हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या जलालुद्दीनचा मृत्यू

फोटो स्रोत, AFP
जलालुद्दीन हक्कानी
अफगाणिस्तानमधील हक्कानी नेटवर्क या कट्टरपंथीय संघटनेचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानी याचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानने त्याच्या मृत्यूची घोषणा केली. तालिबान आणि अल कायदा या दोन्ही संघटनांशी जवळचे संबंध असलेला जलालुद्दीन अफगाणिस्तानमधील प्रमुख कट्टरपंथी होता.
अफगाणिस्तान आणि तिथल्या NATO सैनिकांवर सुनियोजित हल्ले करण्यात हक्कानी नेटवर्कचा हात होता. 2001पासून हक्कानी नेटवर्कची जबाबदारी जलालुद्दीनच्या मुलाकडे आहे.
जलालुद्दीनचा मृत्यू नेमका कधी आणि कुठं झाला याची माहिती देण्यात आलेली नाही.
त्याच्या मृत्यूची बातमी यापूर्वीही आलेली होती. 2015मध्ये हक्कानी नेटवर्कमधील काही जणांनी बीबीसीला जलालुद्दीनच्या मृत्यूची माहिती दिली होती. पण याला दुजोरा मिळालेला नव्हता.
1980च्या दशकात जलालुद्दीन हक्कानी अफगाणमधील प्रमुख नेता होता. त्यावेळी जलालुद्दीन सोव्हिएट रशियाच्या विरोधात लढत होता. त्यावेळी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी जलालुद्दीन हक्कानी हा सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीसाठी (CIA) अत्यंत महत्त्वाची 'संपत्ती' असल्याचं म्हटलं होतं. पण नंतरच्या काळात 1996ला जलालुद्दीन हक्कानीने तालिबानची बाजू घेतली.
तालिबानने प्रसिद्धी पत्रकात जलालुद्दीनची स्तुती केली असून तो मोठा जिहादी होता, असं म्हटलं आहे.
2001मध्ये अमेरिकेने अफगाण मोहीम सुरू केल्यानंतर हक्कानी नेटवर्क अफगाण-पाकिस्तान सीमेवर कार्यरत आहे. या गटाचं बरंच काम पाकिस्तानमधून चालतं. अफगाणिस्तानमधील काही मोठ्या हल्ल्यांत हक्कानी नेटवर्कचा हात होता. काबुलमध्ये 2017मध्ये झालेल्या ट्रक बाँबच्या स्फोटात 150 लोक ठार झाले होते, त्यामागे हक्कानी नेटवर्कचा हात होता.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)