जे तोफा-बंदुकांना नाही जमलं ते रासायनिक शस्त्रांनी साध्य केलं

ऑक्सिजन पुरवठा केलेलं बाळ Image copyright EPA

सीरियामध्ये सात वर्षांच्या भीषण गृहयुद्धात साडेतीन लाखांहून जास्त लोकांचा बळी गेल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद अखेर विजयाच्या जवळ आहेत. या विजयामुळे त्यांना सत्तेवरून बाहेर करू पाहणाऱ्या शक्तींचा अंत होईल आणि सत्तेवर त्यांची पकड अधिक मजबूत, असं सांगितलं जात आहे.

बशर अल-असद या भीषण युद्धात विजयाच्या जवळ कसे पोहोचले? बीबीसी पॅनोरमा आणि बीबीसी अरेबिक यांनी संयुक्तपणे याचा मागोवा घेतला. त्यात एक बाब समोर आली, ती म्हणजे या युद्धात असद यांनी केलेला रासायनिक अस्त्रांचा वापर निर्णायक ठरला.

असद सरकारनं सीरियात लोकांविरोधात रासायनिक अस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. याचे ठोस पुरावे आहेत आणि सीरियामध्ये सप्टेंबर 2013 पासून कमीतकमी 106 रासायनिक हल्ले झाल्याचा बीबीसीला ठाम विश्वास आहे.

या दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी इंटरनॅशनल केमिकल वेपन्स कन्वेन्शनमध्ये झालेल्या करारांवर (CWC) स्वाक्षरी केली होती, ज्यानुसार त्यांनी देशातल्या रासायनिक अस्त्रांचा साठा नष्ट करण्यावर सहमती दर्शवली होती.

Image copyright AFP

पण या कराराची अंमलबजावणी राजधानी दमास्कसभोवतालच्या उपनगरांमध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यांच्या महिन्याभरानंतर सुरू झाली. सारिन हे नर्व्ह एजेंट या हल्ल्यात वापरण्यात आलं होतं, ज्यात शेकडो लोकांचा जीव गेला होता. पीडितांचे मन हेलावून टाकणारे फोटो संपूर्ण जगानं बघितले.

असे हल्ले फक्त सरकारच करू शकतं, असं पाश्चिमात्य राष्ट्रांचं म्हणणं होतं. मात्र राष्ट्राध्यक्ष असद यांनी या हल्ल्यांसाठी विरोधकांना जबाबदार ठरवलं होतं.

त्यावेळी अमेरिकेनं सीरियावर लष्करी कारवाईची धमकीही दिली होती. मात्र सीरियाचा मित्रराष्ट्र असलेल्या रशियानं असद यांना रासायनिक शस्त्रसाठा नष्ट करण्यासाठी तयार केलं. त्यानंतर या सामंजस्य करारानंतर अमेरिकेनही नमतं घेतलं.

पण Organisation for the Prohibition of Chemical Weapons (OPCW) म्हणजेच रासायनिक शस्त्रं प्रतिबंधक संघटना आणि संयुक्त राष्ट्रांनी सीरियातली 1,300 टन रासायनिक अस्त्र नष्ट केल्याचं जाहीर करून देखील सीरियात रासायनिक हल्ले होतच राहिले.

2016 मध्ये सारियातल्या अलेप्पो शहरावर असाद यांचं सैन्य येण्याआधी विरोधकांचा ताबा होता. तेव्हा अलेप्पो शहरात राहणारे अबू जाफर सांगतात, "रासायनिक हल्ले भयंकर होते. काहीही कळायच्या आत लोकांचा श्वास निघून जायचा. मात्र असे रासायनिक हल्ले आणखी क्रूर आहेत, कारण त्यात माणसं हळूहळू मरतात. त्यांना आक्सिजनची कमतरता जाणवते आणि ते मृत्यूच्या समुद्रात गटांगळ्या खात मरतात. खरंच हे खूपच भीतीदायक असतं."

मात्र असद यांनी नेहमीच सरकारने रासायनिक हल्ले केल्याचा इन्कार केला आहे.

रासायनिक अस्त्र म्हणजे काय?

OPCW ही संस्था जगभरातल्या रासायनिक अस्त्रांवर लक्ष ठेवते आणि रासायनिक शस्त्रास्त्र परिषदही आयोजित करते. त्यांनी दिलेल्या व्याख्येनुसार एक रासायनिक शस्त्र ते असतं ज्यात एका रसायनाचा वापर करून माणसांना मारण्याच्या हेतू असतो किंवा त्याच्या विषारी रसायनांतून लोकांना हानी पोहोचवण्याचा उद्देश असतो.

