ब्राझील : वेळ न पाळणाऱ्या अतरंगी लोकांचा निवांत देश

  • ल्युसी ब्रायसन
  • बीबीसी प्रतिनिधी
लेट

फोटो स्रोत, Getty Images

आयुष्य हे जणू एखाद्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यासारखं अगदी निवांत आहे, अशी वृत्ती अंगी बाणवत एकंदरीतच सगळ्या गोष्टींतली सावकाशी त्यांच्या जगण्यात पसरलेली दिसते. ब्राझीलकर त्यातही विशेषतः रिओ दि जानेरोमधल्या रहिवाशांचा हा गुण अगदी उठून दिसतो. कुणीही कितीही काहीही म्हटलं तरी त्यांनी `ठेविले अनंते तैसैचि रहावे` असंच बहुधा मनात म्हणत ना वक्तशीरपणा शिकायचा प्रयत्न केला ना तो समजून घेतला.

रिओ दि जानेरोमधल्या एका घरातल्या पार्टीची ती संध्याकाळ अजूनही आठवते. पार्टीसाठी वेळेत पोहचलेली मी आणि त्यानंतरचा काळ आठवताना काहीसं कचरायलाच होतं.

मॅंचेस्टरहून रिओला स्थलांतरित झाल्यानंतर साधारणपणं तीनेक महिन्यांनी मला एका पार्टीचं निमंत्रण आलं. शनिवारी रात्री churrasco - इन्फॉर्मल बार्बेक्युचा बेत आखला होता. अशा अनौपचारिक ठिकाणी आणि तोंडओळख असलेल्या ठिकाणी गेल्यामुळं काही वेळा विविध सामाजिक स्तरांवच्या व्यक्तींच्या ओळखीपाळखी होतात, प्रसंगी काहींशी मैत्र जुळायलाही असे प्रसंग कारण ठरतात. पण तिनं सांगितलेल्या वेळेनुसार मी तिच्या दरवाज्यापाशी येऊन उभी राहिले खरी, पण माझी मैत्रिण अशी काही दिसत होती की, क्षणभर मला वाटलं की, चुकीच्या दिवशी तर आले नाहीये ना...

शॉवर घेताघेता मी आल्यानं टॉवेल गुंडाळून घाईघाईनं बाहेर आलेल्या मैत्रिणीनं मला 'लिव्हिंग रूममध्ये जा' असं हातवारे करून सांगितलं. तिकडं मी मोर्चा वळवला खरा पण सतराशेसाठ प्रकारच्या शॉपिंग बॅग्ज, अन्नपदार्थांचे पॅक्स, ढीगभर कपडेलक्ते सगळ्या खोलीभर पसरलेले होते. एखादा अर्धवट विनोद केल्यासारखी ती कुजबुजली की, "Ainda nao estou pronta!" - "I'm not ready yet!" अर्थात `मी अजून तय्यार झालेले नाहीये.`

फोटो स्रोत, Daniel J Hoffman)

मी स्वतःच स्वतःला धीर द्यायचा निष्फळ प्रयत्न केला. शाकाहारी असल्यानं बार्बेक्यूच्या तयारीसाठी काही मदत करणं शक्य नव्हतं आणि त्याविषयी माझं ज्ञानही तोकडं होतं. तिनं पटकन टीव्ही लावला. त्यावर एक दिखाऊ गेम शो चालू होता आणि मी तो तल्लीन होऊन बघण्याचा बहाणा करू लागले. मग ती चटकन लिव्हिंग रूममधून आत निघून गेली.

