आई, तू जगात नाहीस, माझ्या बाळाला तुझ्याबद्दल कसं सांगू?

फोटो स्रोत, Getty Images
प्रतिनिधिक फोटो
काही आठवड्यांपूर्वी जेव्हा तिच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा रॉबिन हॉलिंगवर्थला ती गोड बातमी सगळ्यांत आधी तिच्या आईला सांगायची होती. पण ती सांगू शकली नाही कारण तिच्या आईनं या जगाचा निरोप घेऊन 10 वर्षं झाली आहेत.
पण ही गोड बातमी आईला न सांगता तरी कसं राहाणार? म्हणून रॉबिनने या जगात नसलेल्या तिच्या आईला एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलं.
प्रिय आईस,
आमच्या छोटूकल्याचा जन्म झाला तेव्हा चांगलच उकडत होतं. जुलै महिन्यातली रात्र होती ती. माझे डोळे जागरणाने लाल झाले होते, आम्ही खूप थकलेलो होतो पण आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
हॉस्पिटल कुठे होतं माहितेय? तू आणि बाबा पहिल्यांदा भेटलात त्या चेल्सापासून हाकेच्या अंतरावरच. ज्या लाल विटांच्या घरात तुम्ही आयुष्यभर एकमेकांची साथ दिलीत ते घरसुद्धा अगदी जवळ होतं तिथून.
टेडीचा, माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मला बराच त्रास झाला. त्या पठ्ठ्याने माझे दिवस भरल्यानंतरही तब्बल 12 दिवस लावले जगात यायला. (त्याच्या भविष्यातल्या सवयींची ही झलक नसली म्हणजे मिळवलं.) तो माझ्या पोटातच खूश होता, त्यामुळे तर अक्षरशः डॉक्टरांना त्याला ओढून बाहेर काढावं लागलं.
मला वाटलं त्याने तुझ्यासारखं दिसावं, पण तो तसा दिसत नाही. एवढंच काय, तो माझ्यासारखा किंवा माझा नवरा अँडीसारखाही दिसत नाही. आतापासूनच त्याचं स्वतःचं असं व्यक्तिमत्व आहे.
माझा जन्म झाला तेव्हा तुलाही एवढाच त्रास झाला का गं? मला माहितेय माझ्या वेळेस तुझी काही नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही. माझ्या मुलाच्या वेळेस माझंही तसंच होईल अशी मला भीती होतीच.
फोटो स्रोत, Robyn Hollingworth
रॉबिनची आई आणि रॉबिन
किती किती प्रश्न आहेत मला, काय सांगू. मला असं का होतंय? असं का वाटतंय? त्याने हे केलं तर चालेल ना? याचा रंग हा असाच असतो का? त्याच्या तोंडात द्यायच्या खेळण्यांच काय? त्याने रडू नये म्हणून त्याला चोखायला दिलेल्या पॅसिफायरचं काय? त्याला द्यायच्या औषधांचं आणि बेबीफूडचं काय? त्याला नॅपी रॅश आले तर?
तू जवळ होतीस तेव्हा तुला हे प्रश्न विचारण्याचा विचारच कधी डोक्यात आला नाही. विशीत तर होते मी. आणि तेव्हा मूल वगैरे होऊ द्यायचा विचारही नव्हता डोक्यात. आणि तुझ्या शेवटच्या दिवसात माझ्याविषयी आणि माझ्या भविष्याविषयी तुझ्याशी कसं काय बोलू शकले असते मी?
त्या दिवसात माझं सगळं लक्ष तुला वेळेवर औषधं देण्यात, तू जेवणार नाहीस हे माहित असतानाही तुझ्यासाठी स्वयंपाक करण्यात आणि तुला शेवटचं भेटायला येणाऱ्या नातेवाईकांचं, आल्यागेल्याचं करण्यात असायचं.
हे कमी की काय म्हणून मला बाबांकडेही बघावं लागायचं. विशेषतः त्यांना स्मृतिभ्रंश झाल्यापासून तर त्यांना सांभाळणं सोपं नव्हतंच.
