खाशोग्जींच्या प्रकरणात धमक्यांना घाबरत नाही - सौदी अरेबिया

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : सौदीचे पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्यासोबत नेमकं काय झालं?

सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर दिल्या जात असलेल्या राजकीय आणि आर्थिक धमक्यांना भीक घालत नसल्याची भूमिका सौदी अरेबियाने घेतली आहे. 

सौदी अरेबियाची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या  SPAने शाही सरकारच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितलं की जर त्यांच्या देशाविरुद्ध कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई झाली तर त्याचं उत्तर आणखी एका मोठ्या कारवाईने दिलं जाईल. 

या सूत्राचं नाव सांगण्यास मात्र या वृत्तसंस्थेने नकार दिला. 

खाशोग्जी यांच्या हत्येला सौदी अरेबिया जबाबदार आहे, असं लक्षात आलं तर ते सौदीला 'शिक्षा' केली जाईल, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं होतं. 

'सौदी पत्रकार जमाल खाशोग्जींच्या खुनाचं रेकॉर्डिंग आहे' - टर्कीचा दावा

सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा मृत्यू इस्तंबूलमधील सौदीच्या वकिलातीत झाल्याचे ऑडिओ आणि व्हीडिओ पुरावे आपल्याकडे असल्याचं टर्कीने बीबीसीला सांगितलं आहे.

सौदी अरेबिया सरकारचे टीकाकार मानले जाणारे खाशोग्जी यांना 2 ऑक्टोबर रोजी टर्कील्या सौदीच्या वकिलातीत प्रवेश करताना शेवटचं पाहण्यात आलं होतं. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत.

टर्कीच्या गुप्तचर विभागाकडे त्यांच्या खुनाचे कागदोपत्री पुरावे आहेत, असं या तपासाशी निगडित एका सूत्राचं म्हणणं आहे.

सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.

सौदी अरेबियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, प्रिन्स अब्दुलाझीज बिन नैफ बिन अब्दुलाझिज म्हणाले, "त्यांना मारून टाकण्याचे आदेश खोटे आहेत आणि या आरोपांमध्ये काही तथ्य नाही."

खाशोग्जी मंत्र्यांबरोबर बाहेर पडले होते, या तपशीलाचा सौदीने पुनरुच्चार केला असून संपूर्ण सत्य जाणून घेण्याची सौदीचीही इच्छा असल्याचंही या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा जमाल खाशोग्जी

खाशोग्जी यांच्या बेपत्ता होण्यामुळे आणि कथित खुनाच्या बातम्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच व्यापार विश्वात सौदीच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.

व्हर्जिन ग्रूपचे सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सौदीतील एक अब्ज डॉलरची गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक उद्योगपती आणि मीडिया कंपन्यांनी या महिन्याच्या शेवटी प्रस्तावित असलेली गुंतवणूक परिषद रद्द केली आहे.

अमेरिकेने या परिषदेला उपस्थित राहण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती अमेरिकेच्या संसदेच्या फॉरेन अफेअर्स कमिटीने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना केली आहे. असं असलं तरी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्टिव्हन मनुचीन या परिषदेला हजर राहणार असल्याचं त्यांनी CNBC या अमेरिकन वृत्तवाहिनीला सांगितलं.

रेकॉर्डिंग नक्की काय आहे?

ताज्या बातम्यांनुसार वकिलातीत हल्ला आणि झटापट झाल्याचं कळतंय. टर्कीच्या संरक्षण खात्यातील सूत्रांनी ऑडिओ आणि व्हीडिओ रेकॉर्डिंग असल्याची खात्रीलायक माहिती बीबीसी अरेबिकला दिली आहे.

वॉशिंग्टन पोस्टने एका सूत्राच्या हवाल्यानुसार एक माणूस खाशोग्जी यांना मारहाण करताना ऐकू येत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांना ठार करताना आणि त्यांचे शरीराचे तुकडे करताना दिसत आहे.

"तिथे अरबी बोलणाऱ्या अनेक व्यक्तींचा आवाज ऐकू येत आहे," असं आणखी एका सूत्राने वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं. "त्यांची कशाप्रकारे चौकशी सुरू होती, कसा छळ करण्यात आला आणि कसा खून झाला ते यातून कळतं."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदीचे पत्रकार जमाल खाशोगी हे 2 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहेत.

खाशोग्जी एका वृत्तपत्रासाठी स्तंभलेखक होते. या आठवड्याच्या सुरुवातीला स्तंभलेखक केमाल ओझ्रूक यांनी खाशोगी यांना मारतानाचा व्हीडिओ उपलब्ध असल्याचा आरोप केला होता. ओझ्रूक तुर्की सरकारचे निकटवर्तीय मानले जातात.

खाशोग्जी वकिलातीत जातानाचं CCTV फुटेज टर्किश टीव्हीने आधीच प्रसारित केलं आहे. हतिस सेनिझ या टर्किश स्त्रीशी त्यांचं लग्न ठरलं आहे आणि यासंबंधी कागदपत्रं घेण्यासाठीच ते वकिलातीत आले होते.

सौदीचा गुप्तचर अधिकारी म्हणून ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीचा तुर्कीला येताना आणि परत जातानाचा एक व्हीडिओही समोर आला आहे.

खाशोग्जी बेपत्ता होण्यासाठी 15 जणांची एक टीम कारणीभूत असल्याचं टर्कीच्या प्रसारमाध्यामांचं मत आहे. माहेर मटरे नावाचे एक कर्नल त्यापैकी एक असल्याचं बीबीसीला सांगण्यात आलं आहे. हे कर्नल लंडनमध्ये असतात तर आणखी एक व्यक्ती विधी तज्ज्ञ आहे.

आता पुढे काय?

खाशोग्जी बेपत्ता आहेत, असं अधिकृतरीत्या सांगण्यात आलं असलं तरी त्यांचा मृत्यू झाल्याचंही त्यांना कळलं आहे.

तरी टर्की सरकारने सौदी अरेबियाबरोबर संयुक्तपणे चौकशी करण्याची तयारी दाखवली आहे. सौदीहून एक शिष्टमंडळ टर्कीत आलं असून आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

सौदीच्या राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य प्रिन्स खालिद अल-फैझल यांनी टर्कीला तातडीने भेट दिली. टर्की आणि सौदी यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही भेट होती. त्यांच्या भेटीनंतर आता हे शिष्टमंडळ तुर्कीत पोहोचलं आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा सौदीचं एक शिष्टमंडळ शुक्रवारी टर्कीमध्ये चर्चेसाठी दाखल झालं.

खाशोग्जी यांच्या बेपत्ता होण्यामुळे सौदीचे नवनिर्वाचित राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांची प्रतिष्ठा आणि इतर देशांबरोबरचे संबंध पणाला लागले आहेत, असं बीबीसी टर्कीचे प्रतिनिधी मार्क लॉवेन सांगतात.

त्याच वेळी खाशोग्जी यांच्या बेपत्ता होण्यामुळे सौदी अरेबिया आणि मध्य पूर्व भागात भीतीचं वातावरण पसरल्याचं एल्डर्स फाउंडेशनचे मध्य पूर्व भागाचे तज्ज्ञ जेन किनमॉन्ट यांनी सांगितलं. एका प्रतिष्ठित पत्रकाराबरोबर असं होऊ शकतं तर सामान्य माणसांची काय व्यथा असं प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)