ट्रेड वॉर पेटले : ट्रंप यांनी चिनी वस्तूंवर लादले आणखी कर

ट्रंप Image copyright Getty Images

चिनी वस्तूंवर कर लादण्यासंदर्भात हालचाल सुरू करावी असा आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. चीन आणि अमेरिकेतली ट्रेड वॉर अद्यापही सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर कर लादण्याच्या पुढच्या टप्प्यावर कारवाई सुरू करावी असं ट्रंप प्रशासनानं म्हटलं आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेतील ट्रेड वॉरचा प्रश्न निकाली लागण्यासंदर्भातली चर्चा निष्फळ ठरल्याचं सांगितलं जात आहे.

अंदाजे 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि हॅंडबॅंगसारख्या वस्तूंवर जास्त कर लादला जाऊ शकेल.

आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अंदाजे 25 टक्के कर लादण्याचा प्रशासनाचा विचार आहे. या निर्णयावर अंमलबजावणी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

तसेच कोणत्या वस्तूंवर कर लादला जाईल याची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

चीनने अमेरिकन वस्तूंवर कर वाढवल्यानंतर डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या प्रशासनाला हे आदेश दिले आहेत.

अमेरिकेनं 50 अब्ज डॉलरचा कर चिनी वस्तूंवर लादला आहे. त्या करामध्ये नव्या उत्पादन शुल्काची भर पडणार आहे. अमेरिकेने कर लादल्यानंतर चीननं देखील 50 अब्ज डॉलरचा कर अमेरिकन वस्तूंवर लावला.

आता चिनी वस्तूंवर कर लावण्याची पुढील प्रक्रिया सुरू करावी असे आदेश ट्रंप यांनी दिल्याचं वृत्त आहे. मात्र अद्याप याची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप आणि शी जिनपिंग

7 सप्टेंबर रोजी ट्रंप यांनी म्हटलं होतं, 200 अब्ज डॉलरचा कर लवकरच लादला जाईल आणि वस्तूंवर 267 अब्ज डॉलरचा कर लावण्याचा निर्णय माझ्याकडून सूचना आल्यानंतर लवकरच घेतला जाईल.

या संदर्भात व्हाईट हाऊस आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या कार्यालयाला याबाबत विचारणा करण्यात आली पण त्यांच्याकडून काही उत्तर मिळाले नाही.

ब्लूमबर्ग न्यूजनं सर्वांत आधी ही बातमी दिली. त्यांचं म्हणणं आहे की अद्याप यादी जाहीर झाली नसल्यामुळे अजून हा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

या बातमीनंतर अमेरिकन शेअर बाजार मंदावला आहे.

ट्रेड वॉरमुळं निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पुन्हा चर्चा सुरू करावी यासाठी ट्रंप सरकारमधील काही लोक प्रयत्नशील आहेत पण ट्रंप यांचं म्हणणं आहे की दोन्ही देशांमध्ये करार व्हावा यासाठी आपल्यावर कुठलाही दबाव नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)