अमेरिका संशयित स्फोटकं : FBIच्या हाती लागले फ्लोरिडामध्ये धागेदोरे

अमेरिका संशयित स्फोटकं

फोटो स्रोत, EPA

अमेरिकन तपास संस्था FBIने संशयित स्फोटकांसदर्भात फ्लोरिडा येथील पोस्ट ऑफिसची तपासणी केली. या स्फोटकांमागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या नामांकित व्यक्तींच्या घरी, रेस्टॉरंट आणि कार्यालयात संशयित स्फोटकांची पाकिटं पाठवण्यात आली होती.

मियामी शहराच्या इशान्य भागातील एका पोस्ट ऑफिसमधून ही स्फोटकं पाठवण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त FBIने अधिक माहिती उघड केलेली नाही.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि बिल क्लिंटन यांच्यासह इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरी स्फोटकं पाठवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अमेरिकेत राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत.

ओपा-लोका येथील पोस्ट ऑफीसमधले CCTV कॅमेरेही तपासले जात आहेत. बाँब शोध पथकही त्याठिकाणी दाखल झालं आहे.

ब्रेनॉन यांच्या नावाचं पाकीट मेलरूमध्ये सापडल्यानंतर CNNचं न्यूयॉर्क येथील कार्यालय बुधवारी सकाळी रिकामं करण्यात आलं होतं. पण तिथे कोणतीही संशयित वस्तू सापडली नाही.

पाकिटात काय होतं?

या पाकिटांत पाईप बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओबामा आणि क्लिंटन यांना पाठवण्यात आलेली पाकिटं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी सुरक्षा रक्षकांनी अडवली होती.

फोटो स्रोत, FBI

फोटो कॅप्शन,

संशयित स्फोटकाचं पाकिट

Manila Envelopesमध्ये ही पाकिटं पाठवण्यात आली होती. यावर कॉम्प्युटर प्रिटेंड लेबल लावण्यात आलं होतं.

डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचे माजी अध्यक्ष डेबी वासरमॅन यांनी हे पाकीट पाठवलं आहे, असा सेंडर म्हणून त्यावर उल्लेख केलेला होता. त्यांच्या नावाचं स्पेलिंग मात्र चुकलेलं होतं.

"माझं नाव का वापरण्यात आलं आहे हे मला समजत नाहीये, यामुळे मला खूप दु:ख झालं आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेनॉन बुधवारी CNNमधील कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे ही पाकिटं CNNच्या कार्यालयात पाठवण्यात आली होती, असं माध्यमांनी म्हटलं आहे.

"CNNला पाठवण्यात आलेल्या पाकिटात व्हाईट पावडर वापरण्यात आली होती, त्याची सध्या चौकशी सुरू आहे," असं न्यूयॉर्कचे पोलीस आयुक्त जेम्स ओ' नील यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत कुणाला स्फोटकं पाठवली?

FBIच्या ताज्या माहितीनुसार खालील ठिकाणी स्फोटकं पाठवण्यात आली :

1. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन

2. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

3. CIA चे माजी संचालक जॉन ब्रेनान

4. माजी महाधिवक्ता एरिक होल्डर

5. उदारमतवादी विचारवंत जॉर्ज सोरोस

6. रॉबर्ट डी नीरो

डी नीरो यांच्या बाबत काय घडलं?

सीएनएनचं कार्यालय आणि ज्येष्ठ डेमोक्रॅट नेते यांच्याकडे आलेल्या संशयित स्फोटकांसारखंच पाकिट अभिनेते रॉबर्ट डी नीरो यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्येही आलं आहे, अशा बातम्या US माध्यमांनी दिल्या आहेत.

फोटो स्रोत, Reuters

गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी, ट्रिबेका ग्रीलमध्ये हे पाकिट आल्याचं NBCनं पोलिसांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रंप यांना विरोध करणाऱयांकडे गेल्या आठवडाभरात सापडलेलं हे आठवं पाकिट आहे.

डी नीरो यांनी ट्रंप यांना ते एक 'राष्ट्रीय आपत्ती' असल्याचं म्हटलं होतं.

न्यूयॉर्क पोलिसांनी NBCला दिलेल्या माहितीनुसार,पाकिट आलं तेव्हा इमारतीत कोणी नव्हतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)