लिबियाच्या राजधानीत हिंसाचार, तुरुंगातून 400 कैद्यांचं पलायन

लिबिया हिंसाचारामुळे शेकडो कैद्यांना पळण्याची संधी मिळाली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

लिबिया हिंसाचारामुळे शेकडो कैद्यांना पळण्याची संधी मिळाली.

लिबियाची राजधानी त्रिपोली शहरात दोन सशस्त्र गटांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान संधी साधत जवळजवळ 400 कैद्यांनी तिथल्या तुरुंगातून पलायन केलं आहे.

पोलिसांनुसार कैद्यांनी या 'ऐन आरा' तुरुंगाचे दरवाजे तोडले आणि फरार झाले. हाताबाहेर गेलेल्या कैद्यांपासून जीव वाचवण्याच्या नादात तुरुंगातील सुरक्षारक्षक काहीही करू शकले नाहीत.

तिथे दोन गटांत सुरू असलेला संघर्ष पाहता तिथल्या सरकारने आणीबाणी घोषित केली आहे. तिथल्या सरकारला संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा आहे.

एन आरा तुरुंगात असलेले बहुतांश कैदी लिबियाचे नेते मुहम्मद गद्दाफी यांचे समर्थक आहेत. 2011 मध्ये गद्दाफी सरकारविरुद्ध उफाळलेल्या असंतोषावेळी लोकांची हत्या करण्याच्या आरोपाखाली ते दोषी आढळले होते.

आता काय झालं?

रविवारी लिबियाच्या राजधानीत एका निर्वासितांच्या कँपवर झालेल्या रॉकेट हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचं आपात्कालीन सेवा पुरवणाऱ्या लोकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

कट्टरवादी गटांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे हजारो लोकांनी आपल्या घरातून पलायन केलं आहे. गेल्या काही दिवसांत त्रिपोलीत सुरू असलेल्या या हिंसाचारात कमीत जवळपास 47 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात अनेक सामान्य नागरिकांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

लिबियामध्ये उफाळलेल्या हिंसाचारातून अनेक नागरिकांनी पलायन केलं आहे

लिबियामध्ये सामान्यत: संयुक्त राष्ट्र समर्थकांची सत्ता असते. मात्र देशाच्या बहुतांश भागावर कट्टरवादी गटाचं नियंत्रण आहे.

हिंसाचार का झाला?

गेल्या आठवड्यात सशस्त्र गटांनी त्रिपोलीच्या दक्षिण भागावर हल्ला केला आणि हिंसाचार सुरू झाला. तेव्हापासून या गटांचा स्थानिक सरकारला पाठिंबा देणाऱ्या सशस्त्र गटांविरुद्ध संघर्ष सुरू आहे.

लिबियामध्ये Government of National Accord (GNA) सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त आहे. या सरकारने अशा हिंसक कारवायांना "देशात राजकीय अस्थिरता आणण्याचा प्रयत्न" असल्याचं सांगितलं. "या संघर्षानंतर शांत बसणार नाही कारण देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका आहे," असंही सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

मानवाधिकार संघटनांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे, ज्यात आतापर्यंत 18 नागरिकांच्या मृत्यूची बातमी आहे. यात चार लहान मुलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचलंत का

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)