'शुगर डॅडी' हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

फोटो स्रोत, Nyasha Kadandara
जगातल्या अनेक देशांमध्ये गर्भश्रीमंत माणसं शुगर डॅडी होत आहेत. पण शुगर डॅडी म्हणजे नक्की आहे तरी काय? हे समजून घेणं फार कठीण नाही.
अनेक तरुण मुली ऐषोआराम आणि सुखसोयीयुक्त राहणीमानासाठी पैसे पुरवू शकतील अशा वडिलांच्या वयाच्या माणसाची निवड करतात. त्यांच्याबरोबर त्या वेळ व्यतीत करतात. तरुण मुलींच्या मोठ्या वयाच्या साथीदाराला शुगर डॅडी असं म्हणतात.
शुगर डॅडी प्रकार सध्या केनियात बोकाळला आहे.
सेक्स व्यवहाराचं हे नवं रूप असल्याची चर्चा आहे. मात्र दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. तो समजून घेण्यासाठी इवा नावाच्या तरुणीला भेटा.
19 वर्षीय इवा ही केनियातल्या नैरोबी एव्हिएशन कॉलेजची विद्यार्थिनी. स्वत:च्या छोट्याशा खोलीत इवा बेचैन आहे. तिच्याजवळ 100 केनियाई शीलिंग इतकेच पैसे आहेत. पुढच्या काही दिवसांत खर्च कसा भागवायचा हा प्रश्न तिला पडला आहे.
इवा तयार होऊन घराबाहेर पडली आहे. बस पकडून ती सिटी सेंटरला पोहोचली आहे. तिच्यासोबत सेक्स करू शकेल अशा व्यक्तीच्या ती शोधात आहे. केवळ दहा मिनिटात तिचा शोध संपतो. सेक्सच्या बदल्यात तिला 1000 केनियाई शेलिंग देऊ शकेल असा पुरुष तिला भेटला आहे.
यात फायदा काय?
इवाच्या तुलनेत शिरोचं परस्पर टोकाचं आयुष्य आहे. सहा वर्षांपूर्वी शिरो विद्यापीठात शिकत होती. त्यावेळी ती 18-19 वर्षांची असेल. त्यावेळी शिरोची भेट एका लग्न झालेल्या माणसाशी झाली. तो माणूस तिच्यापेक्षा 40 वर्षांनी मोठा होता.
पहिल्या भेटीवेळी त्या माणसाने शिरोला काही भेटवस्तू दिल्या. मग तो तिला सलूनमध्ये घेऊन गेला. दोन वर्षांच्या संबंधांनंतर त्या माणसाने शिरोला एक अपार्टमेंट घेऊन दिली.

