ब्राझील : 200 वर्षं जुन्या संग्रहालयाला आग, 2 कोटी मौल्यवान वस्तू धोक्यात?

ब्राझील

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

ब्राझील

ब्राझीलमधील रिओ दे जनेरो येथील राष्ट्रीय संग्रहालयाला मोठी आग लागली आहे. इतिहासातील 2 कोटी वस्तूंचं जतन असलेलं हे ही देशातील सगळ्यांत जुनी वैज्ञानिक संस्था आहे.

अग्निशामक दलातील लोक ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. या संग्रहालयात करण्यात आल्या आहेत. रविवारी लागलेल्या या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, आणि यात जीवितहानी झाली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या संग्रहालयालयात एकेकाळी पोर्तुगीज राजघराण्याचे लोक राहायचे. या वर्षाच्या सुरुवातीला संग्रहालयाचा 200वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला होता.

ब्राझीलमधील टीव्हीवर या आगीची क्षणचित्रं दाखवण्यात येत आहेत. काल संग्रहालयाची वेळ संपल्यावर ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली.

"हा दिवस संपूर्ण ब्राझीलसाठी अत्यंत दु:खद आहे. इमारतीला झालेल्या नुकसानामुळे इतिहासाची किंमत मोजता येत नाही" असं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिचेल तेमर यांनी ट्विटरवर सांगितलं.

ब्राझीलमधील ग्लोबो या टीव्ही चॅनलला मुलाखत देताना संग्रहालयाच्या संचालकांनी ही घटना म्हणजे सांस्कृतिक संकट असल्याचं सांगितलं.

ब्राझीलच्या इतिहासाशी निगडित हजारो गोष्टी या संग्रहालयात आहेत. तसंच इजिप्तमधील कलाकुसरीच्या वस्तू आहेत, असं संग्रहालयाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

संग्रहालयाच्या आगीतून काही वस्तू वाचवण्याचं प्रयत्न सुरू आहेत

संग्रहालयाच्या निसर्ग इतिहास विभागात डायनासोरची हाडं ठेवण्यात आली आहे. तसंच एका स्त्रीचा 12,000 वर्षं जुना सांगाडा आहे. अमेरिकेच्या इतिहासातला तो सगळ्यांत जुना सांगाडा आहे.

या संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी संग्रहालयाच्या अनुदान कपातीबद्दल आणि इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत कल्पना दिल्याचंही सांगण्यात येत आहे.

विश्लेषण : केटी वॅटसन, बीबीसी दक्षिण अमेरिका प्रतिनिधी

ब्राझीलमध्ये लागलेल्या या आगीमुळे फक्त इतिहासच भक्ष्यस्थानी पडलेला नाही, तर ते संपूर्ण देशच भक्ष्यस्थानी पडल्याचं ते द्योतक आहे.

वाढता हिंसाचार, लयाला गेलेली अर्थव्यवस्था आणि राजकीय भ्रष्टाचार यामुळे रिओ दे जनेरो शहराची अधोगती झाली आहे. फक्त 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतच ब्राझीलने कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक केली होती.

पण या स्पर्धेनंतरची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. सरकारने अनुदानात घट केली आहे, हिंसाचार वाढला आहे आणि पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

हेही वाचलंत का

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)