Condom : सेल्फ ल्युब्रिकेटिंग कंडोम वापरून लैंगिक आजारांचा प्रसार थांबवता येणार?

कंडोम

फोटो स्रोत, Getty Images

त्वचेशी संपर्कात आल्यानंतर ल्युब्रिकंट आपोआप स्त्रवेल, असं नवं कंडोम संशोधकांनी विकसित केलं आहे.

नव्याने शोधण्यात आलेले हे सेल्फ ल्युब्रिकेटिंग कंडोम लोकांना जास्त भावतील, त्यामुळे कंडोमचा वापर वाढून लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल, अशी आशा संशोधकांना आहे.

कंडोम ल्युब्रिकेटेड नसला तर सेक्स वेदनादायी होऊ शकतो, शिवाय कंडोम फाटण्याचा धोकाही असतो.

योग्य पद्धतीने वापरलं तर कंडोममुळे गर्भधारणा रोखता येते आणि काही जीवघेणे लैंगिक आजारही टाळता येऊ शकतात.

पण अनेकांना सेक्स करताना कंडोम वापरणं आवडत नाही. पण हे नव्याने शोधण्यात आलेले सेल्फ ल्युब्रिकेटिंग कंडोम शरीरातील स्त्रावांच्या संपर्कात आल्यानंतर स्वतः ल्युब्रिकेट होतात. त्यामुळे संभोगाच्या क्रियेला जितका वेळ लागतो, त्यापेक्षा जास्त वेळ हे कंडोम ल्युब्रिकेटेड राहू शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.

बाजारात मिळणाऱ्या ल्युब्रिकेटेड कंडोमच्या तुलनेत हे कंडोम अधिक चांगले असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. या संशोधनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने निधी दिला आहे.

कंडोम वापरताना होणाऱ्या चुका

1. तेलापासून बनलेले ल्युब्रिकंट लेटेक्स कंडोम खराब करू शकतात. म्हणून असे ल्युब्रिकंट टाळले पाहिजेत. त्यापेक्षा पाणी किंवा सिलिकॉनपासून बनलेले ल्युब्रिकंट वापरणं योग्य असतं.

2. एकदा वापरलेले कंडोम पुन्हा वापरू नयेत.

3. कंडोम कसे ठेवता, यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण खिशात, पाकिटात चुकीच्या पद्धतीने ठेवलेले कंडोम खराब होऊ शकतात.

4. कंडोम वापरताना त्याच्या टोकातील हवा निघून जाईल याची काळजी घ्यावी. तसं न केल्यास कंडोम फाटू शकतो.

संशोधकांनी काही लोकांना या कंडोमला स्पर्श करण्यासाठी सांगितलं. त्यातील बहुतेक लोकांनी हा कंडोम अधिक चांगला असल्याचं सांगितलं.

बोस्टन युनिव्हर्सिटीमधील संशोधक प्रा. मार्क ग्रिनस्टाफ म्हणाले, "या कंडोमला स्पर्श केला तर तो कोरडा वाटतो. पण जेव्हा तो पाणी किंवा इतर द्रव पदार्थांच्या संपर्कात येतो, तेव्हा हा कंडोम ल्युब्रिकेट होतो. या कंडोमला अॅक्टिव्ह करण्यासाठी एखाद्या द्रवाची गरज पडते."

प्रत्यक्षात हा कंडोम कसा वापरता येईल, यासाठी अधिक चाचण्यांची आवश्यकता आहे, तर क्लिनिकल ट्रायल पुढील वर्षी सुरू होतील, असं प्रा. मार्क म्हणाले.

सरकारी परवानग्या मिळाल्या तर या विद्यापीठाची एक कंपनी याचं उत्पादन सुरू करणार आहे.

सुलभता

क्वीन्स विद्यापीठामधील डॉ. निकोला अर्विन म्हणाल्या, "हायड्रोफिलिक कोटिंग दिलेल्या कॅथेटर्स बाजारात उपलब्ध आहेत. रुग्णांना मूत्रविसर्जनासाठी कॅथेटर बसवावा लागणार असेल तर हायड्रोफिलिक कॅथेटर रुग्णासाठी जास्त आरामदायी असतात."

जेल-ल्युब्रिकेटेड कॅथेटरशी तुलना करता हायड्रोफिलक कोटिंग असणारे कॅथेटर जास्त स्वीकार्ह आहेत. असेच सेल्फ ल्युब्रिकेटेड कंडोमबद्दल होऊ शकतं, पण याच्या अधिक चाचण्या घेणं आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ ओलोंगाँगमधील संशोधक हायड्रोजेलपासून सेल्फ ल्युब्रिकेटिंग कंडोम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. लेटेक्स किंवा रबर यापासून बनलेल्या कंडोमपेक्षा हे कंडोम मानवी त्वचेसारखे असतील, असं या संशोधकांचा दावा आहे.

लैंगिक आरोग्यावर काम करणारी संस्था FPAच्या प्रतिनिधी बेकी बरबिज यांनी या शोधांचं स्वागत केलं आहे. त्या म्हणाल्या, "कंडोमच्या वापरासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या नव्या संशोधनांच आम्ही स्वागत करतो. लैंगिक संबंधातून पसरणारे आजार आणि गर्भनिरोधक अशा दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारे एकमेव साधन म्हणजे कंडोम आहे. म्हणून कंडोमचा वापर करताना लोकांना सुलभ वाटणं आवश्यक आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)