्रॅट्सचं काय म्हणणं?

महाभियोग या विषयासंदर्भात मतमतांतरं आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावर्ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाभियोगाचा पर्याय आजमावू नये असं डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

संसदेच्या दोन्ही सभागृहात डेमोक्रॅटिक पक्ष अल्पमतात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याशिवाय महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही.

जर आत्ता डेमोक्रॅटिक पक्षानं महाभियोगाचा मुद्दा पेटवला तर ट्रंप संकटात आहेत या भावनेपोटी त्यांचे पाठीराखे मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडतील आणि रिपब्लिकन पक्षाला फायदा होईल, अशी डेमोक्रॅटिक पक्षाला भीती आहे.

1998 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात यावा यासाठी रिपब्लिकन पक्षानं घेतलेला पुढाकार अंगलट आला होता. म्हणूनच ट्रंप यांच्यासंदर्भात डेमोक्रॅट्स पक्षानं सावध भूमिका घेतली आहे.

कारण काहीही असो, महाभियोगाच्या मुद्यावर डेमोक्रॅटिक पक्षानं गुळमुळीत भूमिका घेतली आहे. पण आता महाभियोगाचा प्रश्न वारंवार चर्चेत येणार आहे.

"मला आशा आहे की आम्ही या प्रश्नाला सामोरं जाऊ. सध्या किमान ट्रंप यांच्या प्रकरणांची चौकशी तरी व्हायला हवी," असं डेमोक्रॅटिक पक्षाचे काँग्रेसमन डेव्हिड प्रिन्स यांनी 'रॉली न्यूज ऑब्झरव्हर'शी बोलताना म्हटलं.

मॅसेच्युसेट्सच्या सिनेटर एलिझाबेथ वॉरेन म्हणतात की महाभियोगाबद्दल बोलताना त्यांना "चिंता" वाटते. अनेक जणांच्या मते वॉरेन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आघाडीच्या उमेदवार असू शकतील. 2020 साली पुढची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Image copyright Getty Images

महाभियोगाची मागणी कोण करत आहेत?

कॅलिफोर्नियामधले अब्जाधीश टॉम स्टेयर, जे डेमोक्रॅटिक पक्षाला भरघोस आर्थिक मदत करतात, यांनी गेल्या एका वर्षात ट्रंपविरोधात रान उठवलं आहे. महाभियोगाची मागणी करणाऱ्या याचिकेवर त्यांनी सुमारे 50 लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या मिळवल्या आहेत.

त्यांनी मंगळवारी म्हटलं, "ट्रंप यांच्या विरोधात पुराव्यांचा डोंगर उभा राहत आहे. प्रश्न हा आहे की काँग्रेस त्याकडे लक्ष कधी देणार?"

मंगळवारच्या कोर्टातल्या नाट्यानंतर स्टेयर यांनी जाहीर केलंय की ते ट्रंप यांच्या विरोधात महाभियोगाचा खटला चालवण्यात यावा, यासाठी टीव्हीवर नव्यानं जाहिराती देणार असून त्यासाठी 1 दशलक्ष डॉलर (सुमारे 7 कोटी रुपये) खर्च करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाचं काय म्हणणं आहे?

उजव्या विचारांचे असंतुष्ट नेते आता हळूहळू महाभियोगाचा पर्याय म्हणून विचार करत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे पुढारी तसं जाहीरपणे बोलत नसले तरी उजव्या विचारांचे स्तंभलेखक तसं लिहू लागले आहेत.

"महाभियोग या प्रकाराबद्दल मी इतके दिवस साशंक होतो. पण कोहेन यांच्या कबुलीनंतर माझं मत बदललं आहे," असं न्यूयॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक ब्रेट स्टीफन्स यांनी ट्वीट केलं आहे.

Image copyright Getty Images

काँग्रेसमधले रिपब्लिकन महाभियोगाचा अजिबात विचार करणार नाहीत, असंच सध्या दिसतंय. जर नोव्हेंबरमधल्या मध्यावर्ती काँग्रेसच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला कमी जागा मिळाल्या आणि ट्रंप यांच्या जाण्यानं रिपब्लिकन पक्षाला फायदा होणार असेल, तर परिस्थिती बदलू शकते.

सध्या तरी महाभियोग हा निवडणुकीचा मुद्दा होणं रिपब्लिक पक्षाच्या हिताचं आहे. डेमोक्रॅटिक पक्षात या विषयावरून गोंधळाचं वातावरण आहे, हे स्पष्टपणे दिसतंय.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)