इराकमध्ये ऑनलाईन फॉर्म भरून होता येणार कॅबिनेट मंत्री

इराक Image copyright EPA
प्रतिमा मथळा नवनिर्वाचित पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांना नविन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

इराकच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नागरिकांना सामिल करण्यासाठी एक नवी वेबसाईट सुरू केली आहे.

सामान्य नागरिकांना आमंत्रित करत अदेल अब्दुल महदी म्हणाले की, ज्यांच्याकडे कामाचा अनुभव आणि कौशल्य आहे, त्यांनी नविन मंत्रिमंडळात सामिल होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.

या वेबसाईटवर (https://iraqcabinet2018.com) 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

महदी यांच्याकडे वैयक्तिक पातळीवर भेट घेऊन मंत्रीपदासाठी अर्ज येऊ लागले, तेव्हा त्यांना ऑनलाईन अर्जाची कल्पना सुचली, असं अधिकृतरित्या सांगण्यात आलं.

गेल्या आठवड्यात इराकचे राष्ट्रपती बरहाम सालेह यांनी महदी यांना नविन सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. महदी यांना 30 दिवसात मंत्रिमंडळ स्थापन करावं लागणार आहे.

इराकी सैन्यय आणि इस्लामिक स्टेट (IS) यांच्यातल्या दीर्घकाळ संघर्षाला आता विराम मिळाला आहे.

नव्या सरकारसमोरची आव्हाने

गेल्या काही वर्षांतल्या युद्ध संघर्षांमुळे इराकचा मुलभूत पाया ढासळला आहे. सरकारी कामकाजातला भ्रष्टाचार हा इराकमधला मुख्य मुद्दा आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे.

त्यामुळे इराकी लोकांनी अनेकदा रस्त्यांवर उतरून सरकार विरोधात मोर्चे काढले आहेत. नागरिकांचा विश्वास पुन्हा संपादन करणं, हे मोठं नव्या सरकारसमोर आव्हान असणार आहे.

इस्लामिक स्टेटचा पाडाव करण्यात इराकी सैन्याला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे सैन्यावरच्या खर्चात कपात करून सरकारी पैसा मुलभूत सुविधांकडे वळवता येईल.

कच्चतेल आणि त्यासंबंधित इतर उत्पादनांच्या किंमती वाढल्यानं नव्या सरकारला तो पैसा देशाच्या पुर्नबांधणीसाठी वापरता येणार आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा नागरिकांचा विश्वास पुन्हा संपादन करणं, हे नव्या सरकारसमोर आव्हान असणार आहे.

कोण आहेत इराकचे नवे पंतप्रधान?

नवनिर्वाचित पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी याआधी इराकच्या कम्युनिस्ट पक्षाचा गढ सांभाळला आहे. सत्तरच्या दशकात महदी हे 'इराक कम्युनिस्ट पार्टी'च्या केंद्रीय नेतृत्वात सामिल होते. पुढं 1980 पर्यंत त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. त्यानंतर मात्र शिया समुदायातून येणाऱ्या महदी यांनी इस्लामिक विचारांचा स्वीकार केला.

सद्दाम हुसेन यांच्या पायउतारानंतर स्थापन केलेल्या कार्यकारी सरकारमध्ये महदी हे उप-राष्ट्रपती होते. त्यानंतर त्यांनी United Iraqi Alliance यांच्या वतीनं निवडणूक लढवली. पण, एक मताच्या फरकानं महदी यांना हार पत्करावी लागली.

आतापर्यंत महदी यांच्यावर जहालवादी संघटनांनी दोनदा हल्ले केले आहे. अशाच एक घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)