हो, तिला स्वतःला आणि पार्टीच्या जागेला सौंदर्य बहाल करायचं होतं. जवळपास चाळीसेक मिनिटांचा वेळ असातसाच निघून गेला. मग मात्र मला काळजी वाटू लागली. माझ्या व्यतिरिक्त इतर कुणीही आलं नव्हतं किंवा तशी चिन्हंही दिसत नव्हती. इतकंच काय माझी होस्टही (यजमानीण) बेफिकीरपणं वागत होती आणि खरोखरच सांगते की, दिलेल्या वेळेहून साधारण तासभर अधिक काळ लोटल्यानंतर इतर पाहुण्यांची वर्दळ मंदगतीनं वाढू लागली. नंतर अंदाजे तीन तासांत अवघं घर पाहुणेमय झालं.

ठरलेल्या वेळेला येऊन मी तिथला एक महत्त्वाचा सामाजिक रिवाज खोटा ठरवला होता. वेळेच्या बाबतीतली नियमितता पाळण्याकडं इथल्या लोकांचा कल दिसत नाही. विशेषतः रिओमधले रहिवासी तर वक्तशीरपणाच्या बाबतीत फारच ढिसाळ आहेत.

दक्षिण ब्राझीलमधील 'टेक्नॉलॉजी ऑफ प्राणा'ज क्युरिटाबा कॅम्पसच्या इंग्लिश लिटरेचरचे प्रोफेसर डॉ. जॅकलीन बॉन डोनाडा म्हणतात की, "पार्टीला ठरलेल्या वेळी पोहचून वेळ पाळण्यामुळं या देशभरात कुठंही विशेषतः रिओमध्ये फारच अवघडलेली परिस्थिती निर्माण होते. म्हणजे जवळपास पार्टीला बोलावलेलं नसताना आपण तिथं गेलो तर जी परिस्थिती उद्भवेल तोच प्रकार वेळेवर हजर राहिल्यानं होतो."

या शहरातील 'life's a beach' अर्थात सावकाशपणाच्या वृत्तीची आणि रोजच्या कामांतही दिरंगाई होण्याची कारणं काहीही असू शकतं. ट्रॅफिक किंवा योगायोगानं एखाद्या जुन्या मित्राची वाटेत गाठ पडणे, असं काहीही कारण असू शकतं. त्याला रिओच्या स्थानिक भाषेत Cariocas असं म्हटलं जातं. हे लोक एकतर वेळेचं महत्त्व मानत नाहीत आणि एकूणच सामाजिक जीवनात वक्तशीरपणा किती महत्त्वाची गोष्ट आहे हेही जाणून घेत नाहीत. उलट पद्धतशीरपणं ठरवलेल्या गोष्टी रिओमध्ये अगदी चौपट होऊ शकतात आणि पार्टीचा होस्ट व इतर मंडळींमुळं पार्टी उशिरा सुरू होणार ही वस्तुस्थिती विनयशीलपणं स्वीकारायला हवी.

फोटो स्रोत, Ben Fisher/Alamy

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"एक अलिखित नियम असा आहे की, पार्टी सुरू होण्याच्या दिलेल्या वेळेपर्यंत होस्टनं वाट पाहिली पाहिजे आणि मगच शॉवर घ्यायला गेलं पाहिजे," असं स्पष्टीकरण पोर्तुगीज-इंग्लिश भाषांतरकार फिओना रॉय देतात. ते मूळचे यूकेमधील असून गेली ६ वर्षं रिओमध्ये राहात आहेत.

ब्राझिलियन-पोर्तुगीज भाषेत या मुद्द्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. वेळेचे निर्देश करणाऱ्या शब्दांचं थेट इंग्रजीत भाषांतर होणं अवघड होतं. 'atrasar' या क्रियापदाचा अर्थ समजावून सांगताना तो 'to be late' किंवा 'to cause lateness' असा सांगावा लागतो. तर demorar हे क्रियापद म्हणून वापरताना त्याचा ढोबळ अर्थ 'take a long time' असा होतो. एखादी व्यक्ती muito enrolado/a (शब्दशः 'very tangled') असेल तर demorar or atrasar हे वापरले जातात. मात्र 'abacaxi' or 'pineapple' हे शब्द वापरताना मात्र शब्दांची संपत्ती पणाला लागते, कारण त्यांचा अर्थ समजावून सांगताना अर्थाच्या काट्यांचे अडथळे पार करावे लागतात.