Image copyright AFP

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यानुसार रासायनिक अस्त्रांच्या वापरावर बंदी आहे. विशिष्ट परिस्थितीतच या शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी ठोस लष्करी कारणं असावी लागतात. या शस्त्रांच्या वापरामुळे वातावरणावरही खूप वाईट परिणाम होतो. रासायनिक शस्त्रांमुळे होणारे घाव खूप वेदनादायी असतात आणि ही वेदना दिर्घकाळ राहते.

सीरियामध्ये 2014 पासून OPCW यांचं फॅक्ट फाइंडिग मिशन आणि OPCW-संयुक्त राष्ट्रांच्या तपास पथकानं सीरियात विषारी रसायनांच्या वापराची पडताळणी केली. या पडताळणीत सप्टेंबर 2013 ते एप्रिल 2018 या काळात रसायनं आणि हत्यार म्हणून रसायनांचा वापर केल्याचं निष्पन्न झालं आहे, असं या तपास पथकाचं म्हणणं आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकाराचा स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आयोग आणि संयुक्त राष्ट्रांशी संलग्न इतर पथकांनी देखील 18 वेळा रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याचं आपल्या तपासात म्हटलं आहे.


बीबीसी पॅनोरमा आणि बीबीसी अरेबिकनं सीरियामध्ये रासायनिक हल्ल्यांचे 164 अहवाल तपासले. या तपासाच सीरियामध्ये हे हल्ले CWCवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर झाले आहेत.

सीरियातल्या या 164 पैकी 106 हल्ल्यांमध्ये रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याची बीबीसीला खात्री आहे आणि त्याचे ठोस पुरावेदेखील आहेत. मात्र यातल्या काहीच घटना बातम्यांमध्ये झळकल्या. हल्ल्यांच्या पद्धतीवरून यात रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचं कळतं.

सीरियामध्ये OPCW मिशनचे माजी प्रमुख ज्युलियन तंगाअरे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "सरकारी सैन्याला या हल्ल्यांमधून बराच फायदा झाल्याचं वाटतं, तसे संकेत त्यांच्याकडूनच मिळाले. म्हणूनच त्यांनी रासायनिक हल्ले करणं सुरूच ठेवलं."

संयुक्त राष्ट्रांमध्ये ब्रिटनचे स्थायी प्रतिनिधी कैरेन पिअर्स यांचं म्हणणं आहे की सीरियात रासायनिक अस्त्रांचा वापर "धारिष्ट्याचं" आहे. त्या म्हणतात, "या हल्ल्याचा परिणाम भयंकर असतो म्हणूनच नव्हे तर या शस्त्रांच्या वापरावर बंदी आहे म्हणूनही... गेल्या शंभर वर्षांपासून ही बंदी आहे."


बीबीसीने ही माहिती कुठून मिळवली?

बीबीसीने सप्टेंबर 2013 नंतर सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यांच्या 164 अहवालांची पडताळणी केली. हे अहवाल अनेक विश्वासार्ह स्रोतांकडून आले आहेत. जे सीरियातल्या कुठल्याच संघर्षाचा भाग नाहीत. यात आंतरराष्ट्रीय आयोग, मानवाधिकार समूह, मेडिकल ऑर्गनायझेशन आणि थिंकटँक यांचा समावेश आहे.

या पडताळणीत बीबीसीच्या अभ्यासकांनी संयुक्त राष्ट्र आणि OPCW यांच्या पूर्वीच्या तपासाचं अनेक स्वतंत्र विश्लेषकांच्या मदतीनं विश्लेषण केलं.

या विश्लेषणात सर्व हल्ल्यांची सार्वजनिक डेटाशीही तुलना करण्यात आली. यात हल्ल्यातले पीडित आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि हल्ल्यांचे फोटो आणि व्हिडियोंचाही समावेश करण्यात आला. तज्ज्ञांकडूनही बीबीसीच्या या पडताळणी प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्यात आली.

बीबीसी जाणकारांनी एकाच स्रोताकडून आलेल्या घटनांचा आपल्या पडताळणीत समावेश केलेला नाही. म्हणजेच घटनांच्या बाजूने पुरेसे पुरावे मिळाल्यानंतरच त्यांची पडताळणी करण्यात आली. यात एकूण 106 वेळा रासायनिक हल्ले झाल्याचं स्पष्ट होतं.

बीबीसीच्या पथकाला सीरियामध्ये प्रत्यक्ष जाऊन शूटिंग करण्याची किंवा तिथं जाण्याचीही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्पष्टपणे हल्ल्यांच्या पुराव्याची पुष्टी करू शकत नाही. प्रत्येक घटनेचे ठोस पुरावे मात्र आहेत. पुराव्यांदाखल व्हीडियो, फोटो आणि ठिकाणांची सविस्तर माहिती वेळेसह देण्यात आली आहे.

