अमेरिका-मेक्सिको 'ऐतिहासिक' व्यापारी करार : 6 प्रश्नं, 6 उत्तरं

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, EPA

अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये सोमवारी महत्त्वाचा व्यापार करार होण्याच्या दिशेनं पाऊल पडलं आहे. या करारात समाविष्ट करण्यात येत असलेल्या अटी 'अद्भुत' असल्याची भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. या करारामुळे अमेरिकेतले शेतकरी आणि मेक्सिकन जनतेला फायदा होईल असं ट्रंप म्हणाले.

या करारात समाविष्ट करण्यात येणाऱ्या अटींबाबत अमेरिका आणि मेक्सिकोच्या शिष्टमंडळात सहमती झाल्यानंतर ट्रंप यांनी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिके पेना निएतो यांचे फोन करून अभिनंदन केले.

1994मध्ये कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये 'उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार' (NAFTA) झाला होता. या कराराला 25 वर्षं पूर्ण होतील. हा करार रद्द करून नवा करार करण्याची ट्रंप यांची इच्छा आहे.

मेक्सिकोबरोबर होऊ घातलेल्या कराराला 'अमेरिका-मेक्सिको व्यापार करार' असं म्हटलं जाईल ही घोषणा त्यांनी केली. "जर कॅनडाला या करारात येण्याची इच्छा असेल तर कॅनडाचं स्वागतच आहे किंवा जर त्यांना नव्यानं बोलणी करायची असेल तर त्यासाठीही अमेरिकेची तयारी आहे," असं ट्रंप यांनी स्पष्ट केलं.

"NAFTA या कराराला एक नकारात्मक अर्थ प्राप्त झाला आहे, त्यामुळे NAFTA च्या अटींवर पुनर्विचार व्हायला हवा," असं ट्रंप गेल्या वर्षभरापासून म्हणत होते. सोमवारी झालेल्या करारात कॅनडाचा सहभाग नव्हता. कॅनडाबरोबर आज (मंगळवारी) बोलणी होणार आहेत.

NAFTAमुळं अमेरिकेतलं उत्पादन क्षेत्र विशेषतः वाहन क्षेत्राला फटका बसल्याची तक्रार ट्रंप यांनी केली. त्यामुळे या करारावर पुनर्विचार व्हावा असं त्यांचं मत आहे.

फोटो स्रोत, EPA

या घोषणेमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या घोषणेनंतर अमेरिकेन कंपन्यांचे शेअर वधारले आणि मेक्सिकन पेसोला बळकटी आली आहे.

1. ट्रंप काय म्हणाले?

व्हाइट हाऊसमधून प्रक्षेपित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ट्रंप म्हणाले, 'अमेरिका आणि मेक्सिकोतला हा करार अद्भुत आहे. या करारात मान्य झालेल्या अटींचं वर्णन 'न्याय्य'हून अधिक अशा स्वरूपाचं आहे.'

NAFTAवर पुनर्विचार करून नवा करार कसा असावा यावर तज्ज्ञ वर्षभरापासून काम करत आहेत. पण मागील पाच आठवड्यापासून कॅनडा या प्रक्रियेचा भाग नाही असं लक्षात आलं आहे.

त्यावर ट्रंप म्हणाले, "कॅनडाला नव्या करारात घ्यायचं की नाही ते आपण बघू किंवा त्यांच्याबरोबर वेगळा करार करण्याची अमेरिकेची तयारी आहे."

कार टेरिफवरून त्यांनी कॅनडाला धमकावलं आणि NAFTAला रद्द करून टाकू असा इशारा दिला. NAFTAचं नाव खराब आहे म्हणून आपण असं करू हे स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

2. कॅनडाची भूमिका काय आहे?

मेक्सिको-अमेरिका कराराची बोलणी झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि डोनाल्ड ट्रंप यांचं बोलणं झाल्याची माहिती ट्रुडो यांच्या कार्यालयाने दिली आहे. ट्रुडो आणि ट्रंप यांच्यात अर्थपूर्ण चर्चा झाल्याचं कार्यालयानं म्हटलं.

