इडलिबवर विजय मिळवून होणार का सीरियाच्या युद्धाचा शेवट?

सीरिया

फोटो स्रोत, AFP

सीरियाचं युद्ध शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. सीरिया आणि रशिया इडलिबवर जोरदार हल्ला करण्याच्या बेतात आहे. मात्र हा विजय म्हणजे साधासुधा विजय नसेल.

इडलिब इतकं खास का आहे?

हा प्रांत म्हणजे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना सत्तेवरून हटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचा बालेकिल्ला आहे.

UNच्या मते इडलिबमध्ये 29 लाख लोक राहतात. त्यातील 10 लाख लहान मुलं आहेत. या शहरातील बहुतांश लोक बंडखोरांच्या ताब्यातल्या भागातून पळून आले आहेत.

सीरिया

फोटो स्रोत, AFP

जसजसा सरकारनं बंडखोरांच्या ताब्यातल्या ठिकाणावर ताबा मिळवला तसंतसे तिथले लोक पळून इडलिबमध्ये आले.

इथे जर बंडखोरांचा पराभव झाला तर सीरियातल्या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांची संख्या कमी होईल.

इडलिबमध्ये बंडखोरांचा पराभव झाला तर तो त्यांचा अंत असू शकतो.

इडलिब कोणाच्या नियंत्रणाखाली आहे?

या भागावर कोणत्याही एका गटाचा दबाव नाही. सगळ्या गटांचे मिळून इथे तीस हजार सैनिक आहेत.

सध्या या शहरातला सगळ्यांत शक्तिशाली गट हयात तहरीर अल शम म्हणजे HTS हा आहे. या जिहादी गटाच्या तारा अल कायदाशी जुळलेल्या आहेत.

HTSचा प्रांताच्या राजधानीशिवाय तुर्कस्तानच्या सीमेवर असलेल्या बाब अल हवा नाम यांच्या सीमेवर ताबा आहे. UNच्या मते ती एक कट्टरतावादी संघटना आहे. या संघटनेत जवळजवळ 10 हजार सैनिक आहेत. त्यातील अनेक लोक परदेशातून आलेले आहेत.

सीरिया

फोटो स्रोत, AFP

NLF म्हणजेच नॅशनल लिबरेशन फ्रंट ही हा या शहरातला दुसरा प्रभावी गट आहे. या संघटनेवर तुर्कस्तानचा वरदहस्त आहे. याच वर्षी, HTSचा दबदबा कमी करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

हल्ल्याची तयारी आताच का?

इडलिबच्या लढाईचा कौल आता राष्ट्रपती असद यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. सीरियाचा मित्रपक्ष असलेल्या रशियाच्या हवाई हल्ल्यामुळे आणि इराणचं समर्थन असलेल्या हजारो सैनिकांच्या मदतीने देशातल्या इतर बंडखोरांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

30 ऑगस्टला सीरियाचे परराष्ट्र मंत्री वालिद मुआलेम यांनी घोषणा केली की, आता सरकारचं लक्ष्य इडलिब शहर आहे. इडलिब ताब्यात घेण्यासाठी सीरिया कोणताही त्याग करण्यास तयार आहे.

आधीच तुर्कस्तानमध्ये सीरियाचे 30 लाख शरणार्थी आहेत. सीमेच्या जवळच्या युद्धामुळे पुन्हा एकदा लोक तुर्कस्तानला जाऊ शकतात, अशी भीती तुर्कस्तानला आहे.

इडलिबच्या लोकांचं काय होईल?

सैन्याच्या कारवाईमुळे तिथल्या भागात प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. आधीच तिथल्या वाईट परिस्थितीमुळे लोकांची परिस्थिती आणखी हलाखीची होईल. शहरात मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.

UNच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, इडलिबवरच्या हल्ल्याने आणखी एक संकट येऊ शकतं आणि आठ लाख लोक बेघर होण्याची शक्यता आहे.

सीरिया

फोटो स्रोत, AFP

इथले लोक शहर सोडून जातील का हे सांगणं सध्या कठीण आहे. कारण तुर्कस्तानने आधीच आपल्या सीमा सील केलेल्या आहेत.

हा हल्ला टाळता येऊ शकतो का?

सीरियामधील UNचे विशेष दूत स्टफन डे मिस्तुरा यांनी रशिया, इराण आणि तुर्कस्तान यांना घाई न करण्याची विनंती केली आहे.

त्यांनी दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे राजकीय चर्चेसाठी थोडा वेळ द्यायला हवा आणि दुसरं म्हणजे तिथल्या भागातील सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था केली पाहिजे.

सीरिया आणि रशियाने ही मोहीम स्थगित करायला हवी असं तुर्कस्तानला वाटतं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या तीन देशांमध्ये बैठक घेण्यात येणार आहे.

अमेरिकेने कायम बंडखोरांची साथ दिली आहे. सीरिया सरकार सगळ्या मर्यादा पार करत आहे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे सामान्य लोकांच्या सुरक्षेचा भरवसा देत येत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)