मलावीत होतोय महात्मा गांधींच्या पुतळ्याला विरोध

गांधी Image copyright AFP

मलावी हा आग्नेय आफ्रिकेतला एक देश. या देशाचे भारताबरोबर उत्तम संबंध आहेत. सध्या तिथे महात्मा गांधी यांचा पुतळा हा वादाचा विषय झाला आहे.

मलावीतलं ब्लांटायर हे शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. तिथे महात्मा गांधी कॉन्फरन्स आणि कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा भारताचा इरादा आहे. त्या सेंटरमध्येच असणार आहे गांधींचा पुतळा.

या पुतळ्यास विरोध करण्यासाठी तिथे 3000पेक्षा अधिक लोकांनी एका ऑनलाईन याचिकेला पाठिंबा दिला आहे.

भारतीय आफ्रिकन लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असा गांधीजींना विश्वास होता आणि आफ्रिकेतल्या लोकांबाबत त्यांनी अपमानजनक वक्तव्यं केली होती, असं या ऑनलाइन याचिकेत म्हटलं आहे.

भारत आणि आफ्रिकेतील वसाहतवादाच्या विरुद्ध गांधीजींचं योगदान दाखवण्याचा उद्देश या पुतळ्यातून साध्य होणार असल्याचं स्थानिक सरकारचं मत आहे.

ब्लांटायरमधल्या महात्मा गांधी कॉन्फरन्स आणि कन्व्हेंशन सेंटरसाठी सुमारे 74 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

येथे उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मकोत्मा काटेंगा-कौंडा यांनी 'बीबीसी फोकस ऑन आफ्रिका' शी याबाबतीत चर्चा केली.

त्यांच्या मते, "गांधीचा अशाप्रकारे सत्कार करण्यास आक्षेप आहे, कारण गांधींचा मालवीशी काहीही संबंध नव्हता."

Image copyright Getty Images

"आम्ही आमच्याकडच्या मोठ्या नेत्यांचे पुतळे उभारलेले नाहीत. आमच्याकडे फक्त देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष हॅस्टिंगस कमुझू बंदा यांचाच पुतळा आहे," असं ते म्हणाले.

येथेही झाला विरोध

2016मध्ये घानातील विद्यापीठातून गांधीचा पुतळा हटवण्यासाठी अशीच एक मोहिम राबवण्यात आली होती.

वर्णभेदाचा सामना करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधींची प्रशंसा केली होती. त्यांच्यामुळे अल्पसंख्यांसाठी लढण्यासाठी मदत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

इथोपियातील तत्कालीन राजे हेअल सेलासी पहिले यांनीही गांधीजींची स्तुती केली होती.

"महात्मा गांधी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आठवणीत राहतील. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी जे लोक लढले त्यांना गांधीजी कायम लक्षात राहतील," असं राजे हेअल सेलासी म्हणाले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)