चीनमध्येही #metoo मोहीम, सोशल मीडियावर महिलांचा एल्गार

चीन, महिला शोषण Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चीनमध्ये महिलांनी अन्यायाविरोधात एल्गार पुकारला आहे.

चीनमध्ये सध्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची लाट आली आहे. ट्विटरसारख्या चीनच्या सीना वेबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या यावर जोरदार चर्चा सुरू आहे. याला 'MeToo' म्हणजेच 'मी सुद्धा' मोहीम म्हटलं गेलं आहे.

गेल्या काही आठवड्यात मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या पुरुषांवर अशा प्रकारचे आरोप करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

तिथला मीडियाही याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देतोय. ऑक्टोबर 2017 मधील हार्वे वाईनस्टीन प्रकरणाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्या मुळेच कदाचित मीडियाचा या घटनांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल झालेला दिसतोय.

इतकंच नाही तर पहिल्यांदाच चीनने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधी कायद्यावर चर्चा करायची तयारी दाखवली आहे. सध्या लैंगिक अत्याचाराची कायदेशीर व्याख्याच चीनमध्ये नाही.

वेबोवर जोरदार चर्चा

वेबो या समाजमाध्यमावर जुलैपासून अशा आरोपांची राळ उठली आहे. यात वरच्या पदावर असणाऱ्या पुरुषांवर अनेक स्त्रियांनी आरोप केले आहेत.

नुकत्याच 13 ऑगस्टला आलेल्या एका वृत्तात शॅनडाँग विद्यापीठातल्या एका विद्यार्थिनीनं आपल्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. वेबो यूजर्सनं या घटनेची दखल घेतल्याबद्दल हाँकाँगमधल्या 'द फिनिक्स' या वेबसाईटचं अभिनंदन केलं आहे. यात मेनलँड चीनमध्ये राहणाऱ्या अनेकांचा समावेश आहे.

वेबसाईटनं विद्यापीठातल्या कम्युनिस्ट पार्टी कमिटीने 'वुईचॅट' या मेसेजिंग अॅपवर दिलेली प्रतिक्रिया प्रसिद्ध केलीय. त्यात कमिटीनं म्हटलं आहे की, "एका विद्यार्थिनीनं आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्यावर शिक्षकांकडून होणारी 'नैतिक मूल्यांची पायमल्ली खपवून घेतली जाणार नाही,' असं आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आलं आहे."

"अमेरिकेतले प्राध्यापक विद्यादानाच्या कामी व्यग्र आहेत तर चीनमधले प्राध्यापक विद्यार्थिनींचा छळ करत आहेत", अशी प्रतिक्रिया वेबोच्या एका युजरनं लिहिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शांघाय शहरातील मेट्रो स्टेशनवरचं एक दृश्य.

या कारणामुळे काही कंपन्याही वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. उदहरणार्थ बाईक शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेली 'मोबाईक'. या कंपनीत इंजीनिअर असलेल्या एका तरुणीचं पत्रक ९ ऑगस्टपासून खूपच व्हायरल झालं. आपला आणि आपल्या दोन महिला सहकाऱ्यांचा कंपनीच्या मॅनजरनं लैंगिक छळ केल्याचा आरोप तिनं केला होता. यानंतर मॅनेजरला बडतर्फ करण्यात आलं.

चीनच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात स्त्री-पुरूष भेद मोठ्या प्रमाणात आहे. तिथं या घटनेनं 'MeToo' मोहिमेला वाचा फोडली.

वेबोवर जुलैमध्ये आलेल्या दुसऱ्या एका घटनेत बीजिंगमधील लोकप्रिय मिडी म्युझिक महोत्सवात एका वॉलेंटिअर तरुणीनं स्टेज मॅनेजरवर 2017मध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

29 जुलै रोजी महोत्सवाचे संस्थापक झँग फॅन यांनी वेबोवरच स्पष्टीकरण टाकलं आणि मॅनेजर आणि त्या तरुणीचे संबंध होते. ते वेगळे झाल्यानंतर तरुणीने हे आरोप केल्याचं म्हटलं.

या घटनेनंतर वेबो यूजर्सने "Say no to sexual harassment" नावाचा कीवर्ड सुरू केला. 30 जुलैची सकाळ उजाडेपर्यंत त्याला 23 लाख व्हिव्यूज मिळाले.

इतर घटनांमध्ये बिजिंगच्या विद्यापीठातल्या एका विद्यार्थिनीनं 26 जुलैला टाकलेल्या एका ऑनलाईन पत्रात प्राध्यापकावर बलात्काराचा आरोप केला होता.

त्याच संध्याकाळी विद्यापीठानं आरोपांची शहानिशा करण्यात येईल अशी प्रतिक्रिया वेबोवर दिली. दुसऱ्या दिवसापर्यंत या पोस्टलाही वीस लाखांहून जास्त लाईक्स, 46 हजार शेअर्स आणि 34 हजार कमेंट्स मिळाल्या. विद्यापीठानं त्वरित दखल घेतल्याबद्दल एकानं कौतुकही केले होते.

