जखमा करून पाठ मगरीसारखी करतात हे आदिवासी पुरुष

मगर

जगभरात कितीतरी वेगवेगळ्या प्रथापरंपरा चालू आहेत. पण ही प्रथा तुम्ही कधी ऐकली नसेल. पापुआ न्यू गिनीमधले काही पुरुष मगरीसारखं दिसता यावं म्हणून स्वतःची कातडी तशी कापून घेतात. पण ते असं का करतात, काय आहे या मागे कारण?

पृथ्वीच्या पूर्व गोलार्धात आकारमानानं दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पापुआ न्यू गिनीमध्ये जवळपास ८०% लोक खेड्यांत राहतात. अगदी दुर्गम भागात राहणाऱ्यांचा तर बाहेरील जगाशी काहीच संपर्क नसतो. मार्क स्ट्रॅटन सांगतात की अशा भागात अनेक पारंपरिक प्रथा अजूनही सुरू आहेत.

पारांबी गावातल्या पुरुषांच्या 'स्पिरीट हाउस'च्या मोडकळीस आलेल्या छताच्या जाळीतून येणाऱ्या प्रकाशात पुरुषांमधील 'इनिशिएट्स' म्हणजे दीक्षाग्रहीच्या छातीवर अनेक खडबडीत व्रण दिसतात.

उत्तर पापुआ न्यू गिनीमध्ये असलेल्या सेपिक नदीच्या काठालगद असलेले हे 'स्पिरीट हाऊस' किंवा 'हाऊस ताम्बारण' हे तिथल्या प्रथापरंपरांचे केंद्र आहेत.

जगातल्या काही अवघड अशा दीक्षाग्रहण समारंभात 'सेपिक'चे पुत्र त्यांच्या पाठीवर, खांद्यांवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने कापून घेतात. हे व्रण नंतर मगरीच्या कातड्यासारखे दिसतात.

"मुलांना त्यांचे काका या स्पिरीट हाउसमध्ये घेऊन येतात. या सगळ्या प्रक्रियेला साधारण एक ते दोन तास लागतो," असं पाराम्बीचे मुख्य नगरसेवक मलिंगी सांगतात.

या पुरुषांच्या शरीरावरील जखमा पाहून ते ह्या पीडेचं दिव्य कसं पार पडत असतील, हे मला खरंच कळत नाही.

प्रतिमा मथळा पापुआ न्यू गिनीतील माणसांच्य पाठीवर असे व्रण असतात.

मलिंगी सांगतात, "काही मुलं ह्या वेदनेनं बेशुद्ध पडतात." "वयस्कर पुरुष या मुलाचं दुखणं शमवण्याकरीता बासरीवर धून वाजवतात. त्या जखमांवर वनस्पतीचं तेल आणि नदीतील माती लावली जाते.

ते सांगतात, "या जखमा शुद्धीकरणाचे प्रतीक आहेत. या प्रक्रियेत मुलांच्या शरीरातील आईकडून आलेले रक्त जाऊन, त्यांच्या धमन्यांमध्ये स्वतःचे पौरुषसंपन्न रक्त येतं, असा समज आहे."

जखमा करून घेतल्यानंतर ही मुलं त्या स्पिरीट हाउसमध्ये राहून दीक्षा घेतलेल्या ज्येष्ठ माणसांकडून आयुष्याचे धडे गिरवतात. "ते गावातील जीवात्म्यांबद्दल शिकतात. त्याच बरोबर मासे कसे पकडायचे, कोरीवकाम कसं करायचं आणि त्यांच्या पत्नीला आणि कुटुंबाला कसं सांभाळायचं हेदेखील शिकतात," असं मालिंगी सांगतात.

प्रतिमा मथळा मगरींची नक्षी

मी विचारलं की मगरीला सेपिकमध्ये इतकं महत्त्व कसं प्राप्त झालं? मालिंगी म्हणतात, "मगर हे शक्तीचं प्रतीक आहे. आम्ही मगरीला घाबरतो, पण त्या ताकदीतूनच आम्हाला उर्जा मिळते." सेपिकमधले लोक हे मगरीचेच वंशज आहेत, अशी अख्यायिका आहे.

४ दिवस सेपिक नदीच्या प्रवाहातून बोटीने प्रवास करताना मला कळालं की मगरीवरचा आणि मगरीची संबंधित असलेल्या गोष्टींवरचा विश्वास आणि शुद्धीकरण समारंभ या दोन्हीची मुळं मध्य सेपिक प्रदेशात खोलवर रुजलेली आहेत. पापुआ न्यू गिनीमधील तब्बल ८३२ भाषा बोलणाऱ्या गटांमधील लातमुल भाषा बोलणाऱ्या समाजाध्ये हे विशेषत्वाने जाणवतं.