वेळेचं पालन करणाऱ्या 'hora inglesa' हा शब्द असून त्याचा अर्थ 'English Time' असा काढला जातो. कारण यूके किंवा अमेरिकेत वेळ आणि वक्तशीरपणाचं पालन अगदी काटेकोरपणं केलं जातं.

रिओमध्ये आल्यावर सुरुवातीच्या काळात मी स्थानिकांचं म्हणणं शब्दशः मानण्याची चूक काही वेळा केली. मग हाती होतं ते केवळ वाट पाहाणं (या वाट बघण्यात पहिल्या डेटसाठी एका बारमध्ये अवघे दोन तास पाहिलेली वाटही आलीच) यावरून मी एक वाक्यांश शिकले की, estou chegando ('I'm arriving'), याचा अशक्षरशः अर्थ कधीच काढायचा नाही. त्याचा अर्थ इतकाच मानायचा की ठरल्याप्रमाणं ती व्यक्ती त्या ठिकाणी येणार आहे इतकंच. मग ते येणं पाच मिनिटांत असेल किंवा दोन तासही लागू शकतील.

फोटो स्रोत, Ben Fisher/Alamy

डॉ. बॉन डोनाडा आणखी उलगडून सांगतात की, "विलंब करणं हे एक प्रकारे राष्ट्रीय गुणवैशिष्ट्य मानलं पाहिजे, पण तेही इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा हे वैशिष्ट्य रिओमध्ये प्रकर्षानं जाणवतं." ते पुढं म्हणतात, "रिओमध्ये कुणी 'estou chegando' असं म्हटलं तर कुणीही त्याचा अर्थ शब्दशः घेत नाही. माझे एक बॉस होते, ते घरून फोन करून सांगायचे की ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत आणि लवकरच ऑफिसला पोहचतील. पण तेव्हा आम्हाला त्यांच्या शॉवरचा आवाज ऐकू येत असे. इथं दक्षिणेत यामुळं आपण रागावतो खरं पण रिओमध्ये पूर्णपणं स्वीकारलं गेलं आहे."

वक्तशीरपणाबाबतचा हा निष्काळजी दृष्टिकोन नवीन नाही. 'ब्राझिलियन अँडव्हेंचर : अ जर्नी इनटू द हार्ट ऑफ द ब्राझिलियन अमेझॉन' या १९३३मधल्या पुस्तकात लेखक पीटर फ्लेमिंग यांनी थोडक्यात आणि स्पष्टपणं आपलं निरीक्षण 'a man in a hurry will be miserable in Brazil' असं नोंदवलं आहे.

हे केवळ वरवरचं निरीक्षण नव्हे. तर रिओवर लिहिलेल्या प्रकरणात फ्लेमिंग म्हणतात की, "उशीर हा जणू ब्राझीलच्या वातावरणाचाच एक भाग आहे. त्यातच आपण जगायला हवं. त्यापासून आपली सुटका नाही. त्याबाबतीत काही करणं ही गोष्ट अशक्यप्राय आहे. मला वाटतं की, हे स्वभाववैशिष्ट्य झपाटल्यासारखं सगळ्यांनी अंगी बाणलं असून ते जणू ब्राझिलियन्सच्या अभिमानाचा हा एक भाग ठरल्यानं त्याकडं दुर्लक्षही करता येणं शक्य नाही. इतर कुठल्याही देशाला ही गोष्ट अभिमानास्पद वाटणार नाही."

