जपान : गेल्या 25 वर्षांतलं सर्वांत भयंकर चक्रीवादळ धडकलं

किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन धडकत आहेत.

फोटो स्रोत, KYODO/VIA REUTERS

फोटो कॅप्शन,

किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन धडकत आहेत.

गेल्या 25 वर्षांतलं सर्वांत भयंकर असं चक्रीवादळ जपानच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. या पार्श्वभूमीवर दहा लाखांपेक्षा अधिक लोकांना सावधगिरीचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

जेबी चक्रीवादळामुळे पश्चिम भागात जमीन धसल्याची घटना घडली आहे. 172 किलोमीटर प्रतितास वेगानं वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.

ओसाका खाडी परिसरात एक ट्रक उलटला तर क्योटोमध्ये रेल्वेस्टेशनच्या छताचा काही भाग कोसळला आहे.

या चक्रीवादाळात अजूनपर्यंत कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसंच हे चक्रीवादळ जसजसं पुढे सरकेल तशी त्याची तीव्रता आणखी कमी होत जाण अपेक्षित आहे.

या वादळामुळे शिकोकू बेटावर मंगळवारी दुपारी जमीन धसल्याची घटना घडली. त्यानंतर हे वादळ जपानमधलं सर्वांत मोठं बेट होन्शूकडे सरकलं.

या वादळामुळे समुद्राला उधाण येण्याबरोबरच किनारपट्टीवर उंच लाटा धडकू शकतात. पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसंच भूस्खलनाच्या घटना घडू शकतात. असा इशारा देण्यात आला आहे.

याआधीच काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला असून प्रशासनानं लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत.

फोटो स्रोत, TWITTER/@R10N_SR/VIA REUTERS

फोटो कॅप्शन,

जोरदार वादळामुळे सार्वजनिक वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

याचा परिणाम वाहतूकीवरही झाला आहे. शेकडो विमानं, फेरी बोट आणि ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. ओसाकातल्या कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पुराचं पाणी साचलं आहे.

जपानमधील ओसाकाचा जगप्रसिद्ध युनिर्व्हसल स्टुडिओ बंद करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, AFP PHOTO / KAGAWA PREFECTURAL POLICE

फोटो कॅप्शन,

जोरदार वाऱ्यामुळे ट्रक पलटी झालेत.

पंतप्रधान शिंजो आबे यांनी तातडीची बैठक बोलावत लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावं, असं आवाहन केलं आहे.

किनारपट्टीवर धडकणाऱ्या लाटांमूळे भूस्खलन आणि राडारोडा उडत असल्याचं फुटेज समोर आलं आहे.

फोटो स्रोत, EPA

जुलै महिन्यात गेल्या दशकातल्या सर्वांत भयंकर पुरामुळे आणि भूस्खलनामुळे दोनशे लोकांना आपला जीव गमावावा लागला होता. त्यानंतर उष्माघाताची लाट आली होती आणि आता हे चक्रीवादळ आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)