गायी-म्हशी पर्यावरणासाठी धोकादायक का आहेत?

गाय Image copyright Reuters

जागतिक तापमानवाढीमुळे चिंतेत असलेल्या वैज्ञानिकांना आणि पर्यावरणवाद्यांना बऱ्याच काळापासून गाय आणि म्हशीचे 'ढेकर' हा विषय सतावतो आहे.

वातावरणातील मिथेन वायूच्या अतिरिक्त प्रमाणासाठी गायी म्हशींचे ढेकर आणि त्यांच्या पोटातून निघणारा गॅस जबाबदार आहे.

मिथेनचं अतिरिक्त उत्सर्जन थांबवण्यासाठी गायींच्या आहारात सुधारणा आणण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. त्यांना लसूण, ओरेगॅनो, केशर आणि अन्य भाज्या खायला घालून त्यांचा परिणाम तपासण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गायीच्या पोटातून निघणारा गॅस कमीत कमी धोकादायक व्हावा यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी संशोधनाद्वारे नुकताच तोडगा काढला आहे.

वैज्ञानिकांच्या मते, गायीला सागरी शेवाळं खाऊ घातलं तर मिथेनचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होते.

या संशोधनाअंतर्गत वैज्ञानिकांनी एक डझन दुभत्या गायींना खाण्यासाठी सागरी शेवाळ खाऊ घातलं. त्यानंतर त्यांच्या पोटात तयार होणाऱ्या मिथेनचं प्रमाण तीस टक्क्यांनी कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या संशोधनात सहभागी असलेले पशुतज्ज्ञ अरमिया केब्रियाब म्हणतात, "संशोधनाचे निकाल पाहून मला आश्चर्य वाटलं. सागरी शेवाळामुळे असा परिणाम होऊ शकतो याची मला कल्पना नव्हती."

Image copyright Reuters

त्यांच्या मते या संशोधनाचा आधारावर त्यांची टीम सहा महिन्यांपर्यंत गायींचा सागरी शेवाळाचा आहार वाढवून त्याचा परिणाम पाहू इच्छितात. हे संशोधन यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल.

या संशोधनात सहभागी असलेले पशूतज्ज्ञ मायकेल हुचेन्स सांगतात, "आपण जर खाण्यात थोडासा बदल करून वातावरणात असलेल्या मिथेनचं प्रमाण कमी करू शकलो तर कार्बन उत्सर्जनावर सकारात्मक परिणाम होईल."

गाय पर्यावरणासाठी धोका?

संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या 2014 च्या अहवालानुसार गाय, बकरी, मेंढी हे प्राणी दिवसभर रवंथ करतात आणि ढेकर देतात.

पोटात अनेक प्रकारचे जीवाणू असतात. गवत आणि पानासारख्या फायबरयुक्त पदार्थांना छोट्या तुकड्यात तोडून ते पदार्थ पचण्यासाठी मदत करतात. या प्रक्रियेत पोटातून मिथेन गॅस बाहेर निघतो.

नोव्हेंबर 2006 मध्ये आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार जागतिक हवामानबदलासाठी जबाबदार असलेल्या कार्बन डायऑक्साईडचं जितकं उत्सर्जन गाडीच्या धुरामुळे होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात गायीच्या पोटातून होतं. या अहवालानुसार वातावरणाला सगळ्यात जास्त धोका गाय आणि म्हशीमुळे आहे.

वाहनांमधून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं तर गायीच्या शरीरातून मिथेनचं उत्सर्जन होतं. कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेच मिथेन वातावरणासाठी जास्त धोकादायक आहे. हे वायू ग्रीन हाऊस गॅसेसला अतिरिक्त प्रमाणात बांधून ठेवतात आणि हेच ग्लोबल वॉर्मिंगचं सगळ्यांत मोठं कारण आहे.

Image copyright Reuters

न्यूझीलंडने तर गायी म्हशींवर कर लावण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. मात्र या प्रस्तावामुळे हवामान बदलात गायी म्हशींच्या योगदानाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.

गायींच्या पोटातून निघणाऱ्या मिथेनचा वापर गाड्यांसाठी करण्याचा विचार कॅलिफोर्नियामध्ये झाला होता यावरून मिथेनचं उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न किती जोरावर आहेत याचा अंदाज येईल.

दुधाची चव तशीच ठेवून त्यांच्या खाण्याचं नियमन कसं करता येईल यावरही चर्चा सुरू आहे.

एशियन जर्नल ऑफ अॅनिमल सायन्सेसमध्ये 2014ला प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात 2010 पर्यंत गायींमुळे मिथेनच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे आणि जगाच्या इतर भागांतील गायींच्या तुलनेत भारतीय गायी सगळ्यांत पुढे आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)