नव्या iPhoneX पेक्षा ECG काढणाऱ्या नव्या ॲपल वॉचची जास्त चर्चा

ऍपल वॉच Image copyright Getty Images

जेव्हा 2015मध्ये ऍपलनं पहिल्यांदा अॅपल वॉच बाजारात आणलं तेव्हापासून नेहमीच ते सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्रॉडक्टमध्ये राहिलेलं आहे.

आजवर अॅपलनं किती घड्याळं विकली याची कधीच माहिती दिलेली नाही. पण, एका अंदाजानुसार, 50 लाख अॅपल वॉच विकली गेली असावीत.

आयफोनच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. पण बुधवारी रात्री जाहीर झालेल्या नव्या iPhoneपेक्षा ECG काढणाऱ्या नव्या ॲपल वॉचची जास्त चर्चा रंगली आहे. त्यावरून अॅपल वॉचची लोकप्रियता कळते.

हे निरिक्षण नोंदवलं आहे बीबीसीचे टेक्नॉलॉजी प्रतिनिधी डेव्ह ली यांनी.

अॅपल वॉच आणलं ते फिटनेस डिव्हाईस म्हणून आता त्यात केलेल्या बदलांमुळे ते लोकांचा जीव वाचवण्यास मदत करेल. कोणी कोसळलं तर त्याची माहिती देण्याचं तंत्र यात आहे.

शिवाय ECG काढून हृदयाचा फिटनेस मोजण्याची कलाही त्याला अवगत आहे. या दोन्ही नवीन वैशिष्टयांमुळे हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये अॅपल वॉचविषयी प्रचंड उत्सुकता आहे, असंही डेव्ह ली सांगतात.

मी स्वत: अजून हे घडयाळ वापरलेलं नाही. पण एक चिंता सतावते आहे की समजा मी पडलेलो नसताना चुकीचा मेसेज गेला तर काय होईल?

ज्येष्ठांसाठीचं प्रॉडक्ट म्हणून समजा याचं मार्केटिंग केलं तर अॅपलच्या एकूण रचनेनुसार हे सगळे आणखी गुंतागुंतीचं तर होणार नाही ना, असा प्रश्न मला पडलाय, असं डेव्ह ली म्हणतात.

अर्थात, एकदा का या अॅपल वॉचला अमेरिकन नियंत्रकाची मान्यता मिळाली की मग विमा कंपन्या या वॉचची घाऊक खरेदी करतील.

जगाचं सरासरी वय वाढतं आहे आणि वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत आहेत.

साठी ओलांडलेल्यांसाठी सिलिकॉन व्हॅलीनं काही प्रॉडक्ट तयार करण्याची वेळ फार क्वचितच आलेली आहे. अॅपलनं या क्षेत्रात मोठीच झेप घेतली आहे.

म्हणूनच iPhoneपेक्षा ECG काढणाऱ्या या नव्या ॲपल वॉचचीच या वर्षात जास्त चर्चा होणार हे नक्की, असं ली यांचं म्हणणं आहे.

Image copyright APPLE

काय iPhoneची नवी वैशिष्ट्ये?

  • अॅपलनं iPhoneX हॅण्डसेटमध्ये 3 नवीन आणि अधिक क्षमतेची मॉडेल्स आणली आहेत. त्यातली 2 मॉडेल्स आधीपेक्षा मोठी आहेत.
  • Phone XS Max चा डिस्प्ले 16.5 सेंमींचा आहे.
  • iPhone XSचा आकार हा 5.8 इंच एवढाचा कायम ठेवला आहे.
  • iPhone XRची स्क्रिन 6.1 इंच एवढी आहे.
Image copyright APPLE
प्रतिमा मथळा iPhone XR वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे.

XS Max हा अॅपलचा सगळ्यात महागडा हॅण्डसेट आहे.

iPhone XS Maxचा डिस्प्ले हा iPhone 8 Plus पेक्षा मोठा आहे. दोन्ही फोनचा आकार मात्र सारखाच आहे.

iPhone XRची स्क्रिनही मोठी आहे, पण त्यात OLED (organic light-emitting diode) च्या ऐवजी LCD (liquid crystal display) चा वापर करण्यात आला आहे.

Image copyright Source : IDC
प्रतिमा मथळा स्मार्टफोनची उलाढाल

चीनमधल्या Huaweiनं एप्रिल ते जून या काळात स्मार्टफोनच्या विक्रीत आघाडी घेतली आहे. अॅपल तिसऱ्या स्थानी आहे.

"Huaweiला आघाडी घेणं शक्य आहे, कारण अॅपलची मध्यम आणि तळाच्या मार्केटमध्ये काहीच गुंतवणूक नाही. पण प्रिमियम गटात अॅपलचं स्थान पक्कं आहे. आणखी किमान 18 महिने तरी त्यात काही बदल होण्याची शक्यता नाही," असं आयडीसीचे फ्रान्सिस्को जेरोनिमो यांनी स्पष्ट केलं.

प्रतिमा मथळा स्मार्टफोनच्या मॉडेल्सची वाटचाल

हेही पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : 1000 अब्ज डॉलर बाजारमूल्य असलेली कंपनी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)