स्वीडन निवडणूक : निकाल जाहीर पण सत्तास्थापनासाठी जुगाड सुरू

स्वीडन Image copyright Reuters
प्रतिमा मथळा स्टॉकहोममध्ये जमलेले सोशल डेमोक्रॅट्स पक्षाचे समर्थक.

स्वीडनमध्ये झालेल्या निवडणुकीत दोन मुख्य पक्षांमध्ये सत्तेसाठी चढाओढ सुरू आहे. निवडणुकीच्या निकालांवरून असं दिसतंय की स्थलांतरितांच्या विरोधात असलेल्या पक्षाने गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत.

मतमोजणी जवळपास पूर्ण झाली असून सत्ताधारी मध्यममार्गी डाव्या विचारांची आघाडी मध्यममार्गी उजव्या विचारसरणीच्या आघाडीपेक्षा किंचित फरकानं पुढे आहे. सत्ताधारी डाव्या पक्षांच्या आघाडीला 40.6 टक्के तर उजव्या पक्षांच्या आघाडीला 40.3 टक्के मतं मिळाली आहे.

स्वीडन डेमोक्रॅट्स (SD) या पक्षानं जवळजवळ 18 टक्के मतं मिळवली आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांना 12.9% मतं मिळाली होती. त्यामुळे गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा असलेली युती आता दृष्टिक्षेपात आहे.

स्वीडनमध्ये संसदेत पक्षांना त्यांच्या मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची Proportional representation ही पद्धत आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाला त्यांच्या संख्याबळानुसारच जागा दिल्या जातात.

दोन्ही मुख्य आघाड्यांनी SD पक्षाबरोबर सरकार चालवण्यासाठी नकार दिला आहे. असं असलं तरी इतर पक्षांशी बोलणी सुरू असल्याचं SDच्या नेत्याने सांगितलं.

"आम्ही संसदेत आमच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या काही काळात स्वीडनमध्ये जे होणार आहे, त्यावर आम्ही आमचा प्रभाव नक्कीच पाडू," असं जिमी ओकेसा यांनी SD पक्षाच्या एका रॅलीत सांगितलं.

प्रतिमा मथळा स्वीडिश निवडणुकांमध्ये मतविभागणी

एक पंचमांश किंवा अगदी एक चतुर्थांश स्वीडिश जनता आपल्या पक्षाला मत देईल, असा त्यांचा अंदाज होता. अनेक मतचाचण्यांचे कलही याच्या जवळपासच होते. मात्र प्रत्यक्ष निकालात त्यांना दर सहापैकी एका नागरिकाचं मत मिळालं.

सध्या सत्तेवर असलेल्या आघाडीचे प्रमुख मावळते पंतप्रधान स्टिफन लुव्हीयान आहेत. या आघाडीत सोशल डेमोक्रॅट्स आणि ग्रीन पार्टीचा समावेश आहे. त्यांना संसदेत डाव्या पक्षाचं समर्थन आहे.

मध्ययामार्गी उजव्या विचारसरणीची आघाडी चार पक्षांपासून तयार झाली आहे. उल्फ क्रिस्टरसन हे या पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे. ते मॉडरेट्स पक्षाचे नेते आहे. त्यांच्या मते सत्ताधारी पक्षानं त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांनी आता राजीनामा द्यावा.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा जिमी ओकेसा

मात्र लुव्हीयान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी पक्षाच्या एका रॅलीत सांगितलं, "संसद पुन्हा सुरू होईपर्यंत आमच्याकडे दोन आठवडे आहेत. मी शांतपणे पंतप्रधानपद म्हणून काम पाहणार आहे तसंच स्वीडनच्या निवडणुकीच्या व्यवस्थेचा आणि मतदारांचा सन्मान ठेवणार आहे."

सोशल डेमोक्रॅट्स आणि मवाळवादी पक्षांच्या मतांच्या प्रमाणात घट झाली आहे. कारण SD आणि इतर छोट्या पक्षांना आघाडी मिळाली आहे. मात्र काही ओपिनियन पोलनुसार SD पक्षाची कामगिरी घसरली आहे.

तज्ज्ञांच्या मते मध्यममार्गी उजव्या विचारसरणीच्या लोकांना आघाडी प्रस्थापित करणं जास्त सोयीचं आहे. त्यासाठी त्यांना बऱ्याच वाटाघाटी कराव्या लागतील हेही तितकंच खरं.

स्थलांतर हा निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. SD पक्षानं स्थलांतरावर कडक कारवाईची मागणी केली आहे. लुव्हीयान यांनी या प्रकाराला वर्णभेदी असं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)