Image copyright Reuters

बीबीसी डेटानुसार सीरियातल्या वायव्येकडील प्रांत इडलिबमध्ये अशा प्रकारचे सर्वाधिक हल्ले झाले आहेत. त्यानंतर जवळच्याच हामा, अलेप्पो आणि राजधानी दमास्कसजवळच्या पूर्व घूटामध्ये रासायनिक हल्ले झाले आहेत. हे सर्व प्रदेश तेव्हा विरोधकांच्या ताब्यात होते आणि संघर्षग्रस्त होते.

रासायनिक हल्ल्यांनंतर हामा प्रांतातल्या कफ्र झितामध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली. यानंतर पूर्व घूटातल्या डुमामध्ये बळी गेलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. ही दोन्ही शहरं बंडखोर आणि सरकारी लष्कर यांच्यातली युद्धमैदानं होती.

काही वृत्तांनुसार 4 एप्रिल 2017 रोजी इडलिब प्रांताच्या खान शेईखौन शहरात झालेल्या रासायनिक हल्ल्यात एकाच वेळी 80 लोक ठार झाले होते.

असे रासायनिक हल्ले प्राणघातक असतातच. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेनुसार गजबजलेल्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक मारले गेले, शेकडो जखमी झाले. कारण या हल्ल्यांमध्ये काही जुन्याच शस्त्रांचा बेकायदेशीरपणे वापर करण्यात आला होता.

अनेक पुरावे सीरिया सरकारच्या विरोधात

OPCW आणि संयुक्त राष्ट्रांच्या मिशनच्या अधिकाऱ्यांनी जून 2014 मध्ये सीरियात सर्व घोषित रासायनिक अस्त्रांना नष्ट करण्याची घोषणा केली. रशिया आणि अमेरिका यांच्यात सीरियातल्या रासायनिक अस्त्रांना नष्ट करण्यावर 2013 मध्येच एकमत झालं होतं.

OPCWच्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले इंस्पेक्टर टँगाईर यांचं म्हणणं आहे, "ज्या शस्त्रसाठ्याची आम्हाला माहिती होती, त्यांना नष्ट करण्यात आलं. जी माहिती आम्हाला देण्यात आली तेवढीच माहिती आम्हाला होती. प्रश्न विश्वासाचा होता. ज्या साठ्यांची घोषणा करण्यात आली, त्यावर आम्ही विश्वास ठेवला."

जुलै 2018मध्ये OPCWचे महासंचालक अहमत उजुमकू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला सांगितलं की त्यांची टीम सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे. जून 2014मध्ये सीरियातली रासायनिक अस्त्र नष्ट झाल्याच्या घोषणेनंतरदेखील त्यांचा वापर थांबला नाही. हल्ल्यांमध्ये या अस्त्रांचा वापर सुरूच राहिला.

4 एप्रिल 2017 रोजी खान शेईखौन इथं अब्दुल योशेफ यांची पत्नी, त्यांची अकरा महिन्यांची दोन जुळी मुलं, दोन भाऊ, एक पुतण्या आणि अनेक शेजारी ठार झाले. त्या घटनेला आठवून योशेफ सांगतात की त्यांचे कुटुंबीय आणि शेजारीपाजारी अचानक जमिनीवर कोसळले.

Image copyright AFP

ते सांगतात, "सर्वजण थरथर कापत होते आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तो भयंकर क्षण होता. मला नंतर कळलं की हा रासायनिक हल्ला होता. मला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मला शुद्ध आली तेव्हा मी माझी बायको आणि मुलांबद्दल विचारलं. पंधरा मिनिटांतच माझ्यासमोर सर्वांचे मृतदेह पडले होते. मी माझ्या आयुष्यातली सर्व अनमोल नाती गमावली होती."

OPCW आणि संयुक्त राष्ट्र यांच्या संयुक्त पडताळणीत त्यांचाही मोठ्या संख्येने समावेश करण्यात आला आहे ज्यांनी सरीन गॅसचा हल्ला अनुभवला आहे. सरीनबद्दल सांगितलं जातं की हा वायु सायनाईडपेक्षा वीसपट अधिक घातक आहे.

हा वायू शरिरातल्या पेशींसाठी घातक असतो. या सरीन वायूच्या हल्ल्यासाठी सीरिया सरकार जबाबदार असल्याचं आपण खात्रीशीरपणे सांगण्याच्या स्थितीत असल्याचं संयुक्त तपास पथकांचं म्हणणं आहे. शहरात बाँबहल्ला केल्याचे सीरियाच्या एअरफोर्सवर आरोप आहेत.