मी तुम्हा दोघांना अनेकदा खूप मिस करते. खरंतर आई, आत्ता मला तुझ्या सहवासाची खूप गरज आहे. कारण मुलगी आई बनते तेव्हा तिला तिच्या आईची फार गरज असते.
मी सगळंच आंधळेपणाने करतेय. मला काही कळत नाही, कोणी सांगायला नाही. तू पण असंच केलं असशील कदाचित. मला आणि गेरथला (रॉबिनचा भाऊ) केनिया आणि दुबईसारख्या देशात वाढवताना तुलाही कदाचित कोणाचा आधार नसेल. व्हीडिओ कॉलिंग आणि चॅटिंग अॅप्स स्वप्नवत वाटावेत असा जमाना होता तो. तरीही तू हिमतीने मार्ग काढलास. तुझ्या आईवडिलांशी संपर्क करायचा तुझ्याकडे एकच मार्ग होता, अधूनमधून तार पाठवणं.
मी आणि गेरेथ लहान होतो तेव्हाच्या आमच्या गोष्टी तुझ्याकडून ऐकाव्यात अशी माझी फार इच्छा आहे. गेरेथला आठवतं, तू त्याला पिवळ्या प्लास्टिकच्या टबमध्ये स्वयंपाकघरातल्या किचनमध्ये आंघोळ घालायचीस. मीही तस्संच करते. फक्त माझ्या बाळाचा टब पांढरा आहे.
फोटो स्रोत, Robyn Hollingworth.
रॉबिन आणि तिचा भाऊ गेरेथ
तू नाहीस तर ज्या काही अर्धवट आठवणी आहेत त्यांच्यावरच अवलंबून राहावं लागतंय मला. बाबांनी एकदा मला सांगितलं होतं की माझा जन्म झाला तेव्हा गेरेथला ते दुबईतल्या एका खेळण्यातल्या दुकानात घेऊन गेले.
माझ्या जन्मानंतर आता आपले आईवडील वाटले जातील आणि आपल्यावर कोणी प्रेम करणार नाही असं त्याला वाटू नये म्हणून ते त्याला खेळण्याच्या दुकानात घेऊन गेले.
गेरेथने एक प्लास्टिकची गिटार घेतली म्हणजे तो मला गाणं गाऊन दाखवू शकेल. मला ही गोष्ट खूप आवडते कारण बाबांचं आमच्यावर असणार प्रेम आणि गेरेथला संगीतातलं काही कळत नसलं तरी त्याची हौस त्यातून दिसली.
एकदा असंच तू सांगितलं होतंस की आखाती देशातल्या भयानक उकाड्यात दिवसभर आमच्या मागे फिरून फिरून थकल्यानंतर तू कशी गच्चीवर बसायचीस जीन आणि टॉनिकचे घुटके घेत. तुला गरज असायची त्याची.
मीही आता बसलेय यूकेतल्या या हीटव्हेवमध्ये आणि मला वाटतं मी म्हणजे तूच आहे. जणू काही तुझाच पुनर्जन्म झालाय माझ्यात. मी एक एक घोट घेते आहे. गरम हवेचा झोत माझे अश्रू सुकवतो आहे. पण मला तू जाणवतेस आसपास आणि माझ्या आईपणाच्या सगळ्या चिंता नाहीशा होतात.
आई तुला माहितेय, मी गरोदर असताना मला सतत वाटायचं की कोणीतरी माझ्यवर लक्ष ठेवून आहे. चांगल्या अर्थाने. मला वाटायचं की तू आणि बाबा माझ्यासोबत आहात.
तुम्ही शरीराने हे जग सोडून गेला असलात तरी. या जगात नसलेले तुम्ही आणि या जगात न आलेला माझा मुलगा असे तिघं जण माझ्या सोबतीला होतात. असं वाटायचं की माझ्या एकमेकांना कधीही भेटू न शकणाऱ्या माझ्या प्रियजनांना जोडणारा मी एक दुवा बनलेय.
