जॅक मा : चीनचे अब्जाधीश उद्योगपती निवृत्ती घेऊन होणार शिक्षक

जॅक मा
फोटो कॅप्शन,

जॅक मा

चीनमधील सर्वांत श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले अलीबाबा ई कॉमर्सचे संस्थापक जॅक मा निवृत्ती घेणार आहेत. अलीबाबा ई कॉमर्सच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा ते सोमवारी राजीनामा देणार आहेत. द न्यूयॉर्क टाइम्सने ही बातमी दिली आहे.

कंपनीतील पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहणार आहेत. कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी ते संचालक मंडळावर कायम असतील.

जॅक मा यांनी 1999ला 'अलीबाबा'ची स्थापना केली. जगातील सर्वांत मोठ्या इंटरनेट कंपन्यांमध्ये 'अलीबाबा'चा समावेश आहे. ई-कॉमर्स, चित्रपट निर्मिती, क्लाउड सेवा अशांमध्ये या कंपनीची गुंतवणूक आहे. या कंपनीचं मूल्य 400 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे.

जॅक मा स्वतःच शिक्षक होते. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, "खरंतर हा शेवट नाही. ही एक नवी सुरुवात आहे. मला शिक्षणाची फार आवड आहे."

जॅक मा हे सोमवारी 54 वर्षांचे होतील. त्यांची वैयक्तिक संपत्ती 40 अब्ज डॉलर इतकी असून फोर्बजच्या यादीनुसार ते चीनमधील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.

बिल गेट्सच्या पावलांवर पाऊल ठेवत तेही स्वतःची संस्था स्थापन करणार आहेत. बिल गेट्स यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं ते गेल्या आठवडयात एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

"मी कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. पण एक गोष्ट करू शकतो. मी लवकर निवृत्त होऊ शकतो आणि पुन्हा शिकवण्याकडे जाऊ शकतो. मला वाटतं अलीबाबा या कंपनीचा सीईओपेक्षाही मी हे काम चांगलं करू शकतो," असं ते म्हणाले होते

मा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात इंग्रजीचे शिक्षक म्हणून केली होती. त्यांनी काही मित्रांसमवेत त्यांच्या फ्लॅटमधून 'अलीबाबा'ची सुरुवात केली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)