अमेरिकेपाठोपाठ फिलिपिन्सलाही मोठ्या चक्रीवादळाचा धोका, हवाई आणि सागरी वाहतूक बंद

चक्रीवादळ Image copyright Getty Images

फिलिपिन्सच्या दिशेनं पुढे सरकणारं भलमोठं चक्रीवादळ मिनिटागणिक अधिकाधिक मोठं होतं चाललं आहे. यासंबंधीची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.

हे चक्रीवादळ ताशी 255 किलोमीटरच्या वेगानं पुढे सरकत आहे आणि याच्या राक्षसी विळख्यात लाखो लोक सापडण्याची शक्यता आहे.

हे वादळ शनिवारपर्यंत लुझॉन बेटाच्या उत्तरेला थडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तिथं सरकार आणि सर्वसामान्य लोकही वादळापासून वाचण्यासाठी तयारी करत आहेत.

विमानांची उड्डाण रद्द केली आहेत, शाळा बंद आहे आणि सैन्याला मदतकार्याच्या तयारीत ठेवलं आहे.

हवामानतज्ज्ञांचं म्हणणं आहे की या वादळाचा व्यास 900 किलोमीटर एवढा आहे. आणि जमिनीवर धडकण्याआधी याचा वेग कमी झाला तरीही हे वादळ बऱ्यापैकी धोकादायक ठरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्थानिक भाषेत ओम्पॉग म्हणवल्या जाणाऱ्या या वादळानं आधीच अमेरिकेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या नॉर्दन मरिना आणि गुआम बेटांची धुळधाण उडवली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते या वादळामुळे 7 मीटर उंच लाटा उसळू शकतात. तसंच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पावसामुळे दरडी कोसळू शकतात आणि पूरही येऊ शकतो.

Image copyright Getty Images

फिलिपिन्सच्या 39 प्रादेशिक भागात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे तसंच हवाई आणि सागरी वाहतुकींवर निर्बंध लादले आहेत.

फिलिपिन्सच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन काउन्सिलचे प्रवक्ते एडगर पोसाडस यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, सुमारे 52 लाख लोकांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यात दारिद्ररेषेखाली राहाणाऱ्या 10 लाख लोकांचा समावेश आहे.

"आम्ही खूप घाबरलो आहोत," आपलं घर सोडून पळालेल्या डलाईला पासिऑन यांनी AFP ला सांगितलं. "ते म्हणत होते की हे वादळ महाभयानक आहे. मग आम्ही घर सोडून पळालो."

"मागच्या मान्सूनच्या पावसात आमचं अर्ध घर उद्धवस्त झालं होतं. म्हणून यावेळेस मी माझ्या नातवंडांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी घाई केली," त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

फिलिपिन्सला आजवर अनेकदा चक्रीवादळांचा फटका बसला आहे.

यातलं सगळ्यांत धोकादायक चक्रीवादळ होतं हायान ज्यानं 7000 लोकांचा बळी घेतला तर लाखो लोकांना बेघर केलं. हे वादळ 2013 साली आलं होतं.

बीबीसीचे लुझॉन प्रांतातले प्रतिनिधी हावर्ड जॉन्ससन म्हणतात की, आता इथे असणारी शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा मंगखुत चक्रीवादळाच्या राक्षसी विळख्यात लाखो लोक सापडण्याची शक्यता आहे.

इथले लोक म्हणतात की, त्यांनी अशी वादळं आधीही पाहिली आहेत आणि ते या अनुभवातून गेले आहेत. शेतकरी त्यांच्या भाताच्या खाचरात दिवसरात्र काम करत आहेत. ते म्हणतात की, "तांदूळ अजून पूर्ण तयार झालेला नाही. पण वादळ थडकण्यापूर्वी जेवढं पिक वाचवता येईल तेवढं वाचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत."

अधिकाऱ्यांनी मात्र इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं आहे.

इतर देशही तयारीत

चीनमध्ये धोक्याचा 'पिवळा' अलर्ट देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ रविवारी रात्री उशीरा आणि सोमवारी पहाटे चीनला धडकण्याचा धोका आहे.

हाँगकाँगमध्येही या वादळापासून वाचण्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र ताज्या अंदाजानुसार मंगखुत हाँगकाँगकडे न येता दक्षिणेकडे जाईल असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)