फोटो स्रोत, Y.Levy/Alamy

सिमॉन फॉर्सेका मॅरेक या इथल्या माजी रहिवासी सध्या जर्मनीमध्ये राहातात. त्या कबुल करतात की, "जर्मनीच्या कामकाजाच्या वेळापत्रकानुसार काम करणं ही गोष्ट थोड्या सरावानं जमली. एकदा प्रेझेंटेशनसाठी मी कंपनीत काही मिनिटं आधीच पोहचले आणि काम सुरू केलं. तिथं जवळपास २०जण माझ्याआधीच पोहचलेले होते आणि माझी वाट पाहात होते. खरंतर मला उशीर झालेला नव्हता पण तो झाला आहे असं मला वाटू लागलं कारण ते सगळेजण माझ्याआधीच तिथं पोहचलेले होते आणि मी पोहचल्यावर मिटिंग वेळेवर सुरू व्हायची वाट पाहात होते."

फ्लेमिंग त्यांच्या पुस्तकात म्हणतात की, "विलंब होण्याच्या या बाबीवर चिडणं ही उपाय बिल्कुलच नाही. कारण त्यामुळं केवळ नैराश्यच हाती येईल. रिओकरांना सुधारण्याच्या गोष्टीनं कितीही भुरळ पाडली, हेतू कितीही प्रामाणिक असला तरीही आहे ती जीवनशैली बदलता येणं ही मोठी कठीण गोष्ट आहे."

फॉर्सेका मॅरेक म्हणतात की,"मला वाटतं की, आम्ही विलंबवादी आहोत कारण आम्ही आशावादी आहोत. आमच्या अपॉइंटमेंटची वेळ गाठेपर्यंत मधल्या काळात आम्ही कितीतरी गोष्टी करू शकतो, असं आम्हांला वाटतं - आणि तरी आम्ही ते करू शकलो नाही, तरीही ठीकच आहे."

पण विलंबामुळंही काही गोष्टी काही वेळा अधोरेखित होतात आणि त्या तशा घडणं (अलिखित असल्या तरी) घडू देणंच चांगलं. रॉय म्हणतात की, "वेळेचं ओझं घेऊन कुठंतरी वेळेत पोहाचायचं आहे असं म्हणून धावत राहाण्यापेक्षा मला हा चिंतामुक्त दृष्टिकोन आवडतो. पण एकदा माझा वाढदिवस होता. काही मित्रमंडळींनी एका बारमध्ये पार्टी ठेवली होती. मी जवळपास दिवसभर आणि अर्धीअधिक संध्याकाळ केकवर आईसिंग करण्यात आणि तयार होण्यात घालवली आणि अखेरीस ठरल्या ठिकाणी पोहचल्यावर दिसलं की बार जवळपास बंद होण्याच्या मार्गावर होता. मला जरा जास्त उशीर झाला होता."

फोटो स्रोत, Intersection Photos/Alamy

"स्थानिकांनी किमान बिझनेस मिटिंग्जसाठी तरी वक्तशीरपणा पाळला पाहिजे. त्या काही सोशल इव्हेंटस् नव्हेत. आपल्याला वाटेल तेव्हा आपण यावं, पण किमान ठरल्या वेळेच्या अर्धा तासहून अधिक उशीर तरी करू नये," असं फॉर्सेका मॅरेक म्हणतात.

पहिल्याच वेळी विलंबाबाबतीतला हा धडा मी शिकला आणि त्यानंतर मी रिओमधल्या नऊ वर्षांच्या वास्तव्यात हे कधीही विसरले नाही. खरंतर लवकरच मीदेखील छानपैकी फॅशनेबल होऊन लेट येऊ लागल्यावर माझ्या पाठीवर शाबासकीची थाप पडली. आणि काहीकाही वेळा तर मी विलंबकरांच्याहूनही (Carioca friends) उशीरा पोहचू लागले, तेव्हा त्यांनी मनगटांवरल्या घड्याळ्याच्या काट्याकडं निर्देश करत म्हटलं की, ``virou Brasileria`` - ``you`ve turned Brazilian.``

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)