मायकेल चक्रीवादळाचं अमेरिकेत थैमान : 'अनेकांनी सारं काही गमावलं'

फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ताशी 250 किमी वेगानं धडकलेल्या मायकेल चक्रीवादळाने थैमान घातलं आहे, असं फ्लोरिडाचे गव्हर्नर रिक स्कॉट म्हणाले.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा किनाऱ्याच्या काही भागात 8 फुटांपेक्षा मोठ्या लाटा उसळल्या होत्या तर काही भागांमध्ये लाटा 14 फुटांपर्यंत गेल्या होत्या.

अमेरिकेच्या किनाऱ्यावर आदळलेलं हे आतापर्यंतचं सगळ्यांत तीव्र चक्रीवादळ आहे. यात किनारपट्टीच्या तीन राज्यांत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे - फ्लोरिडात चार आणि जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिनामध्ये प्रत्येकी एक. तसंच मध्य-अमेरिकेत 13, होंड़ुरासमध्ये 6, निकारागुआमध्ये 4 आणि एल-साल्वाडोरमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अमेरिकेच्या वेळेनुसार बुधवारी दुपारी हे चक्रीवादळ किनारपट्टीवर आदळलं. त्यामुळे फ्लोरिडा पॅनहॅंडल किंवा फ्लोरिडा बिग बेंड भागात भूस्खलन झालं, रस्त्यांवर पाणी साचलं आणि घरं पाण्यात बु़डाली आहेत.

मंगळवारी ते दुसऱ्या श्रेणीत होतं, पण बुधवारी दुपारी ते चौथ्या श्रेणीत पोहोचलं आणि त्याचा ताशी वेग 250 किमीपर्यंत गेला. या वादळाने अचानक जोर पकडल्याने लोकांची तारांबळ उडाली आणि संपत्तीचं अतोनात नुकसान झालं.

"कित्येक आयुष्यं कायमची बदलली. अनेक कुटुंबांनी आपलं सारंकाही गमावलं," असंही स्कॉट म्हणाले.

जवळजवळ 3.7 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, पण अनेकांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

किनाऱ्याच्या काही भागात 8 फुटांपेक्षा मोठ्या लाटा उसळल्या होत्या तर काही भागांमध्ये लाटा 14 फुटांपर्यंत गेल्या होत्या.

"इथं आता वेगळीच परिस्थिती उद्भवली आहे," असं नॅशनल हरिकेन सेंटरचे (NHC) हवामानशास्त्रज्ञ डेनिस फेल्टगन यांनी सांगितलं. "1851पासून आतापर्यंत एवढं तीव्र चक्रीवादळ फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर आदळल्याचं दिसत नाही," असं ते पुढं म्हणाले.

फ्लोरिडाच्या गव्हर्नरने या वादळाला राक्षसी वादळ संबोधलं आहे. तसंच रहिवाशांना अधिकाऱ्यांबरोबर सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

फ्लोरिडा, अलाबामा, जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिनामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

मेक्सिको आणि फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर या वादळाचा सगळ्यांत आधी तडाखा बसला, असं NHCने सांगितलं. सुमारे 480 किमी किनाऱ्याला याचा फटका बसला आहे.

या वादळामुळे शाळा आणि सरकारी कार्यालयांना एक आठवड्याची सुटी जाहीर झाली आहे.

मायकेल चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या महिन्यात याच भागात फ्लोरेन्स चक्रीवादळानं थैमान घातलं होतं.

या भागातल्या 2001 पूर्वी बांधलेल्या इमारतींना चक्रीवादळाचा सर्वांत जास्त धोका असल्याचं व्हाइट हाऊसमधल्या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तीव्र चक्रीवादळचा सामना करण्याची त्या इमारतींमध्ये क्षमता नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)