स्वीडनमध्ये उजव्या विचारांचं राजकारण जोरात : का आणि कसं?

स्वीडन निवडणूक

स्वीडनमध्ये सर्वसाधारण निवडणुकांसाठी मतदान होत आहे. पण यावेळची स्वीडनमधली निवडणूक वेगळी ठरली आहे. स्थलांतरितांना विरोध करणारा पक्ष स्वीडन डेमोक्रॅट्सने निवडणुकीत मुसंडी मारली असून पारंपरिक सोशल डेमोक्रॅट्स आणि मॉड्रेट्स या दोन्ही पक्षांना बहुमत मिळणार नसल्याची स्थिती आहे.

स्वीडनमधील निवडणुकीच्या प्रचारात स्थलांरितांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे. 2014ला झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत स्वीडन डेमोक्रॅट्सच्या जागा यावेळी दुप्पट होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान लुव्हीयान यांनी स्वीडन डेमोक्रॅटस पक्षावर अतिरेकीवादाचा आरोप केला असून या पक्षाला मतदान करणं धोकादायक ठरले, असा इशारा दिला आहे.

1. स्वीडन डेमोक्रॅट्स कोण आहेत?

स्वीडन डेमोक्रॅट्सना SD म्हणून ओळखलं जातं. निओ नाझी आणि अति उजव्या विचारांच्या संघटनांशी या पक्षाला जोडलं जात होतं. या पक्षाने संसदेत 2010ला प्रवेश मिळवला.

त्यानंतर या पक्षाने स्वतःची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यूकेतील अतिउजवी संघटना नॅशनल फ्रंट आणि त्यांच्या चिन्हातही साम्य होतं, म्हणून या पक्षाने स्वतःचं चिन्ह आणि झेंडा बदलला आहे.

फोटो कॅप्शन,

स्टेफान लुव्हीयान

कष्टकरी, कामगार वर्ग या पक्षाचा जनाधार आहे. आता या पक्षाला सुशिक्षित, महिला आणि उच्चवर्गीय यांनाही आकर्षित करायचं आहे.

जिमी ओकेसा 2005ला पक्षाचे नेते झाले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पक्षात वंशवादाला जागा नाही, अशी भूमिका घेतली होती. तसंच पक्षातून अनेकांची हकालपट्टी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

पण वंशवादाशी संबंधित अनेक प्रकरणांत हा पक्ष अडकला आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांत त्यांच्या एका उमेदवाराने 'स्वीडिश नागरिक गोरे असून स्वीडिश आमचा देश आहे,' असं गीत सोशल मीडियावर टाकलं होतं. ही बातमी Aftonbladet या वृत्तपत्रात आली होती.

गेल्या वर्षी या पक्षाच्या माजी सदस्यांनी अतिउजव्या विचारसरणीच्या Alternative for Sweden (AfS)ची स्थापना केली आहे.

2. काय आहेत मूळ मुद्दे?

स्वीडनची अर्थव्यवस्था तेजीत आहे. पण 2015पासून स्वीडनमध्ये मोठया प्रमाणावर होत असलेल्या स्थलांतरामुळे तिथल्या आरोग्य सुविधा, गृहनिर्माण, कल्याणकारी योजना यांवर मोठा ताण येत आहे.

स्वीडनने गेल्या वर्षी 1,63,000 इतक्या जणांना आश्रय दिला आहे. स्वीडनची लोकसंख्या विचारात घेतली तर युरोपियन युनियनमध्ये स्थलांतरितांना सामवून घेतलेला हा सर्वांत मोठा आकडा आहे.

जनतेच्या काळजीचं प्रतिबिंब स्वीडनच्या पारंपरिक पक्षांच्या भूमिकेतही दिसून येतं कारण या पक्षांनीही स्वीडनमध्ये स्थलांतरितांना सामावून घेण्याबद्दल त्यांची भाषा कडक केली आहे.

नागरिकांना वाढत्या हिंसेबद्दलही काळजी आहे. स्थलांतरितांवर झालेल्या गोळीबारांच्या घटना SD पक्षाशी जोडल्या जात आहेत. अर्थात सरकारी आकड्यांत तसा काही संबंध दिसत नाही, असं दिसतं.

SDया पक्षाला स्वीडनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं असंही वाटतं. त्यासाठी या पक्षाने "Swexit" हा प्रस्तावही दिला आहे. पण प्रबळ मध्यमार्गी पक्षांचा विरोध लक्षात घेता, या प्रस्तावाला फारस भवितव्य नाही.

स्थलांतराच्या बरोबरीनं तिथल्या मतदारांना हवामान बदलाचा मुद्दाही महत्त्वाचा वाटतो. दीर्घ आणि तीव्र उन्हाळा आणि जंगलात लागणाऱ्या आगी, असे मुद्दे इथल्या मतदारांना महत्त्वाचे वाटतात.

फोटो कॅप्शन,

जिमी ओकेसा

उष्णतेच्या लहरीत इथल्या 25 हजार हेक्टर भूभागावरील जंगलांना आग लागली होती. तसेच कुरणं जळाल्याने अनेक शेतकऱ्यांवर त्यांच्या गुरांना मारून टाकण्याची वेळ आली होती.

याच पार्श्वभूमीवर तिथल्या ग्रीन पार्टीचं समर्थन मात्र घटलं आहे. याचं कारण म्हणजे पक्षांतर्गत बरीच भ्रष्टाचाराची प्रकरणं चव्हाट्यावर आली आहेत, हे आहे.

तर दुसरीकडे पर्यावरणाचे मुद्दे आणि मुख्य प्रवाहातील मध्यम मार्गी डाव्या विचारांकडे झुकलेल्या पक्षांबद्दलची नाराजी यामुळे डाव्या पक्षालाही पाठिंबा वाढत आहे.

3. कोणाची येईल सत्ता?

पंतप्रधान स्टेफान लुव्हीयान अल्पमतातील सरकारचं नेतृत्व करतात. सोशल डेमोक्रॅटस आणि ग्रीन पार्टीचं आघाडी सरकारचं ते चालवत आहेत. पण गेल्या काही दिवसांत सोशल डेमोक्रॅटसचा पाठिंबा घटत आहे. तर पारंपारिक विरोधी पक्ष असलेल्या मध्यमार्गी उजव्या विचाराचं पक्ष असलेल्या मॉड्रेट्सचाही जनाधार घटत आहे.

आतापर्यंत झालेल्या चाचण्यांत असं दिसून आलं आहे की सोशल डेमोक्रॅट्सना निसटत्या फरकाने सत्ता मिळेल आणि त्यांना पुन्हा एकदा अल्पमतातील सरकार चालवण्याची संधी मिळेल, असं दिसतं. सोशल डेमोक्रॅट्स आणि मॉड्रेट्स या दोन्ही पक्षांनी SD सोबत सत्ता स्थापन करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)