तिच्यासोबत नाश्ता केला म्हणून त्याला जेलची हवा

नाश्ता Image copyright Getty Images

सौदी अरेबियामध्ये इजिप्तच्या एका व्यक्तीने एका महिलेबरोबर नाश्ता केल्याचा व्हीडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

या व्हीडिओत इजिप्शियन लहेजा असलेली व्यक्ती एका महिलेच्या बाजूला बसून नाश्ता करताना दिसत आहे. या महिलेने बुरखा घातला असून ती सौदी अरेबियाची असल्याचं लोकांचं मत आहे.

हा प्रकार सौदीतील कायद्याच्या विरुद्ध आहे. सौदीत कामाच्या ठिकाणी, मॅकडोनाल्ड आणि स्टारबक्ससारख्या रेस्टॉरेंटमध्ये पुरुषांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना वेगळं बसावं लागतं. या ठिकाणी स्त्रियांना वेगळं बसावं लागतं.

वडील, नवरा, भाऊ, मुलगा सोबत असल्याशिवाय अनेक गोष्टी करण्यासाठी इथल्या स्त्रियांना परवानगी नाही.

या व्यक्तीला कामगार आणि सामाजिक कल्याण मंत्रालयातर्फे अटक करण्यात आली आहे. विविध नियमांचा भंग आणि सौदीच्या लोकांसाठी असलेली नोकरी घेतल्याचा आरोप त्या व्यक्तीवर करण्यात आला आहे.

an Egyptian having breakfast with a Saudi अशा आशयाचा अरेबिक हॅशटॅग ट्विटरवर 113,000 वेळा वापरण्यात आला आहे आणि तेच या सांस्कृतिक भेदभावाचे केंद्रस्थान झाले आहे.

सौदी अरेबियाची भूमिका

या तीस सेकंदाच्या व्हीडिओमध्ये ती व्यक्ती आणि स्त्री हास्यविनोद करताना दिसत आहेत. तिथं कोणालाही बोलावलं नाही अशा आशयाचे विनोद करताना दिसत आहेत.

मात्र व्हीडिओच्या शेवटी ती स्त्री त्या व्यक्तीला घास भरवताना दिसली आहे आणि त्यामुळे सगळ्यांत जास्त वाद झाला.

सौदी अरेबियात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी दोघांवरही टीका केली. फक्त पुरुषालाच शिक्षा का झाली हा टीकेचा मुख्य मुद्दा होता.

मलक नावाच्या एका ट्विटर युजर आहेत. त्या म्हणतात, "फक्त पुरुषालाच का शिक्षा झाली हे मला समजून घ्यायचं आहे. मी सुद्धा एक (सौदी) स्त्री आहे आणि मला त्या स्त्रीलाही शिक्षा द्यायची इच्छा होत आहे. कामाच्या ठिकाणी एकत्र खातात, हास्यविनोद करतात. कुठे आहेत त्यांच्या मर्यादा?"

तर कामाच्या ठिकाणी असलेले संबंध हे लिंगभेदाच्या पलीकडे असावेत असं काही युजर्सला वाटतं. तारेक अलजिज यांच्या मते, "ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी नातं इतर मानवी नातेसंबंधासारखेच असावेत. ते एकत्र खाऊपिऊ शकले किंवा विनोद करू शकले पाहिजेत."

मात्र हमुओद अलधुइयान यांच्याशी सगळे सहमत होते. त्यांच्या मते, "सौदी स्त्रियांनी इतर परदेशी सहकाऱ्यांना भेटण आणि बोलणं हेच मुळी परंपरा आणि मुल्यांची पायमल्ली आहे."

इजिप्तची भूमिका

इजिप्तमध्ये सौदी अरेबियात झालेल्या प्रकाराने लोक अचंबित झाले आहेत. अशा व्हीडिओमुळे कोणाला कशी अटक होऊ शकते याचं त्यांना आश्चर्य वाटलं.

मे महिन्यात इथल्या स्त्रियांना वाहन चालवण्याचा परवाना मिळाला. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी अनेक उपाय योजले जात आहेत, या मुद्दयांवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

स्थानिक टीव्ही निवदेक ओसामा गावेश म्हणाले की ते या अटकप्रकरणाने गोंधळात पडले आहेत. "मोहम्मद बिन सालेम (सौदीचे राजे) यांना कॉन्सर्ट, चित्रपटगृह आणि समुद्रकिनारे असलेला आणि 2030चं व्हिजन असलेला सौदी हवा आहे ना?"

सोनिया नावाच्या इजिप्तशियन युजरच्या मते हा सगळा प्रकार म्हणजे पुरुषी इगो आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या