तेलुगू बोलता येत असेल तर अमेरिकेत तुमचं स्वागत आहे

  • रिअॅलिटी चेक टीम आणि बीबीसी तेलुगू
  • बीबीसी न्यूज
तेलुगू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मिस अमेरिकेचा किताब जिंकणारी नीना दावुलूरी ही पहिली भारतीय-अमेरिकन आहे. तेलुगू आहे.

अमेरिकेत इंग्रजी वगळता कुठली भाषा सर्वाधिक बोलली जाते, याचा अभ्यास केला तेव्हा समोर आली ती तेलुगूबद्दलची आकडेवारी.

दावा : अमेरिकेत तेलुगू भाषिकांची संख्या झपाट्याने वाढते आहे.

निकाल : अमेरिकेत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार हा दावा खरा असल्याचं सिद्ध झालं आहे. अमेरिकेत गेल्या सात वर्षात तेलुगू बोलणाऱ्यांची संख्या 86 टक्क्यांनी वाढली आहे. अर्थात, असलं तरीही अमेरिकेत इंग्रजी वगळता सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या वीस भाषांमध्ये तेलुगूला अजून स्थान मिळालेलं नाही.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ऑनलाईन टाकलेल्या एका व्हीडिओवरून हे सिद्ध होतं. या व्हीडिओनुसार 2010 ते 2017 या काळात तेलुगू बोलणाऱ्या अमेरिकन नागरिकांची संख्या 86% वाढली आहे.

सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडी या अमेरिकास्थित संस्थेने केलेल्या अभ्यासासाठी हा व्हीडिओ देण्यात आला आहे. अमेरिकेत किती भाषा बोलल्या जातात हे जाणून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासात जनगणनेच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं.

तेलुगू झपाट्याने वाढण्यामागचं कारण काय?

दक्षिण भारतातल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यात तेलुगू भाषा बोलली जाते. या दोन्ही राज्याची एकत्र लोकसंख्या जवळपास 8 कोटी 40 लाख एवढी आहे. 2011च्या जणगणनेनुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत तेलुगूचा चौथा क्रमांक लागतो.

अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या भाषेविषयीच्या या अभ्यासासाठी अमेरिकन कम्युनिटी सर्व्हिसकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेण्यात आला. यात 2010 ते 2017 दरम्यान अमेरिकन नागरिक घरी इंग्रजीशिवाय कोणती भाषा बोलतात, याची तुलना करण्यात आली.

गेल्यावर्षी अमेरिकेत जवळपास चाळीस लाख तेलुगू भाषिक होते. 2010च्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे.

अमेरिकेत झपाट्याने वाढणाऱ्या पहिल्या दहा भाषांमध्ये सात भाषा या दक्षिण आशियातील आहेत.

अमेरिकेत झपाट्याने वाढणाऱ्या भाषा(2010 ते 2017)

तेलुगूच का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अमेरिकेत तेलुगू पीपल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक प्रसाद कुनीसेट्टी यावर अधिक प्रकाश टाकतात. त्यांच्या मते हैदराबाद शहर आणि अमेरिकेतील इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी कंपन्या यांच्यात तयार झालेले संबंध, यामागचं प्रमुख कारण आहे. स्वतः कुन्नीसेट्टी 2001 साली आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अमेरिकेत गेले होते.

ते सांगतात, 1990च्या मध्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्यामुळे अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली.

हैदराबादमधल्या महाविद्यालयातून अनेकांची भरती करण्यात आली. तेलुगू भाषिक असेलल्या या दोन्ही राज्यांमध्ये मिळून जवळपास 800 इंजिनिअरिंग महाविद्यालयं आहेत.

भारतात टेक्नॉलॉजी आणि इंजीनिअरिंग क्षेत्रासाठी हैदराबाद महत्त्वाचं केंद्रस्थान बनलं आहे आणि इथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अमेरिकेत जातात.

गेल्या अनेक वर्षांपासून तेलुगू भाषिक अमेरिकन नागरिक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थ्यांना पसंती देत आहेत.

H-1B व्हिसा योजनेचा फायदा अनेक भारतीयांना मिळाला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रासह अनेकांना या व्हिसामुळे परदेशात नोकरीची संधी मिळाली आहे. या व्हिसातले जवळपास 70% व्हिसा भारतीयांना मिळतात. हा व्हिसा असणाऱ्यांना कायमस्वरुपी नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो.

अमेरिकास्थित भारतीयांमधली काही नावाजलेली नावं म्हणजे भारतीय वंशाची पहिली मिस अमेरिका निना दाउल्लुरी आणि मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ सत्या नाडेला.

अमेरिकेत इंग्रजीव्यतिरिक्त सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 10 भाषा

टक्केवारीच्या तुलनेत तेलुगू भाषेने मोठी मजल मारली आहे. मात्र पूर्वी तेलुगू भाषिकांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे टक्केवारी वाढली असली तरी तेलुगू भाषकांची संख्या इतर भाषकांएवढी वाढलेली नाही.

सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडीजने दिलेल्या माहितीनुसार 2010 ते 2017 या काळात स्पॅनिश (जवळपास 40 लाख अधिक), चायनीज, अरेबिक आणि हिंदी भाषकांची संख्याही वाढली आहे.

अमेरिकेच्या 32 कोटी लोकसंख्येतील जवळपास 6 कोटी नागरिक स्पॅनिश बोलतात.

सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दक्षिण आशियाई भाषेत पहिला क्रमांक हिंदीचा लागतो. त्यापाठोपाठ उर्दू, गुजराती आणि नंतर तेलुगूचा क्रमांक लागतो.

फोटो स्रोत, Getty Images

याउलट घरी फ्रेंच किंवा जर्मन बोलणाऱ्या अमेरिकी नागरिकांची संख्या कमी झाली आहे. गेल्या दशकात घरी इटालियन बोलणाऱ्यांची संख्या जवळपास दोन लाखाने घसरली आहे.

सर्वेक्षण करण्यात आलेल्या तेलुगूभाषकांपैकी 80% लोकांचं म्हणणं आहे की ते उत्तम इंग्रजी बोलतात.

जॉर्ज मॅन्शन विद्यापीठातील भाषाविषयक प्रोफेसर जेनिफर लीमन यांच्या म्हणण्यानुसार, जनगणनेच्या या माहितीमध्ये एक त्रुटी आहे आणि ती म्हणजे यात लोकांना ते किती उत्तम इंग्रजी बोलतात, हे विचारण्यात आलं. मात्र दुसरी भाषा तितक्याच उत्तम प्रकारे बोलू शकतात का, हे विचारलेलं नाही.

त्या म्हणतात, "उत्तम इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना दुसरी भाषा किती उत्तम येते, हे जाणून घेणं कठीण आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा अशी व्यक्ती अमेरिकेतच जन्मलेली असेल किंवा बालवयातच अमेरिकेत येऊन स्थायिक झाली असेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)