ही गावं अतिशय दुर्गम आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर अजूनही बाहेरच्या जगाचा रंग चढलेला नाही. मासेमारी आणि सागो म्हणजे साबुदाणा या पिकाची शेती हे यांचं उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन. नगदी पिकांमध्ये ऊस असतो. डुकराचे पालन करून त्यांना कधी समारंभांमध्ये बळीदेण्यासाठी वापरतात तर कधी तंटे मिटवण्यासाठी त्यांचा चलनासारखा वापर होतो.

प्रतिमा मथळा अघोरी वाटणारी प्रथा पापुआ न्यू गिनीमध्ये आहे.

नदीकाठच्या काही सामुदायांमध्ये शुद्धीकरणाची ही प्रथा लोप पावलेली आहे. पाराम्बीपासून पूर्वेला अर्ध्या दिवसाच्या अंतरावर असणाऱ्या कामिनिम्बितमध्ये ख्रिस्ती धर्माच्या प्रचारप्रसार झाल्यामुळे शुद्धीकरण पूर्णपणे बंद केलं, असं मला सांगण्यात आलं. सेपिक प्रदेशात १८८५ साली जर्मन लोकांची सत्ता आल्यावर इथले लोक येशु ख्रिस्ताच्या शिकवणीकडे वळले.

इथे शुद्धीकरणाची प्रथा बंद झाली असली तरीही हाऊस ताम्बारण किंवा स्पिरीट हाउसेस चर्चच्या शेजारी आहे. आता त्यांचा क्लबसारखा वापर केला जातो.

उपनद्यांच्या आणि तलावांच्या दलदलीमध्ये वसलेल्या वोम्बूनमध्ये ज्येष्ठ पुरुषांच्या अंगावर या जखमा दिसून येतात. पण आता ह्या प्रथेचा अंत होत आहे. "मिशनरी या प्रथेच्या विरुद्ध होते," असं प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सिमोन केमाकेन सांगतात. "काही वर्षांच्या अंतराने हा समारंभ होतो तो केवळ मगरीचे पूजन करण्यासाठी. पण आता फार थोडीच मुलं आपल्या शरीरावर जखमा करून घेतात." त्या सांगतात की ह्या शुद्धीकरणाच्या समारंभाचा खर्च आता या तरुण मुलाच्या कुटुंबांना न परवडण्यासारखा आहे.

तरीही पाराम्बीमध्ये कॅथलिक चर्च असूनही शुद्धीकरण सर्वमान्य आहे. इथे चर्चचा प्रभाव कसा पडला नाही, असं मला प्रश्न पडला.

"आमच्या गावाचे मनोधैर्य कधी खचले नाही पण मिशनरींमुळे आमच्या प्रथांवर मोठा परिणाम झाला," असं मालिंगी यांनी मला सांगितलं. त्या क्षणी माझ्या मनात कोणत्याही पुरोगामी पाश्चिमात्य माणसाच्या मनात यावा असा विचार आला, "अरे! आपण या लोकांना आणि त्यांच्या परंपरांना स्वातंत्र्य का देऊ शकत नाही?"

मिशनरींनी मालिंगी यांच्या पूर्वजांना शिकार करून मुंडकी छाटण्यापासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला होता हेसुद्धा मालिंगी यांनी स्पष्ट केलं.

प्रतिमा मथळा पापुआ न्यू गिनीमधील एक नयनरम्य दृश्य

त्यांच्या दोन मोठ्या स्पिरीट हाउसेस पैकी एकात अनेक गाठी मारलेला दोर त्यांनी मला दाखवला. या दोराची प्रत्येक गाठ ही एका छाटलेल्या मुंडक्याचं प्रतीक होती. त्यांनी पुढे मला समजावलं की त्या प्रत्येक मुंडक्यावरून कातडी सोलून काढली होती आणि मांस वेगळं केलं होतं- हेच मांस डुकराच्या आणि कुत्र्याच्या मांसात एकजीव करून ते लहान मुलांना खायला देत असत. याने त्यांना ताकद मिळत असे. मला असं वाटतं की ही प्रथा अनेक वर्षांपूर्वी बंद पडली. ही प्रथा १९४३ साली बंद झाली, असा दावा त्यांनी केला तेव्हा मला आश्चर्य वाटलं.

नंतर त्यांनी मला सांगितलं की पुढचा मोठ्या प्रमाणावरचा शुद्धीकरण करून मगरीच्या पंथात मुलांना सामावून घेण्याचा समारंभ येत्या नोव्हेंबर महिन्यात आहे. त्याचं असं ठाम मत होतं की ही प्रथा पाराम्बीमध्ये सुरू राहिली पाहिजे. "मगरींना मारून कापणं यामुळे आम्हाला आयुष्यात काही ध्येय असल्याची चेतना मिळते. जेव्हा पुरुष या शुद्धीकरणाच्या त्रासदायक प्रक्रियेतून बाहेर पडतात, तेव्हा ते आयुष्यात कशालाही सामोरे जायला सज्ज होतात," असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics

महत्त्वाच्या बातम्या