पराभूत सेरेनाचा गोंधळ; 20 वर्षांच्या जपानी मुलींनं जिंकलं यूएस ओपन

सेरेना विलियम्स

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

पुरस्कार वितरण सोहळ्यात ओसाकाने अशा प्रकारे अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत जपानच्या 20 वर्षीय नाओमी ओसाकाने अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. मात्र सेरेनाच्या सामन्यातील वागणुकीमुळे ओसाकाचं यश झाकोळलं गेलं.

या सामन्यात तिच्या प्रशिक्षकांनी प्लेयर बॉक्समधून सूचना दिल्याने सेरेनाला चेअर अंपायरने ताकीद दिली. त्यावर सेरेना चिडली. त्यानंतर थोड्या वेळाने पॉईंट गमावल्याने सेरेनाने रॅकेट जमिनीवर आपटली. त्यानंतर कोड ऑफ कंडक्टचा भंग झाला म्हणून सेरेनाला गेम पेनल्टी देण्यात आली. त्यावरून सेरेना आणि चेअर अंपायर यांच्यात तुफान शाब्दिक चकमक झाली. सेरेनाने अंपायरचा उल्लेख चोर असा केला. ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सर्वांत नाट्यपूर्ण घटना म्हणून या सगळ्या प्रकाराचं वर्णन केलं जात आहे.

सामना संपल्यानंतर सेरेनाने अंपायर कार्लोस रॅमोस यांच्याशी हस्तांदोलनही केलं नाही.

त्यातही पुरस्कार वितरण सोहळ्यात ओसाकाच्या कौतुकाऐवजी चेअर अंपायरची हुर्यो उडवली गेली.

फोटो स्रोत, Getty Images

ग्रँड स्लॅम जेतेपद पटकवणारी ओसाका जपानची पहिली खेळाडू आहे. तिचं कारकीर्दीतीलं हे पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. ओसाका जपानचं प्रतिनिधित्व करते मात्र वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून ती अमेरिकेत आहे. तिची आई जपानी आहे आणि वडील हैतीचे आहेत.

सामना संपल्यानंतर सेरेनाने ओसाकाचं अभिनंदन केलं. या प्रकारामुळे ओसाका भावूक झाली होती. "आय एम सॉरी. अशा प्रकारे या सामन्याचा शेवट व्हायला नको होता," अशी प्रतिक्रिया तिनं दिली. ही प्रतिक्रिया देताना ओसाका रडत होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)