पाकिस्तानी अधिकाऱ्यानं चोरलं कुवैतच्या अधिकाऱ्याचं पाकिट

सांकेतिक छायाचित्र Image copyright Chaliya/getty images
प्रतिमा मथळा शिष्टमंडळातल्या एक प्रतिनिधीचं पाकिट पाक अधिकाऱ्यानं चोरलं ( सांकेतिक छायाचित्र)

कुवेती शिष्टमंडळातील प्रतिनिधीचं पैशाचं पाकिट मारल्यामुळे पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.

पण संशयित म्हणून ज्या व्यक्तीचे फोटो सोशल मीडिया आणि काही वेबसाइटवर प्रसिद्ध झाले ते चुकीच्या व्यक्तीचे असल्यामुळे आणखी गोंधळ उडाला.

पाकिस्तान सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी झरार हैदर खान यांच्यावर कुवेतच्या प्रतिनिधीचं पाकिट चोरल्याचा संशय आहे.

माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं की हैदर हे उद्योग आणि निर्मिती मंत्रालयात सहसचिव आहेत.

या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं चौधरी यांनी सांगितलं आहे. हैदर हे BS-20 दर्जाचे अधिकारी आहेत.

हे पाकिस्तानच्या नागरी सेवेतलं मोठं पद समजलं जातं.

या प्रकारामुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाल्याचं पाकिस्तानी माध्यमांत म्हटलं जातं आहे.

नेमकं काय झालं?

पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार विभागात कुवेतचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यातील एका प्रतिनिधीचं पैशांचं पाकिट टेबलवरच राहिलं. ते चोरीला गेलं. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

Image copyright cottidie
प्रतिमा मथळा सांकेतिक छायाचित्र

पाकिट चोरीला गेल्याची तक्रार कुवैतच्या प्रतिनिधीने केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पाकिटात कुवेती दिनार आणि कागदपत्रं होती.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी फुटेजची तपासणी केली आणि मगच तक्रार दाखल केली.

पाकिस्तानातल्या माध्यमांचं म्हणणं आहे की या प्रकारानंतर कुवेतचं शिष्टमंडळ चिडलं आहे.

चुकीच्या फोटोमुळे उडाला गोंधळ

पाकिस्तानमध्ये या चोरीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या लोकांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काही भारतीयांनी देखील चोरीबाबत कमेंट केल्या आहेत.

'जेव्हा एखाद्या श्रीमंताचं पाकिट छोट्या देशातील छोट्या अधिकाऱ्याला सापडतं तेव्हा काय घडतं ते पाहा,' असं एकानं म्हटलं आहे.

पाकिस्तानी माध्यमं आणि सोशल मीडियावर या बातमीसोबत ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे त्यांचं नाव झायेद हैदर आहे. ते अमेरिकन प्रशासनात रिस्क अॅनालिस्टचं काम करतात.

ते व्हाइट हाउस फेलो आहेत, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अॅंड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये ते वरिष्ठ संशोधक आहेत, असं पाकिस्तान टुडेनं म्हटलं आहे.

Image copyright PAkistan information ministry
प्रतिमा मथळा टेबलवरून पाकिट चोरीला गेल्याचं कुवैतच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

ऑनलाइन न्यूज पोर्टल डेली पाकिस्ताननं म्हटलं आहे की चुकीच्या व्यक्तीचे फोटो इंटरनेटवर फिरत आहे आणि त्यांना शिवीगाळ केली जात आहे.

या प्रकाराबाबत पाकिस्तानी माध्यमांनी झायेद हैदर यांच्याशी ट्विटरवर संपर्क साधला असता ते म्हणाले 'माझं नाव झायेद आहे झरार नाही. ही फेकन्यूज आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं.'

पुढं काय?

पाकिस्तानी सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे. त्यांनी लवकर चौकशी सुरू केल्यामुळे कुवैतच्या प्रतिनिधींचा राग शांत होण्यास मदत होईल, असं म्हटलं जात आहे.

हे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये गुंतवणुकीच्या वाटाघाटी करण्याकरता आलं होतं. या घटनेमुळे गुंतवणुकीची भविष्यकालीन योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान प्रयत्नशील आहेत. तसेच पाकिस्तानचं सरकार भ्रष्टाचार करणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

तेव्हा या घटनेमुळे सरकारच्या एकूणच प्रतिमेला धक्का लागू शकतो, असं म्हटलं जात आहे.

माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले की आमच्या सरकारला बरंच काम करावं लागणार आहे. मागच्या सरकारनं अधिकाऱ्यांना 'नैतिकतेचे धडे' दिले आहेत. त्यामुळे या गोष्टी घडत आहेत असं ते म्हणाले.

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)