चार वर्षांत शिरोसाठी त्या माणसाने नियारी भागात एक भूखंड विकत घेतला. या सगळ्याच्या बदल्यात तो त्याला हवं असेल तेव्हा शिरोबरोबर सेक्स करत असे. शिरोने स्वत:साठी शुगर डॅडी शोधल्याचं तुम्हाला एव्हाना कळलं असेलच.
केनियन समाजात शिरोसारख्या मुलींची संख्या वाढत चालली आहे. सोशल प्लॅटफॉर्म्सपासून बार, रेस्तराँपर्यंत अशा बहुविध ठिकाणी शिरोसारख्या मुली दिसू लागल्या आहेत.
युनिव्हर्सिटी ऑफ नैरोबीमध्ये शिकणारी सिलास नयानचावनी या नव्या ट्रेंडबद्दल सांगतात. शुक्रवारी युनिव्हर्सिटी होस्टेलच्या बाहेर नजर टाकली की वेगळंच दृश्य पाहायला मिळतं. मंत्री-नेत्यांच्या गाड्या वेगानं दाखल होतात आणि मुलींना घेऊन जातात.
'कोवळ्या वयात माझ्यावर बलात्कार झाला...'
शुगर डॅडींशी नातं जोडणाऱ्या मुलींची नेमकी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
मात्र यासंदर्भात बीबीसी आफ्रिकाच्या वतीनं बोसारा सेंटर फॉर बिहेव्होरिअल इकॉनॉमिक्स असं एक संशोधन हाती घेतलं. या अभ्यासासाठी 18 ते 24 वयोगटातल्या 252 विद्यार्थिंनींना प्रश्न विचारण्यात आले. यापैकी 20 टक्के विद्यार्थिंनीनी शुगर डॅडींशी संबंध असल्याचं सांगितलं. आपल्या ओळखीत मित्रमैत्रिणींपैकी 24 टक्के जण शुगर डॅडींशी संबंधित असल्याचं मुली सांगतात.
सामाजिक बदलाचे संकेत
या पाहणीसाठी विचारणा करण्यात आलेल्या मुलींची संख्या खूपच अल्प आहे. मात्र या पाहणीतून केनियातल्या समाजात घडणाऱ्या बदलाचे संकेत स्पष्टपणे समोर आले आहेत.
जेन 20 वर्षांची आहे. जेनने स्वत:साठी दोन शुगर डॅडी शोधले आहेत. ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असलेल्या जेनचे टॉम आणि जेफशी स्वतंत्र नातेसंबंध आहेत.
जेन तिच्या अनुभवाबद्दल सांगते. ती म्हणते, "ते नेहमी मदत करतात. मात्र प्रत्येकवेळी सेक्सची अपेक्षा नसते. अनेकदा केवळ बोलण्यासाठी किंवा सहवासासाठी कोणीतरी हवं असतं."

फोटो स्रोत, NYASHA KADANDARA
जेन
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं जेनचं म्हणणं आहे. छोट्या बहिणींना मदत करता यावी यासाठी पैसे आवश्यक असतात. म्हणून जेनने हा धाडसी निर्णय घेतला आहे. नैरोबी डायरी नावाच्या रिअलिटी शोमध्ये जेनसारख्या मुलींची कहाणी दाखवण्यात येत आहे.
जेनसारखी ब्रिजेटचीही गोष्ट आहे. नैरोबीतल्या झोपडीपट्टीवाल्या काइबेरा परिसरात ब्रिजेट राहते. ती घरकाम करून गुजराण करत होती. आता ब्रिजेटचं नाव सोशल मीडियावर सातत्यानं झळकतं. ब्रिजेट यांनी एक सेक्सी व्हीडिओ शूट केला. त्यानंतर त्यांच्या फॉलोइंगमध्ये झपाट्याने वाढ झाली.
चांगलं आयुष्य हवंय
एवढंच नव्हे तर शुगर रिलेशननंतर त्यांचं आयुष्यच बदललं आहे. एकापेक्षा एक महागड्या ब्रँडचे कपडे आणि बॅगा आता ब्रिजेट घेऊन वावरतात. आयुष्यात चांगलं जगून पाहायचं आहे, असं ब्रिजेटचं म्हणणं आहे.
25 वर्षांच्या ग्रेसचंही असंच काहीसं म्हणणं आहे. उत्तर नैरोबीत राहणारी ग्रेस सिंगल मदर आहे. त्यांना गायिका व्हायचं आहे. त्या नाइट क्लबमध्ये गातात. त्यांचं करिअर घडवण्यात मदत करू शकेल अशा पुरुषाशी त्यांना संबंध जोडायचा आहे.

फोटो स्रोत, Nyasha Kadandara
ग्रेस
शुगर डॅडी प्रकारावर जोरदार टीकाही होते आहे. अशा स्वरुपाच्या संस्कृतीमुळे महिलांचं सक्षमीकरण होत नाही, असं टीकाकारांचं म्हणणं आहे.
या नव्या संस्कृतीमुळे महिलांच्या शरीराचा वापर आनंदासाठी करणाऱ्या पुरुषांची मक्तेदारी निर्माण होत असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.
महिलावादी विचारवंत ओयंगा पाला यांचंही म्हणणं याच धर्तीवरचं आहे. "आफ्रिकेत महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. जी माणसं सेक्शुअली अक्टिव्ह आहेत त्यांना शुगर डॅडी संस्कृतीमुळे स्वैराचाराचा परवाना मिळाला आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)