ब्राझील : राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारावर प्रचारफेरीत जीवघेणा हल्ला

ब्राझील, जायर बोलसेनारो

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार जेर बोलसेनारो यांच्यावर प्रचारफेरीत चाकू हल्ला करण्यात आला. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मायनस जुरे या प्रांतात सुरू असलेल्या प्रचारफेरीत कडव्या उजव्या विचारसरणीचे वादग्रस्त राजकारणी जेर बोलसेनारो यांच्यावर गर्दीचा फायदा घेत चाकू हल्ला करण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली आहे.

बोलसेनारो यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांच्या आतड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली.

जेर बोलसेनारो हे वादग्रस्त राजकारणी आहेत. वंशभेदी आणि LGBT समुदायाबद्दल त्यांनी केलेल्या विधानांवरून ब्राझीलमध्ये गदारोळ झाला होता. कलचाचण्यांमध्ये त्यांना भरघोस समर्थन मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, AFP

माजी अध्यक्ष ल्युईझ इनासिओ लुला डीसिल्व्हा यांच्यावर निवडणुका लढवण्यास असलेली बंदी कायम राहिली तर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पहिल्या फेरीत त्यांना सर्वाधिक मतं मिळतील, असं कलचाचण्यांचे निकाल सांगतात.

डाव्या विचारसरणीचे लुला हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील आरोप सिध्द झाल्यानं त्यांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कसा झाला हल्ला?

जुएज दे फोरा या शहरात प्रचारफेरीत चाहत्यांना अभिवादन करत असताना बोलसेनारो यांच्यावर हल्लेखोरानं चाकू हल्ला केला.

ते जागीच कोसळले, चाहत्यांनी त्यांना तत्काळ गाडीत ठेवले.

या हल्ल्यानंतर त्यांचा मुलगा फाल्विओ यानं ट्वीट केलं की, "दुर्देवानं, आम्हाला वाटलं त्यापेक्षा ती जखम अधिक गंभीर होती. रक्त बरचं वाहिलं आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा त्याचं बीपी 10/3 एवढं खाली आलं होतं, म्हणजे जवळजवळ ते गेल्यातच जमा होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपण प्रार्थना करूया!"

फोटो स्रोत, Reuters

हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यानं म्हटलं की, बोलसेनारो यांना गंभीर दुखापत झाली आहे. आतड्याला झालेली जखम जीवघेणी होती. पण आता त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. त्यांच्यावर दोन तास शस्त्रक्रिया चालली. त्यांना किमान एक आठवडा ते 10 दिवस हॉ़स्पिटलमध्ये राहावे लागेल.

हॉस्पिटलच्या बेडवरून बोलसेनारो बोलत असल्याचा एक व्हीडिओही प्रकाशित करण्यात आला आहे. "तो केवळ एक फटका वाटला पण नंतर असह्य वेदना होऊ लागल्या. मी कोणालाही कधी इजा केलेली नाही," असं बोलसेनारो यांनी त्यात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

संशयित हल्लेखोराचं पोलिसांनी प्रसिद्ध केलेलं छायाचित्र.

पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. अॅडलिओ ओबिस्पो डे ऑलिविरा असं त्याचं नाव आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार त्याचे मानसिक संतूलन बिघडलेले आहे. बोलसेनारो यांच्यावर हल्ला केल्यानंतर समर्थकांनी त्याला धक्काबुक्की आणि मारहाण केली. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)