मालदीव : वादग्रस्त निवडणुकीत विरोधी पक्षाचा विजयाचा दावा

सोलिह Image copyright AFP

मालदीवमध्ये वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे नेते मोहम्मद सोलिह यांनी विजयाचा दावा केला आहे. तिथल्या स्थानिक माध्यमांनी सोलिह यांनी राष्ट्राध्यक्ष अब्दुला यामीन यांच्यावर स्पष्ट विजय मिळवल्याचं म्हटलं आहे. मालदीवच्या निवडणूक आयोगाने अजून निकालांची अधिकृत घोषणा केलेली नाही.

मालदीव इनडिपेन्डट या वेबसाईटने म्हटलं आहे की एकूण 472 मतपेट्यांपैकी 437 मतपेट्यांतील मतांची मोजणी झाली आहे. यातील कल पाहाता सोलिह हे यामीन यांच्यावर वरचढ ठरत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

हिंदी महासागरातील बेटांचा हा समूह स्वच्छ नितळ पाणी आणि उंची रिसॉर्ट साठी ओळखला जातो. मात्र इथल्या सरकारवर सामान्य माणसांचा आवाज दाबल्याचा आरोप केला जात आहे.

राष्ट्राध्यक्ष अब्दुला यामीन यांचा कल चीनकडे आहे. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी मोहम्मद सोलिह यांचा भारत आणि पाश्चिमात्य देशांकडे ओढा आहे.

युरोपियन महासंघ आणि अमेरिकेने या निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. इथली लोकशाही पूर्ववत झाली नाही तर निर्बंध लादण्याचा इशारा दोघांनीही दिला आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी पोलिसांनी विरोधकांच्या मुख्यालयावर धाडी टाकल्या, अशा बातम्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या.

रविवारी सायंकाळी 7 वाजता मतदानाची मुदत संपली. पण संपूर्ण निकाल जाहीर होण्यास किमान एक आठवडा लागू शकतो.

मालदीव 26 कंकणद्वीपांनी वेढला असून एकूण 1192 बेटं आहे. पर्यटन हा मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तिथे 40 लाख नागरिक राहतात. मात्र हवामान बदलामुळे त्याचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.

सध्याची परिस्थिती

या बेटांच्या समुहात गेल्या काही वर्षांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये इथल्या सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांची शिक्षा अवैध ठरवली. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद यांचा समावेश आहे. 2012 साली त्यांना पदच्यूत करण्यात आलं होतं.

मात्र राष्ट्राध्यक्ष यामिन यांनी आणीबाणी घोषित केल्यावर दोन न्यायाधीशांच्या अटकेचे आदेश दिले. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा इब्राहिम मोहम्मद सालिह राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. अंतिम टप्प्यातील प्रचार करतानाा ते दिसत आहेत.

यावरून आपल्या सत्तापद्धतीत कोणताही बदल होणार नाही असा अप्रत्यक्ष इशारा यामिन यांनी दिला. त्यांच्या या निर्णयावर वॉशिंग्टन, लंडन आणि दिल्लीहून टीका झाली. यामिन यांना पुन्हा पाच वर्षांसाठी सत्तेवर याची इच्छा आहे.

भारताचाही काही काळ या देशावर प्रभाव होता. त्यामुळे मालदीवमधील तिढा सोडवण्यासाठी भारताने मध्यस्थी केली होती. नाशिद यांनी भारतीय सैन्याचीही मदत मागितली होती.

Image copyright Reuters

यामिन यांच्या काळात मोठ्या प्रकल्पांसाठी मालदीवने चीनकडून येणाऱ्या निधीचं स्वागत केलं. त्यांच्याशी मुक्त व्यापाराच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. चीनमधूनही अनेक पर्यटक मालदीवला येत असतात. या गोष्टींमुळे चीनचंही या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)