हरिकेन, टायफून, सायक्लोन - या तिघांमध्ये नेमका फरक काय?

हरिकेन फ्लोरेन्स Image copyright NASA
प्रतिमा मथळा हरिकेन फ्लोरेन्स

एकीकडे अमेरिकेत फ्लोरेन्स चक्रीवादळाने थैमान घातलं असून दुसरीकडे फिलिपिन्सलाही मांगखुट या सुपर टायफूनने मोठी हानी पोहोचवली होती.

दोन्ही वादळांची वेळ आणि अवकाशातून घेण्यात आलेली चित्रं जवळपास सारखीच दिसत होती. पण मग त्यांची नावं वेगवेगळी का?

म्हणजे एकाला हरिकेन म्हटलं तर मग दुसऱ्याला टायफून का म्हणतात? मग चक्रीवादळ नेमकं काय असतं?

ही सर्व वादळं उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल असतात. पण जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.

उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात त्यांना हरिकेन असं संबोधलं जातं.

वायव्य पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची वादळं टायफून म्हणून ओळखली जातात, तर दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात या वादळांना सायक्लोन म्हटलं जातं.

अशी नावं का?

उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे.

उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावात यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं, त्याला सायक्लोन म्हणतात, असं USच्या National Oceanic and Atmospheric Administrationचं म्हणणं आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा टायफून वादळ

हे सायक्लोन कमीत कमी ताशी 119 किमी वेगानं येऊन धडकत असेल तर त्याच्या उगमानुसार त्याला हरिकेन किंवा टायफून असं संबोधलं जातं.

वाऱ्याच्या गतीनुसार हरिकेनचे वर्गीकरण हरिकन 1 ते हरिकन 5 अशा गटांमध्ये केलं जातं.

ही वादळं केव्हा येतात?

अटलांटिक महासागरात ही वादळं सामान्यतः 1 जून ते 30 नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील 95 टक्क्यांपेक्षा अधिक वादळं याच कालावधीत येतात.

वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असं असलं तरी ही वादळं वर्षात कधीही तयार होऊ शकतात.

तर दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतं.

वादळांना नावं कशी पडली?

संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना हे जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवत असते.

टायफून हैयान किंवा हरिकेन कॅटरिना यांसारख्या अत्यंत धोकादायक वादळांची नावं बदलण्यात आली आहेत.

ज्या देशांमध्ये हरिकेन, टायफून, सायक्लोन वादळं येतात, त्या देशांकडून जागतिक बैठकीदरम्यान वादळांची नावं सुचवली जातात.

"2000च्या दशकात बंगालचा उपसागर आणि अरबी समु्द्र यांत येणाऱ्या आठ देशांनी अशा नावांची शिफारस जागतिक हवामान संघटनेला केलं होतं," असं भारतीय हवामान विभागातल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं बीबीसीला सांगितलं.

"त्यातली 50 टक्के नावं आधीच वापरली गेली आहेत. देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, अशी आशयाचं नाव वादळाला देण्याचा संबंधित देश प्रयत्न करतात," असं त्यांनी पुढे सांगितलं.

प्रतिमा मथळा मांगखुट चक्रीवादळाचा रोख

चक्रीवादळाचं विज्ञान

उबदार समुद्राच्या पाण्यामुळे हवा वेगात वाहू लागते. जसंजसं उबदारपणा कमी होत जाते, तसतशी हवेतील उष्णता कमी होते.

यामुळे एक चक्र तयार होतं. उष्णकटिबंधीय वादळांचा वेग ताशी 119 किलोमीटर असतो.

वादळादरम्यान प्रचंड लाटा तयार होतात. ज्यावेळेस या लाटा किनाऱ्यावर पोहोचतात तेव्हा त्यांच्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते.

वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे हानी होऊ शकते. यामुळे घरं पडू शकतात, झाडं पडू शकतात.

Image copyright EPA

समुद्रातील पाण्याचं तापमान वाढत असल्यानं त्यामुळे भविष्यात हरिकेनची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

उष्ण वातावरणामुळे अधिक पाणी थांबवलं जातं आणि यामुळे हरिकेनची व्याप्ती वाढण्याची शक्यता असते.

पण हवामान बदल आणि हरिकेन यांच्यातील संबंध अनेक घटकांवर अवलंबून असतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)