अफगाणिस्तान : आत्मघाती स्फोटात 2 पत्रकारांसह 20 ठार

अफगाणिस्तान स्फोट

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

दोन आत्मघाती स्फोटांच्या मालिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबुल पुन्हा हादरली आहे.

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दुहेरी आत्मघाती स्फोटात कमीत कमी 20 जण ठार तर 70 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हा स्फोट राजधानी काबुलमधल्या एका कुस्तीच्या क्लबमध्ये झाला.

पहिल्या आत्मघाती हल्लेखोराने क्लबमध्ये बाँबस्फोट करून चार जणांना ठार केलं तर दुसऱ्या आत्मघाती हल्लेखोराने कारमध्ये बसून स्फोट करत मदतकार्यासाठी आलेल्या लोकांना लक्ष्य बनवलं.

टोलो न्यूज चॅनलच्या दोन पत्रकारांचाही यात बळी गेला आहे. इतर चार जण कार स्फोटामुळे जखमी झाले आहेत.

हा हल्ला शिया मुस्लीमांचं प्राबल्य असणाऱ्या भागात झाला.

ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये टोलो चॅनलचे प्रमुख लोतफुल्लाह नजाफिजदा यांनी म्हटलं की, त्यांच्या वृत्तसंस्थेने दोन सर्वोत्तम पत्रकार गमावले आहेत.

या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणी स्वीकारली नसली तरी अशा प्रकारचे हल्ले कथित इस्लामिक स्टेटने या दाश्त-ए-बारची जिल्ह्यात याआधी घडवून आणले आहेत.

हा भागात हाजरा या अल्पसंख्यांक समुदायाचे वास्तव्य आहे.

एप्रिल महिन्यात खोस्त प्रदेशात बीबीसीच्या प्रतिनिधीचीही हत्या झाली होती.

पत्रकारांसाठी सर्वाधिक धोकादायक असणाऱ्या देशांपैकी अफगाणिस्तान तिसरा सर्वात धोकादायक देश असल्याचं रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेने 2017 साली केलेल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)