फोटो स्रोत, Robyn Hollingworth
रॉबिन आणि तिचा मुलगा
आता माझ्या मुलाचा जन्म झालाय तर तो दुवा हरवल्यासारखं वाटतं आहे. तो मोठा होईल तेव्हा त्याच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ मी? तो विचारेल की माझे आजीआजोबा कुठे आहेत? त्याचं उत्तर दिलं की विचारेल तुम्ही पण मराल का एक दिवस? त्याला काय सांगावं हे मला माहीत नाही.
आई, तुम्ही तुमच्या नातवाला कधी भेटू शकणार नाही. पण माझी इच्छा आहे की तुम्ही एकमेकांना ओळखावं. गेरेथ गेला आहे या अनुभवातून.
तो म्हणतो की बाप झाल्यानंतर मला जाणवलं की आईबाबांना सॉरी म्हणायला हवं. त्यांची माफी मागायला हवी. सगळ्यांच गोष्टींसाठी - रात्ररात्र घरी न येण्यासाठी, रडण्यासाठी, ओरडण्यासाठी, नाटक करण्यासाठी, मोठं होताना जो काही गोंधळ घातला होता त्यासाठी. पण गंमत म्हणजे तुमच्या दृष्टीने तो गुणी बाळ होता. मग माझं तर विचारूच नका.
त्याने मस्त वाढवलंय त्याच्या मुलाला. तो खूप चांगला वडील आहे. त्याचा मुलगा ओळखतो तुम्हाला. लहानपणापासूनच तुमच्या फोटोकडे बोट दाखवून सांगायचा की हे माझे आजीआजोबा आहेत. त्याला माहितेय की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम केलं असतं.
आई तुला काय वाटतं? मी चांगली आई होऊ शकेन? मला माहितेय की तरुणपणात इतरांची फारशी काळजी करायचे नाही. तुम्हा दोघांची काळजी घ्यायला मी घरी परत आले नव्हते तोपर्यंत मीही कोणाविषयी कधी काळजी केल्याचं मला आठवतं नव्हतं.
फोटो स्रोत, Robyn Hollingworth
वडिलांना स्मृतीभ्रंश झाल्यानंतर आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायला रॉबिन नोकरी सो़डून घरी आली होती.
पण तुमची काळजी घ्याला आले आणि त्या अनुभवाने मला पूर्णपणे बदललं. मग मला पटलं की मी निर्व्याज प्रेम करू शकते. त्यासाठी स्वतःला झोकून देऊ शकते.
मी परफेक्ट नाहीये. मीही बाबांवर चिडायचे जेव्हा ते त्यांचा फोन चुकून फ्रीजमध्ये ठेवायचे किंवा ब्रेकफास्टसाठी चिकन चाऊमिन मागवायचे. बाळाने शी केलेल्या चादरी धुता धुता आता मी हुंदके देत असते. त्या बाळाला जसं काही कळत नाही तसंच बाबांनाही शेवटी शेवटी काही कळायचं नाही.
आई, तुम्हा दोघांचे शाब्दिक खटके तर मी प्रचंड मिस करते. मला वाटतं तुम्ही यावं आणि मला सांगावं की तुमच्या काळी मुलं वाढवणं किती अवघड होतं आणि माझ्या बाबतीत ते किती सोपं झालं आहे.
तू सांगावसं, 'अगं ठीक आहे, बाळाला वाढवणं एवढंही काही अवघड नाही.' आईपणाचा आनंद घे, अगदी बाळाची शू, शी, लाळ आणि उलटीने तुझे कपडे भरलेले असले तरी.
पण मला सगळ्यात जास्त काय हवंय तर तू त्याला पाहाणं, त्याला भेटणं, त्याला स्पर्श करणं.
फोटो स्रोत, Robyn Hollingworth
रॉबिन, तिचा मुलगा, तिचा भाऊ, त्याचा मुलगा आणि रॉबिनचा नवरा (सगळ्यात उजवीकडे)
तूही त्याच्यावर तेवढंच प्रेम करावंस जेवढं मी करते. इतकंच नाही तर त्यानेही तुझ्यावर तेवढंच प्रेम करावं जेवढं मी करते. या जगात कधीच प्रेमाची कमतरता भासू नये.
रॉबिन हॉलिंगवर्थ या 'My Mad Dad: The Diary of an Unravelling Mind' या पुस्तकाच्या लेखिका आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)