सीरियातल्या इडलिबमधील युद्ध न रोखल्यास लाखो बळी : UN

फोटो स्रोत, Reuters
सीरियातल्या बंडखोरांच्या ताब्यात असणाऱ्या इडलिब प्रांतात रशिया आणि तुर्कस्तानच्या हल्ल्यांमुळे होणारा विध्वंस रोखण्यासाठी यूनोने त्वरित कारवाई करायला सांगितलं आहे.
सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद रशियाच्या पाठिंब्याने दाट लोकवस्तीचा भाग असणाऱ्या इडलिबवर आक्रमण करण्याची योजना आखत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर यूनोने हा इशारा दिला आहे.
याआधी मिळालेल्या माहितीनुसार रशियन विमानांनी इडलिबच्या मोहमबल आणि जदराया भागात हल्ला केला ज्यात लहान मुलांसमवेत नऊ लोक मारले गेले आहेत.
इथे राहाणाऱ्या अबू मोहम्मद यांनी सांगितलं की, "सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गावांवर हवाई हल्ले होत होते."
स्थानिक निवासी अहमद म्हणाले की, "जेव्हा विमानं आमच्या घरांवर घोंगावू लागली तेव्हा आम्ही घरीच होतो. आम्ही घाबरलो आणि घर सोडून पळलो. मी इतरांनाही घर सोडायला सांगितलं. मला माहीत होतं की हे रशियन पुन्हा हल्ला करतील. तसंच झालं. त्यांच्या विमानांनी पूर्ण ताकदीनिशी आमच्या घरांवर हल्ला केला. तिसऱ्या वेळेस आमचं घर कोसळलं."
दरम्यान, यूनोचे शांतिदूत स्टाफन डा मिस्टूरा यांनी म्हटलं आहे की तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांनी याबाबत चर्चा केली पाहिजे.
यूनोचे विशेष सल्लागार आणि सीरियामध्ये विशेष दूत यान एगलँड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, "इदलिबमध्ये आता खरंच एका मानवतावादी आणि राजकीय धोरणांची गरज आहे. ही धोरणं यशस्वी झाली तर लाखो लोकांचे प्राण वाचतील."
"पण जर हे डावपेच अयशस्वी ठरले तर मात्र पुढच्या काही तासांत आपण असं युद्ध पाहू जे मागच्या कोणत्याही युद्धापेक्षा महाभयानक असेल. हे आपल्या पिढीतलं सगळ्यात भयंकर युद्ध असेल," असं ते म्हणाले.
फोटो स्रोत, AFP
त्यांनी पुढे म्हटलं की, "असं होऊ नये म्हणून आम्ही तुम्हा सगळ्यांच्या सामंजस्याला साद घालतो आहोत. हे सामंजस्य म्हणजे अलेप्पो, पूर्वी गूट आणि रक्का या ठिकाणी जे झालं ते पुन्हा न होऊ देणं. कोणत्याही शहराला वाचवण्याचा अर्थ हा नाही की त्या शहरात राहाणाऱ्यांचा बळी घ्यावा."
इडलिबमध्ये ज्याप्रकारे भीतीचं वातावरण पसरलं आहे त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. सगळ्या भागाला चारी बाजूंनी सैन्याने वेढा दिला आहे आणि आतमध्ये लोक आहेत. त्यांना भीती आहे की ते गोळीबाराच्या कचाट्यात सापडतील, असं ते म्हणाले.
इथे सध्या 30 लाख लोक आहेत आणि 10 लाख लहान मुलं आहेत. म्हणूनच आपल्याला इडलिबमध्ये होणाऱ्या युद्धाला कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं आहे. आधीच इथे राहणाऱ्या लोकांना इथे राहाण्यावाचून काही पर्याय नाहीये. इडलिबमध्ये युद्ध घोषित करणं म्हणजे एखाद्या शरणार्थी शिबिरात युद्ध केल्यासारखं होईल, असं ते म्हणाले.
यूनोमधल्या अमेरिकेच्या दूत निकी हॅली यांनी म्हटलं आहे की, इडलिबमध्ये परिस्थिती गंभीर असून तिथून किंकाळ्या ऐकू येत आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, "रशिया व्हाईट हेल्मेटसवर (सीरियातली नागरी बचाव संस्था) आरोप करत आहे. असदही हेच करत आहेत. जेव्हाही असद आपल्याच लोकांवर रासायनिक हल्ला करायला जातात तेव्हा असं घडतं."
"तुम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी रशिया, इराण आणि असद यांना दिलेला इशारा ऐकला आहे. अशा प्रकारचा कोणताही हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. यूनोची सुरक्षा परिषद इडलिबच्या लोकांवर रासायनिक हल्ल्यांची परवानगी देणार नाही. सीरियाच्या लोकांनी आधीच खूप सहन केलं आहे. सध्या परिस्थिती कठीण आहे," असं त्या म्हणाल्या.
असद यांच्या सैन्याने जर लोकांवर रासायनिक अस्त्रांनी हल्ला केला तर अमेरिका प्रत्युतरादाखल 'त्वरित आणि योग्य ती' कारवाई करेल, असं अमेरिकेने आधीच स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आधीच सीरिया सरकार, इराण आणि रशियाला इशारा दिला आहे की जर त्यांनी बंडखोरांच्या ताब्यात असणाऱ्या इडलिबवर हल्ला केला तर तो मानवतेविरुद्ध केलेला मोठा गुन्हा ठरेल.
ट्रंप यांनी बुधवारी ट्वीट करून सांगितलं की जर इडलिबवर हल्ला झाला तर हजारो लोक मारले जातील. असद यांनी अविचारानं हल्ला करू नये, असंही त्यांनी लिहिलं आहे.
दुसऱ्या बाजूला सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनेल्सनुसार इस्राईलच्या लढाऊ विमानांनी देशाच्या उत्तर-पश्चिम भागात असणाऱ्या सैन्यांच्या छावण्यांवर हल्ला केला आहे.
फोटो स्रोत, Reuters
टीव्ही चॅनेल्सनी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या या बातमीत लढाऊ विमानाला हमा आणि टार्टूस प्रांतात बऱ्याच कमी उंचीवरून उडताना पाहिलं आहे, असं म्हटलं आहे. या अधिकाऱ्याच्या मते काही इस्राईलच्या क्षेपणास्त्रांना खाली पाडलं आहे आणि काही लढाऊ विमानांना तिथून हुसकावलं आहे.
इस्राईलने अजून या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्राईलने सीरियावर हल्ला केल्याच्या बातम्या पहिल्यांदाच येत नाहीत. याआधीही इस्राईलने सीरियावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये त्यांनी इराणी सैन्याला लक्ष्य केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)