झुरळापासून बनवलेला हा ब्रेड तुम्ही खाणार का?

झुरळांपासून बनलेली ब्रेड Image copyright FURG

हा ब्रेड पाहा. एखाद्या सामान्य ब्रेडसारखाच दिसतोय ना? पण जर तुम्हाला सांगितलं की हा ब्रेड झुरळांपासून बनला आहे तर? विश्वास बसत नाहीये ना. पण हे खरं आहे.

हा ब्रेड झुरळांपासून बनला आहे. म्हणजे कसा? तर हा ब्रेड गव्हाच्या पिठात वाळवलेल्या झुरळांची भुकटी मिसळून बनवला आहे.

अन्नाच्या तुटवड्यावर तसंच भविष्यात प्राण्यापासून मिळणाऱ्या प्रथिनांनी युक्त असलेलं पौष्टिक अन्न शोधण्यासाठी ब्राझीलचे संशोधक काम करत आहेत. जर जगात अन्नाची कमतरता भासू लागली तर त्यावर उपाय काहीतरी उपाय हवा, आणि म्हणून सध्याच्या अन्नाला पर्याय शोधण्याची तयारी आम्ही करत आहोत असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

संयुक्त राष्ट्रांनुसार 2050पर्यंत जगाची लोकसंख्या 9.7 अब्जांवर पोहचेल. या लोकसंख्येची भूक भागवणं हे तेव्हाचं सगळ्यांत मोठं आव्हान असेल.

त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी खाण्यायोग्य कीटकांची एक यादी जाहीर केली आहे. या संशोधकांचं म्हणणं आहे की कीटकांचा आपल्या जेवणात समावेश करण्याची वेळ आलेली आहे . कारण प्रोटीन असलेले कीटक पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांची किंमतही कमी आहे. दक्षिण-पूर्व आशियातल्या अनेक देशांमध्ये लोकांच्या जेवणात कीटकांचा समावेश असतो.

अर्थातच गटारांमध्ये किंवा नाल्यांमध्ये जी झुरळं आढळतात तशा झुरळांपासून हा ब्रेड बनवण्यात आलेला नाही. संशोधकांनी लॉबस्टर रोच (Nauphoeta cinerea) नावाच्या झुरळांच्या जातीच्या वापर हा ब्रेड बनवण्यासाठी केला आहे. ही प्रजाती मूळ उत्तर आफ्रिकेतली आहे. या झुरळांचा वापर टॅरांटुला स्पायडर्स (कोळी) आणि पाळीव पालींचं अन्न म्हणून केला जातो. जर लॉबस्टर रोचेसला एकत्र ठेवलं तर त्यांचं प्रजनन अत्यंत वेगाने होतं.

Image copyright FURG

संशोधकांनी या रोचेसची निवड दोन कारणांमुळे केली आहे. एक म्हणजे त्यांच्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात, म्हणजेच त्यांच्या एकूण शरीरघटकांच्या 70 टक्के, प्रोटीन असतं. रेड मीटमधून मिळणाऱ्या प्रोटीनच्या तुलनेत ते 50 टक्के जास्त आहे.

तसंच हे कीटक लक्षावधी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. अनादी काळापासून त्यांची जनुकीय वैशिष्ट्ये ही कायम राहिली आहेत. उत्क्रांतीनंतरही त्यांची वैशिष्ट्ये बदलली नाहीत.

"शरीरात कुठलेही बदल घडू न देता, इतकी वर्षं या झुरळांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे याचा अर्थ त्यांच्यात काही खास असलं पाहिजे," फुड इंजिनिअर अॅंड्रेसा जॅनट्झेन सांगतात. त्या ब्राझीलमधल्या रिओ ग्रॅंड इथल्या फेडरल युनिवर्सिटीमध्ये संशोधन करतात.

भरपूर प्रमाणात प्रोटीन

आपली सहकारी लॉरेन मेनेगॉनसोबत अॅंड्रेसा यांनी वाळलेल्या झुरळांची भुकटी बनवली. एक किलो भुकटी तयार करण्यासाठी अंदाजे 51 डॉलर (अंदाजे 3500 रुपये) खर्च आला. गव्हाचं पीठ आणि ही भुकटी 90:10 या प्रमाणात मिसळून हा ब्रेड बनवण्यात आला आहे. पण या ब्रेडच्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत.

