अमेरिका : महाधिवक्त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना सुनावले

अमेरिका

अमेरिकेचे महाधिवक्ता जेफ सेशन्स यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. जोपर्यंत ते न्याय विभागाचे प्रमुख आहेत तोपर्यंत त्यांचा विभाग कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही असं ते म्हणाले.

गुरूवारी एका मुलाखतीत ट्रंप यांनी सेशन्स यांच्यावर टीका केली होती. त्यांनी याआधी देखील महाधिवक्ता सेशन्स यांच्यावर उघडपणे टीका केली होती.

2016साली झालेल्या निवडणुकांमध्ये रशियाचा सहभाग होता की नाही याची चौकशी न्याय विभागाकडून सुरू आहे. हीच चौकशी ट्रंप यांच्या डोकेदुखीचं कारण बनल्यामुळे त्यांचा न्याय विभागावर राग असल्याचं म्हटलं जात आहे.

सेशन्स यांनी ट्रंप यांच्या निवडणूक अभियानाचं समर्थन केलं होतं. जेव्हा ट्रंप यांच्या निवडणुकीच्या चौकशीची वेळ आली, तेव्हा त्यात निष्पक्षपणा असावा म्हणून चौकशीची सूत्रं आपले सहकारी डेप्युटी रोसनस्टाइन यांच्याकडे सोपवली.

या चौकशीदरम्यान ट्रंप यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अडथळा निर्माण केला की नाही याची देखील चौकशी होत आहे. विशेष अधिवक्ता रॉबर्ट म्युलर यांच्या नेतृत्वात ही चौकशी होत आहे. यावरून देखील ट्रंप चिडले असून ट्विटरवरून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप नव्हता असं डोनाल्ड ट्रंप यांनी वारंवार सांगितलं आहे. तसंच चौकशीमध्ये आपण कधी अडथळा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दोन दिवसांपूर्वी या चौकशीला नाट्यमय वळण मिळालं जेव्हा ट्रंप यांच्या निवडणूक अभियानाचे व्यवस्थापक पॉल मॅनफर्ट हे एका बॅंक गैरव्यवहारात दोषी आढळले. तसेच ट्रंप यांचे माजी खासगी वकील मायकल कोहेन यांनी टॅक्स बुडवणं, बॅंक गैरव्यवहार आणि अभियानाच्या आर्थिक नियमांचं उल्लंघन हे त्यांच्यावर असलेले आरोप मान्य केले आहेत.

सेशन्स काय म्हणाले?

सेशन्स म्हणाले, "जोपर्यंत मी महाधिवक्ता आहे तोपर्यंत या चौकशीवर कधी नकारात्मक प्रभाव पडणार नाही. मी नेहमीच उच्च मानकांची अपेक्षा ठेवतो. जर ते पूर्ण झाले नाही तर मी कारवाई करतो."

Image copyright AFP

"जगात कोणत्याच देशाकडे नाही अशी समर्पित आणि प्रतिभावान कायदेतज्ज्ञांची फौज आपल्या देशात आहे," असंही ते म्हणाले.

"त्यांच्यासोबत काम करण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्यासोबत कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही नेटकेपणानं पार पाडलं," असं देखील ते म्हणाले.

ट्रंप काय म्हणाले?

'फॉक्स'च्या कार्यक्रमात ट्रंप म्हणाले, "ही बाब खूप खेदजनक आहे. जेफ सेशन्स यांनी चौकशीची सूत्रं आपल्या हाती घेतली नाहीत. त्यांनी आधी मला सांगायला हवं होतं."

"माझे शत्रूदेखील हे म्हणतात की सेशन्स यांनी ही चौकशी दुसऱ्या कुणाला सोपवण्यापूर्वी मला सांगायला हवं होतं. त्यांनी महाधिवक्ता पद स्वीकारलं आणि आता ते म्हणतात की चौकशी दुसरं कुणी करेल. मी म्हणतो नेमक्या कोणत्या प्रकारचा माणूस आहे हा."

"या पदावर त्यांना नियुक्त करण्याचं एकमेव कारण आहे की मला वाटलं ते माझ्याशी प्रामाणिक आहेत. ते माझे समर्थक होते. ते अभियानात होते. त्यांना हे माहित आहे की माझे हितसंबंध गुंतलेले नाहीत," असं ट्रंप म्हणाले.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)