दोन्ही देशांतील शिष्टमंडळ मंगळवारी व्यापारी कराराबात चर्चा करणार आहे. त्यातून निश्चितच काही फलदायी निष्पन्न होईल, असा विश्वास त्यांच्या कार्यालयाला वाटतो.

फोटो स्रोत, Getty Images

ट्रुडो यांनी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिके पेना निएतो यांच्याशी रविवारी चर्चा केली आणि तिन्ही देशाला फायदा होईल असा करार करण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले.

3. नवा करार आत्ताच का?

मेक्सिकोमध्ये निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर विजयी झाले. ते डिसेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं स्वीकारतील. सध्याचे राष्ट्राध्यक्ष पेना निएतो यांनी मेक्सिकोचं ऊर्जा क्षेत्रं खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ओब्राडोर हे याविरोधात आहेत. जर व्यापारी ओब्राडोर यांच्या काळात करार करायचा असेल तर त्यामध्ये अनेक अडचणी येतील.

या महिन्याच्या अखेरीस हा करार पूर्ण करावा लागणार आहे. करारावर स्वाक्षरी होण्याच्या किमान 90 दिवस आधी कराराचा मसुदा अमेरिकन काँग्रेसला दाखवावा लागणार आहे. म्हणजे शुक्रवारी हा मसुदा काँग्रेसमध्ये जाईल.

ओब्राडोर यांनी म्हटलं आहे की आज झालेला द्विपक्षीय करार हा नव्या कराराची पहिली पायरी आहे. हा करार तिन्ही देशांनी एकत्रित करावा यावर आमचा भर असेल. मुक्त व्यापार कराराबाबत जी धारणा होती त्याच स्वरूपात तो असावा.

4. कॅनडा सहभागी होईल का?

कॅनडाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अॅडम ख्रिस्तिया म्हणाले की अमेरिका आणि मेक्सिकोनं उचललेल्या पावलांनी आम्ही उत्साहित आहोत.

व्हीडिओ कॅप्शन,

पैशाची गोष्ट : ट्रेड वॉरचा भारतावर परिणाम होईल का?

कॅनडाचं आणि मध्यमवर्गीयांचं हित ज्यात असेल तशाच प्रकारच्या नव्या NAFTA करारावर आम्ही स्वाक्षरी करू असं त्यांनी सांगितलं. या करारात कॅनडाला सहभागी करून घेण्याची इच्छा अमेरिकेनं दाखवली आहे.

पण जर काही कारणानं कॅनडा यात सहभागी झालं नाही तर अमेरिका आणि मेक्सिकोत करार कायम ठेवला जाईल असं मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री लुईस विडेगारे यांनी म्हटलं.

5. काय आहे या करारात?

NAFTAमध्ये वार्षिक उलाढाल 1000 अब्ज डॉलर (1 लाख कोटी) इतकी आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स, डीजिटल ट्रेड, गुंतवणूकदारांच्या समस्या आणि इतर गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे.

या कराराचं स्वरूप कसं राहील याबाबत ट्रंप यांनी घोषणा केली आहे. दोन्ही देशात निर्माण झालेल्या 75 टक्के उत्पादनांवर कर लादला जाणार नाही या गोष्टीवर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे असं अमेरिकेनं सांगितलं.

अमेरिकेचे कार गुंतवणूकदार मेक्सिकोत गुंतवणूक करतात. तिथं कामगारांना कमी पगारात कामावर ठेवलं जातं. त्यामुळे अमेरिकेतली गुंतवणूक मेक्सिकोत जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कामगारांना प्रतितास 16 डॉलर दराप्रमाणे मजुरी असावी असा नियम करण्यात येईल.

6. डेडलाईनच्या आधी काम पूर्ण होईल का?

हा करार पूर्ण व्हावा की नाही हे तिन्ही देशांच्या संसदेच्या हातात आहे. अमेरिकेत रिपब्लकिन पक्षाची सत्ता आहे. मुक्त व्यापारासाठी त्यांचं समर्थन असतं. त्यामुळे या प्रक्रियेला गती येईल असं म्हटलं जात आहे. या करारात कॅनडाला सहभागी कसं करून घेता येईल तसेच दोन्ही पक्षांचं आम्हाला समर्थन कसं मिळेल याकडे लक्ष देण्यात येईल असं रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन कॉर्निन यांनी म्हटलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)