Image copyright FURG
प्रतिमा मथळा वाळलेल्या झुरळांची भुकटी करतानाची प्रक्रिया

झुरळांची भुकटी ब्रेडमध्ये टाकण्यात आल्यानं ब्रेडमधलं प्रोटीनचं प्रमाण 133 टक्क्यांनी वाटलं आहे असं अॅंड्रेसा यांनी बीबीसी ब्राझीलला सांगितलं. "साध्या ब्रेडच्या 100 ग्रॅमच्या स्लाइसमध्ये 9.7 ग्रॅम प्रोटीन असतं. पण हे पीठ टाकल्यानंतर प्रोटीनचं प्रमाण 22.6 ग्रॅम बनलं. विशेष म्हणजे आम्ही ब्रेडमधल्या फॅटचं प्रमाण 68 टक्क्यांनी कमी केलं," त्यांनी पुढे सांगितलं.

या ब्रेडमध्ये आणि इतर ब्रेडमध्ये काही विशेष फरक नसल्याचं अॅंड्रेसा सांगतात. "आम्ही या ब्रेडचं विश्लेषण केलं आहे. ब्रेडची गुणवत्ता, रंग, गंध आणि चव या सगळ्या गोष्टींची आम्ही चाचणी केली. आम्हाला त्यात काही फारसा बदल जाणवला नाही. ज्या लोकांनी हा ब्रेड खाल्ला त्यांना असं वाटलं की त्याला शेंगदाण्याचा फ्लेवर आहे," त्या म्हणतात.

मानवी आहारात कीटकांचा समावेश असण्याविषयी प्राध्यापक एनिओ व्हिएरा यांचा खास अभ्यास आहे. ते आहारशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की असे अनेक कीटक आहेत ज्यांचा वापर आपण खाण्यासाठी करू शकतो. आपण पतंग, कीडे, मुंग्या, फुलपाखरं, रेशीमकीडे आणि विंचू देखील खाऊ शकतो असं त्यांना वाटतं.

Image copyright FURG
प्रतिमा मथळा प्रयोगशाळेत ही झुरळं वाढवण्यात आली आहेत.

"कीटक न खाण्यामागे आपले सांस्कृतिक पूर्वग्रह कारणीभूत ठरतात. कधीकधी कीटक आपल्या नकळत पोटात जातात आणि आपल्याला समजत देखील नाही." असं व्हिएरा सांगतात.

त्यांचं म्हणणं आहे की जर आपण जास्त कीटक खाल्ले तर त्याने पर्यावरणाची हानीसुद्धा टळेल.

1 किलो बीफ तयार करण्यासाठी आपल्याला 250 चौरस मीटर जागा लागते. पण तेवढेच कीटक हवे असतील तर केवळ 30 चौरस मीटर जागा आपल्याला पुरते. पाण्याचा वापर देखील कमी होऊ शकतो. 1 किलो कीटकांसाठी 1 लीटर पाणी पुरेसं ठरू लागू शकतं तर एक किलो बीफ तयार होण्यासाठी 20,000 लीटर पाणी खर्च करावं लागतं.

ब्राझीलच्या इनसेक्ट ब्रीडर असोसिएशनचं म्हणणं आहे की ब्राझीलमध्ये खाण्यायोग्य कीटकांच्या 95 प्रजाती आहेत. देशातील उष्ण कटीबंधीय वातावरणामुळे हे शक्य झाल्याचं ते नमूद करतात.

कीटक खाण्याची सवय जगभरात आढळते. संयुक्त राष्ट्राचं म्हणणं आहे की जगातल्या 2 अब्ज लोकांच्या आहारात कीटकांचा समावेश आहे.

अॅंड्रेसा आणि लॉरेन या कीटकांचा वापर इतरही खाद्यपदार्थ तयार करता येतील का याची शक्यता तपासून पाहत आहेत. केक, सीरियल बार आणि खाद्य तेल बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

असं असलं तरी कॉक्रोच ब्रेड तुम्हाला ब्राझीलच्या दुकानात मिळणार नाही. याचं कारण म्हणजे अजूनही इथे माणसांना कीटक खाण्याची परवानगी नाही. म्हणून हा ब्रेड प्राण्यांना खाऊ घातला जातो.

स्पेनमध्ये कीटकांपासून बनलेले खाद्यपदार्थ 'केअरफोर' या सुपरमार्केट चेनमध्ये उपलब्ध आहेत. इंग्लंडमध्ये 'इट ग्रब' ही खाद्यसेवा नाकतोड्यांपासून आणि कीटकांपासून बनलेले पदार्थ पुरवते.

पुढच्या पाच वर्षांत कीटकांपासून बनलेल्या खाद्यपदार्थांची उलाढाल 700 दशलक्ष डॉलर इतकी होईल असा अंदाज ग्लोबल मार्केट इनसाइट्स या संशोधन संस्थेनं बांधला आहे.

तर, मग तयार आहात का, झुरळांपासून बनलेला ब्रेड खाण्यासाठी?

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)