Image copyright AFP

खान शेईखौनहून जे फोटो आले त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाच्या एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश दिला होता. मात्र खान शेईखौनच्या घटनेला उगाच रंगवून सांगण्यात आल्याचं बशर अल असाद यांचं म्हणणं होतं.

तिकडे रशियाचं म्हणणं होतं की सीरियाने अतिरेक्यांच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ला केला आहे आणि तिथं अतिरेक्यांनी रासायनिक अस्त्रांचा साठा ठेवला होता.

मात्र OPCWचे एक सदस्य स्टिफन मोग्ल यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पथकाला सीरिया सरकारनं खान शेईखौनमध्ये सरीन गॅसचा वापर केल्याचे पुरावे मिळाले आहेत. ते म्हणाले की, सरीन सॅम्पल आणि 2014मध्ये सीरियात नष्ट करण्यात आलेली रासायनिक अस्त्र यात साम्य आढळलं.

Image copyright Reuters

संयुक्त तपास पथकाचं म्हणणं आहे की सरीन सॅम्पल आणि शस्त्रास्त्र साठ्यांमध्ये इतकी समानता आहे की त्यावरून संशय निर्माण होत नाही, उलट यात सीरियाचा समावेश असल्याचं स्पष्ट होतं. मोग्ल म्हणतात, "यावरून स्पष्ट होतं की सीरियामध्ये सर्व शस्त्रास्त्र नष्ट झालेली नाहीत."

पुराव्यांदाखल मिळालेले व्हिडियो, फोटो आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून स्पष्ट होतं की 106 पैकी 51 हल्ले हे हवाई हल्ले होते. हे हवाई हल्ले सीरिया सरकारने केल्याचं बीबीसीचं मत आहे.

2015नंतर रशियानेसुद्धा सीरियामध्ये असद यांच्या समर्थनार्थ अनेक हवाई हल्ले केले. रशियाच्या सैन्यानं सीरियात रासायनिक अस्त्रांचा वापर केला नाही, हे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या तपासात स्पष्ट झालेलं नाही.

रासायनिक अस्त्रांचा वापर रणनीतीक ठरला

चॅटम हाउसच्या डॉ. खातिब यांचं म्हणणं आहे की रासायनिक अस्त्रांचा वापर असाद सरकारनं तिथंच केला जिथं त्यांना कठोर संदेश द्यायचा होता. त्यांचं म्हणणं आहे की बंडखोरांचं अस्तित्व असादच्या लष्कराला मान्य नाही, हा संदेश तिथल्या रहिवाशांनाही द्यायचा होता.

लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आला. या संघर्षात जेव्हा-जेव्हा असाद सरकारला ठेच लागली तेव्हा तेव्हा रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आला.

Image copyright AFP

जनतेसाठी रासायनिक अस्त्रांपेक्षा जास्त भीतीदायक इतर काही असू शकत नाही. अलेप्पोमधलं युद्ध असद यांच्यासाठी आव्हानात्मक ठरलं होतं. तिथंही रासायनिक अस्त्रांचा वापर रणनीती म्हणून करण्यात आला.

अबू जाफर यांनी सीरियाच्या विरोधकांसोबत एक फॉरेंसिक वैज्ञानिक म्हणून काम केलं आहे आणि जेव्हा हल्ले सुरू होते त्यादरम्यान ते अलेप्पोमधेच होते. जाफर यांनी रासायनिक हल्ल्यात ठार झालेल्यांच्या मृतदेहांची तपासणी केली होती.

ते म्हणतात, "मी शवागारांमध्ये गेलो होतो. तिथं क्लोरिनचा वास नाकात घुमत होता. मी मृतदेहांची तपासणी केली तेव्हा कळलं की क्लोरिनमुळे त्यांचा श्वास गुदमरला होता. या प्रदेशातल्या आकाशात नेहमीच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर्स दिसायचे."

क्लोरिन सोडल्याक्षणी त्याचं वायूत रुपांतर होतं. हा वायू हवेपेक्षा जड असतो आणि कमी दबावाच्या क्षेत्रात प्रवेश करतो. लोकं बेसमेंटमध्ये लपत होते. सगळीकडे अफरातफरी माजली होती. क्लोरीन जेव्हा नम टिशू म्हणजे डोळे, गळा आणि फुफ्फुस यांच्या संपर्कात येतो तेव्हा यातून निघणारं अॅसिड खूप वाईट परिणाम करतं.

मात्र आपण कधीच क्लोरीनचा वापर केला नाही, असं सीरिया सरकारचं म्हणणं आहे. मात्र अलेप्पोमध्ये अकरा ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये क्लोरीनचा वापर झाल्याचं बीबीसीच्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)