स्वतंत्र कॅटलोनियाच्या मागणीला पुन्हा जोर, लाखो लोक रस्त्यावर

कॅटोलोनिया

कॅटोलोनियाच्या 'राष्ट्रीय दिना'च्या निमित्तानं लाखो लोकांनी बार्सिलोनाच्या रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याच्या मागणीस पाठिंबा दिला.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्पेनमधून वेगळं होण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतरचा हा पहिलाच मोठा जाहीर कार्यक्रम होता.

लाल रंगाचे शर्ट परिधान केलेले आणि हातात लाल आणि पिवळ्या रंगाचे कॅटलॅन झेंडे घेतलेले निदर्शक मोठ्या प्रमाणावर बार्सिलोनाच्या रस्त्यावर उतरले होते. ड्रम बडवत, शिट्ट्या वाजवत, घोषणा देत या समर्थकांनी आसमंत दणाणून सोडला होता.

निदर्शकांची संख्या सुमारे गेल्यावर्षी एवढीच होती.

कॅटलनचे विभागीय अध्यक्ष क्विम तोरा आणि आधीचे अध्यक्ष कार्लस प्युजडिमाँट यांनी लोकांना निदर्शनं करण्याचं आवाहन केलं होतं. कार्लस प्युजडिमाँट यांनी गेल्या वर्षीच्या असफल प्रयत्नांनंतर बेल्जियममध्ये आसरा घेतला आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बार्सिलोनाच्या रस्त्यावर जमलेले लाखो समर्थक

समारोपाचं भाषण करताना तोरा यांनी म्हटलं की, "ही एका मोठ्या लढ्याची सुरुवात आहे."

इथं गेल्या आठ वर्षांपासून 11 सप्टेंबर हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी, 1714मध्ये स्पेनचा सम्राट फिलीप पाचवा याने कॅटोलोनियाच्या सैन्याचा पराभव केला आणि बार्सिलोना त्यांच्या हाती गेलं. डिंडा हॉलिडे म्हणून हा दिवस साजरा करण्याची प्रथा 11 सप्टेंबर 1886मध्ये सुरू झाली.

कॅटोलोनियाच्या स्वातंत्र्यासाठी गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला जनमत घेण्यात आलं होतं. 27 ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं.

Image copyright Gonzalo Arroyo Moreno/Getty Images

मात्र, स्पेनच्या घटना पीठानं जनमताचा प्रयोग बेकायदा ठरवला आणि त्यानंतर तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

या मोर्चात सहभागी झालेल्या डोलर्स लॉउरालो या वयस्कर निदर्शक म्हणाल्या की, "मी दरवर्षी या निदर्शनात भाग घेणार. जोवर मला शक्य आहे तोवर मी माझी मुलं आणि नातवंड यांच्यासाठी लढणार. त्यांना चांगलं जीवनमान मिळावं यासाठी हा संघर्ष आहे."

जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या मत चाचणीमध्ये 46.7 टक्के कॅटलन नागरिकांनी स्वातंत्र्याच्या बाजूनं तर 44.9 टक्के नागरिकांनी त्याविरोधात कौल दिला होता.

हेही वाचलंत का?

हेही पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - राजघराण्यातील सासू-सुनेचं भांडण चव्हाट्यावर येत तेव्हा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)