इजिप्तमध्ये 700 मोर्सी समर्थकांना शिक्षा; 75 जणांना फाशी, 47 जणांना जन्मठेप

इजिप्त

फोटो स्रोत, EPA

जुलै-2013मध्ये इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी यांची सत्ता लष्करानं उलथून टाकली. त्यावेळी मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेनं मोर्सी यांच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन केलं. त्या आंदोलनात हिंसाचार उफाळून आला होता.

या आंदोलनात सहभागी झालेल्या 700 जणांना इजिप्तच्या न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे.

त्यातल्या 75 जणांना फाशी तर 47 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यात काही मुस्लिम नेत्यांचाही समावेश आहे.

"ही कारवाई अतिशय अयोग्य आहे. त्यातून इजिप्तच्या राज्यघटनेचं उल्लघंन होत आहे," असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनं म्हटलं आहे.

मोर्सी यांना पुन्हा सत्तारूढ करण्याच्या मागणीसाठी मोर्सी सर्मथकांनी राबा-अल-अदाविया इथे निदर्शनं केली. त्यात झालेल्या हिंसाचारानंतर शेकडो जण लष्कराच्या कारवाईत ठार झाले होते.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

2013मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी ही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

जुलै 2013 ते जानेवारी 2016 या काळात केलेल्या गुन्ह्यांपासून इजिप्तच्या संसदेनं लष्कराच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच अभय दिलं आहे.

हिंसाचारासाठी प्रवृत्त करणं, हत्या आणि अनधिकृतरित्या आंदोलन करणं असे सुरक्षा उल्लंघनासंबंधीचे असे आरोप या 700 जणांवर ठेवण्यात आले होते.

जुलै महिन्यात 75 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आता या सामूहिक खटल्याचा शेवट झाला आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

मेहमूद अबू झैद

जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या लोकांमध्ये सध्या बंदी घालण्यात आलेल्या मुस्लीम ब्रदरहूड संघटनेचे प्रमुख सदस्यांचा समावेश आहे. यात संघटनेचे सर्वोच्च मार्गदर्शक मोहम्मद बादी यांचंही नाव आहे.

या आंदोलनात महमूद झैद या पत्रकाराला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना आता 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निदर्शनादरम्यान फोटो काढताना त्यांना अटक करण्यात आली होती. 5 वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाला असल्याने त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

इजिप्तचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि तत्कालीन लष्कर प्रमुख अब्देल फतेह अल्-सिसी यांनी लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेल्या मोर्सी यांना पदच्युत केलं होतं. त्याच्या महिन्याभरानंतर मोर्सी यांच्या शेकडो समर्थकांना इजिप्तच्या लष्करानं आणि पोलिसांनी लोकांना अटक केली होती.

"इजिप्तच्या लष्करानं आतापर्यंत 817 जणांना ठार केलं आहे आणि ही कारवाई मानवी हक्काचं उल्लंघन करणारी आहे," असं Human Rights Watchनं म्हटलं आहे.

"अनेक आंदोलकांजवळ हत्यारं होती आणि त्यांच्या हल्ल्यात 43 पोलीस मृत्युमुखी पडले आहेत. तेव्हापासून मुस्लीम ब्रदरहूडला कट्टरवादी संघटना घोषित केलं आहे," असं इजिप्त सरकारनं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)