मीडियाने घेतली दखल

सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीनंतर जानेवारी 2018 पासून का होईना पण मीडियाने याची दखल घेतली. काही महत्त्वाच्या मीडिया कंपन्यांनी यातील काही घटनांवर चर्चा केली. पण त्याचा सूर मात्र काहीसा मवाळ होता.

'चायना डेली' या वर्तमानपत्रानं वाईनस्टीन प्रकरणच्या काही दिवसांनंतर 16 ऑक्टोबर 2017ला एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यावेळी मात्र त्याची फारशी दखल घेण्यात आली नव्हती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चीनमधील एक दृश्य.

चीनमध्ये राहणाऱ्या कॅनडियन-इजिप्शिअन शिक्षक सवा हसन यांनी तो लेख लिहिला होता. त्यात त्या म्हणाल्या की, पाश्चिमात्य समाजाप्रमाणे लैंगिक छळ ही चीनमध्ये "सामान्य घटना" नाही.

त्या लिहितात,"स्त्रियांचं रक्षण करण्याची शिकवण इथे दिली जाते. स्त्रियांशी चुकीच्या पद्धतीनं वागणं, त्यांचा छळ करणं हे चीनच्या पारंपरिक मूल्य आणि रुढींच्या विरोधात आहे."

तरीही जानेवारीत बीजिंगमधल्या विद्यापीठातल्या एका माजी विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्याची बातमी आली.

या घटनेवर 'ग्लोबल टाईम्स' या वर्तमानपत्रानं 17जानेवारीला लेख लिहिला. त्यात म्हटलं होतं,"महिला आणि बालकांची सध्याची परिस्थिती बघता महिलांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आणि समाजसुधारणेसाठी बीजिंग विद्यापीठातील घटना एक मैलाचा दगड ठरू शकते."

एप्रिलमध्येसुद्धा पेकिंग विद्यापीठाच्या प्राध्यापकानं विद्यार्थिनीचा छळ केल्याचं वृत्त ग्लोबल टाइम्ससारखं वर्तमानपत्र आणि झिनुआ या सरकारी एजंसीनं प्रसिद्ध केलं. त्या विद्यार्थिनीनं 1998मध्येच आत्महत्या केली होती. मात्र एप्रिलमध्ये दुसऱ्या एका विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर ही बातमी टाकली आणि अन्यायाला वाचा फुटली.

कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'पीपल्स डेली'नं 24 एप्रिलला छापलेल्या लेखात या घटनेचा उल्लेख केला नसला तरी विद्यापीठाला तरुणांविषयी 'अधिक संवेदनशील' होण्याचं आवाहन केलं होतं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : चिनी नागरिकांवर असेल सीसीटीव्हीची बारीक नजर

त्याचदिवशी ग्लोबल टाईम्सने 'Me Too' मोहीमेबद्दल लिहिलं आणि तिच्या प्रभावाला अधोरेखित केलं.

"बिहँग विद्यापीठाच्या प्राध्यापकाविरोधातल्या वृत्तानंतर सुरू झालेली #MeToo मोहीमेची चीनी आवृत्ती ही सामाजिक जीवनात बदल घडवू पाहणाऱ्या चीनी विद्यार्थ्यांचं प्रतीक आहे," असं त्यात म्हटलं आहे.

दुसऱ्या एका हायप्रोफाईल घटनेत, सरकारी वाहिनी असलेल्या CCTVच्या वेबसाईटनं 15ऑगस्टला एका विख्यात बौद्ध भिख्खूच्या राजीनाम्याची बातमी दिली. लैंगिक छळाच्या आरोपामुळे भिख्खू शी क्षेचेंग यांनी पदत्याग केला. छळाचा आरोप मात्र त्यांनी फेटाळला.

यासंदर्भात ग्लोबल टाइम्सनं 23 ऑगस्टला एक बातमी दिली. त्यात भिख्खूनं लैंगिक छळ केल्याचा आरोप खरा असल्याचं म्हटलं होतं. तो भिख्खू महिलांना अश्लिल मेसेज पाठवत असल्याचं राष्ट्रीय धार्मिक व्यवहार खात्याच्या चौकशीत सिद्ध झालं होतं.

भविष्यातील उपाययोजना

चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर उजेडात येत असलेल्या या घटनांमध्ये चीनमधली पुराणमतवादी वृत्ती आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरोधात कायदा नसणे, मोठा अडसर आहे.

पण महत्त्वाचं म्हणजे चीनने सिव्हिल कोडसंबंधी एक मसुदा तयार केला आहे. ज्यात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ याविषयीही उहापोह करण्यात आला आहे. यावर देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात 2020 साली चर्चा होण्याची शक्यता आहे.

झिनुआनं 27 ऑगस्टला या मसुद्यातल्या काही तरतुदी प्रसिद्ध केल्या. त्यानुसार,"लैंगिक छळ रोखण्यासाठी आणि त्यासंबंधीच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कंपनीला योग्य उपाय करावे लागतील"

बीजिंगमधल्या एका वरिष्ठ कायदेतज्ज्ञांनी 'चायना डेली'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "हा मसुदा मंजूर झाला तर शिक्षक-विद्यार्थी किंवा वरिष्ठ-कनिष्ठ अशा विसंगत संबंधातील लैंगिक शोषणाला आळा बसू शकेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)